कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे अष्टभैरवनाथांपैकी एक असलेले बाळभैरवनाथांचे १२०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. चैत्र शुद्ध त्रयोदशीला होणारी येथील यात्रा प्रसिद्ध आहे. यावेळी बाळभैरवनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा थाटात साजरा केला जातो. या यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे येथील हवामान व पावसाच्या अंदाजासाठी करण्यात येणारी ‘होईक’. ती ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो शेतकरी या मंदिर परिसरात उपस्थित असतात.
मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी दंडकारण्याचा भाग असलेल्या या परिसरात दधीची ऋषींचा आश्रम होता. तेथे नेहमी यज्ञ व धार्मिक विधी होत असत, परंतु काशासुर राक्षस सतत त्या विधींमध्ये अडथळा आणत असे. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे काशासूर उन्मत्त झाला होता. जो मनुष्य स्वतःला जाळून घेऊन मृत होईल त्याच्या अस्थींपासून बनलेल्या बाणानेच काशासुराचा मृत्यू होईल, असे वरदान त्याला प्राप्त झाले होते. या उन्मत्त काशासुराला अद्दल घडविण्यासाठी दधीची ऋषींनी स्वतःला जाळून घेण्यापूर्वी शंकराची प्रार्थना करून बाळभैरवनाथांकरवी या दैत्याचा अंत व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार बाळभैरवनाथांनी काशासुराशी घनघोर युद्ध केले, परंतु बाळभैरवनाथ ब्रह्मचारी असल्याने काशासुराचा अंत होत नव्हता. म्हणून चैत्र शुद्ध त्रयोदशीला येथील जोगेश्वरी नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह लावण्यात आला. त्यानंतर बाळभैरवनाथांनी दधीची ऋषींच्या अस्थींपासून बनविलेल्या बाणाने काशासुराचा अंत केला. ज्या ठिकाणी काशासुरास मारले त्या ठिकाणास काशासुराच्या नावावरून ‘कसारे’ असे नाव पडले. बाळभैरवनाथाचे ब्रह्मचर्य कायम राखण्यासाठी जोगेश्वरी देवीने लग्नानंतर विहिरीत उडी मारून स्वतःला संपवले.
युद्धानंतर विश्रांतीसाठी भैरवनाथ जेथे थांबले त्या चांदेकसारे गावात बाळभैरवनाथांचे मंदिर आहे. हे मंदिर कोणत्या काळातील आहे याची निश्चित माहिती उपलब्ध नसली, तरी तेथे असलेल्या शिलालेखावरून या मंदिराचा जीर्णोद्धार १६१७ मध्ये झाल्याचे कळते. त्यानंतर १८४५ मध्ये पुन्हा जीर्णोद्धार झाल्याची नोंद लाकडांवर कोरलेल्या अक्षरांमध्ये आहे.
मुंबई-नागपूर जुन्या महामार्गाला लागून असलेल्या या मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे. तटबंदीवर चारही बाजूंना भक्कम बुरूज आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर वैशिष्ट्यपूर्ण अशी गोलाकार दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या आत जाण्यासाठी लहानसा मार्ग असून तेथून दीपमाळेच्या वर जाता येते. हवा व प्रकाशासाठी या दीपमाळेला अनेक ठिकाणी लहान गवाक्ष (खिडक्या) आहेत.
१९९० मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. यावेळी झालेल्या खोदकामात बाळभैरवनाथांची मूर्ती जमिनीखाली सापडली होती. त्या मूर्तीच्या आधारे नवीन संगमरवरी मूर्ती तयार करून तिची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. या मूर्तीच्या उजव्या बाजूला भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या अर्धमूर्ती आहेत. भैरवनाथ मंदिरास राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे.
येथील होईक (हवामानाचा अंदाज सांगण्याची पद्धत) खूप प्रसिद्ध आहे. फार पूर्वीपासून या ‘होईक’प्रमाणे शेतकरी शेतात कोणते पीक घ्यायचे ते ठरवीत. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस नक्षत्रांनुसार १८ खड्डे तयार करून त्यात बाजरी, गहू, ज्वारी, हरभरा, मूग असे पंचधान्य टाकले जाते. त्या प्रत्येक खड्ड्यांवर वडाची ५ पाने ठेवून पाणी शिंपडले जाते. त्यानंतर पूजाविधी करून गावकरी तेथून निघून जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ग्रामस्थ मंदिरात जमतात. आजुबाजुच्या तालुक्यांतील हजारो शेतकरीही येतात. भैरवनाथांची पूजा झाल्यानंतर आदल्या दिवशीच्या खड्ड्यांवरील वडाची पाने काढली जातात आणि तो खड्डा ओलसर आहे, कोरडा आहे, टाकलेल्या धान्याची नासाडी झाली आहे का, यानुसार त्या त्या नक्षत्राचे भाकीत वर्तवले जाते. या भाकितांवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे.
भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या विवाहसोहळ्यानिमित्त येथे दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला यात्रा भरते. यात्रेच्या दिवशी पहाटे भैरवनाथांना स्नान घालण्यासाठी कावडीने गंगाजल आणले जाते. यात्रेच्या ५ दिवस आधी तेलवणाचा कार्यक्रम असतो. त्यात भैरवनाथ व जोगेश्वरी यांना हळद लावली जाते. त्यासाठी गावातील प्रत्येक घरातून हळद घेतली जाते. हळदीपासून ते लग्नापर्यंत परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ पाच दिवसांचा उपवास करतात. त्या काळात ग्रामस्थ शेतात औत जुंपत नाहीत, बैलगाडी हाकत नाहीत. महिला कुरडया-शेवया करीत नाहीत. पाच दिवसांनंतर भैरवनाथांना लावलेली हळद उतरवून व पुरणपोळीचा नैवद्य दाखवून उपवास सोडला जातो. काही भाविकांकडून काशासुराला बोकडाचा बळी दिला जातो. भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या विवाह सोहळ्यानंतर चांदीच्या मुखवट्यांची सायंकाळी पालखीमधून मिरवणूक निघते. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात. ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते.