तुळजापूरची तुळजाभवानी, माहुरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी माता आणि कोल्हारची भगवती (महालक्ष्मी) अशा साडेतीन शक्तिस्थळांचे एकत्रित व दुर्मिळ स्थान अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे आहे. अहमदनगर–मनमाड मार्गावर अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर हे तीर्थस्थान असून भगवती देवीच्या नावावरून या गावाचे भगवतीपूर असे नामकरण झाले आहे. नवसाला पावणाऱ्या, भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या या देवीचे हे मंदिर येथील ग्रामदैवत असून लाखो भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर येथे यात्रोत्सव साजरा होतो. संपूर्ण महिनाभर यात्रा असणारे महाराष्ट्रातील हे एकमेव देवस्थान असल्याचे सांगितले जाते.
कोल्हार भगवतीपूर गावाची आख्यायिका अशी की समुद्रमंथनातून मिळालेले अमृत देवांना वाटप झाले ते ठिकाण होते येथून जवळ असलेले नेवासे. या अमृत वाटपावरून देव व दानवांमध्ये याच भागात कोलाहल माजला. त्यावरून ‘कोल्हाळ–कोल्हार’ असे नाव प्राप्त झाले. तो कोलाहाल शमविण्यासाठी शंकरांनी प्रकट होऊन श्री भगवती देवीची स्थापना केली. सर्व राक्षसांचा वध केल्यानंतर विसावा घेण्यासाठी भगवती देवी आज जेथे मंदिर आहे तेथे थांबली. त्यावेळी थकलेल्या देवीचे क्षेमकुशल विचारण्यासाठी भवानी माता, रेणुका माता व सप्तशृंगी माता या भगिनी येथे आल्या व भगवती देवीसोबतच त्यांनी येथे वास्तव्य केले.
भगवती मातेचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून संपूर्ण परिसरात फरसबंदी आहे. मंदिर परिसरात अनेक पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिरासमोर असलेल्या एका मोठ्या चौथऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण दगडी दीपमाळ आहे. या दीपमाळेवर जाण्यासाठी त्याच्या बाजूने गोलाकार जिना आहे. दीपमाळ आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या मधोमध होमकुंड आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. येथील गर्भगृह हे जुने मंदिर असून त्यापुढे अंतराळ व सभामंडपाचे नव्याने बांधकाम केल्याचे दिसते. मूळ मंदिर १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. जुन्या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती स्थापत्यरचनेचे आहे. प्रशस्त सभामंडपात असलेल्या खांबांना वरच्या बाजूने सुंदर महिरपी कमानी आहेत. सभामंडपात देवीचे वाहन सिंहाची पितळी मूर्ती आहे. भाविकांना गर्भगृहात प्रवेश नसल्यामुळे अंतराळातून देवींचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहातील चौथऱ्यावर चार देवी आहेत, त्यापैकी उजवीकडून पहिली तुळजापूरची भवानी माता, दुसरी माहुरची रेणुका माता, तिसऱ्या स्थानावर भगवती माता म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे रूप व चौथ्या स्थानावर सप्तशृंगी देवी अशा मूर्ती स्थानापन्न आहेत.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की कोल्हार गावात फार वर्षांपूर्वी एक गृहस्थ राहत होते. ते दरवर्षी वणी येथील गडावर सप्तशृंगीच्या दर्शनाला लोटांगण घालत जात असत. त्यामुळे ते लोटांगण बाबा नावाने परिचित होते. वयोमानानुसार लोटांगण घालत जाऊन सप्तशृंगीचे दर्शन घेणे अशक्य होऊ लागले, तेव्हा देवीने त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की मीच दरवर्षी पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा या काळात कोल्हार येथे येऊन वास्तव्य करीन. तेव्हापासून दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर येथे यात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात आणि नवरात्रोत्सवात तुळजापूरची भवानी माता, माहुरची रेणुका माता, कोल्हापूरची अंबा माता आणि वणीची सप्तशृंगी माता ही साडेतीन शक्तिपीठे येथे वास्तव्य करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पौष शुद्ध पौर्णिमेला पहाटे महाआरती झाल्यानंतर यात्रोत्सव सुरू होतो. सायंकाळी श्री भगवती मातेच्या छबिना पालखीची गावातून मिरवणूक निघते. ढोल–ताशे, सनई व चौघडा यांच्या तालावर भाविक व ग्रामस्थ तल्लीन होतात. मिरवणूक देवी मंदिरात पोहोचल्यानंतर रात्री फटाक्यांची आतषबाजी केली जाते. दुसऱ्या दिवशी नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा फड भरविला जातो. यात्रेनिमित्ताने मंदिर, तसेच परिसरात सजावट व रोषणाई केली जाते. ओटी भरणे, देवीला चोळी–पातळ नेसवणे, लिंब नेसणे, लोटांगण घालणे, नवस फेडणे व इतर विधी येथे मोठ्या उत्साहात पार पाडले जातात.
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत येथे नवरात्रोत्सव साजरा होतो. दररोज दुर्गा सप्तशती पाठ पठण, जोगवा, देवीची दृष्ट काढणे, स्त्रियांचा फेर इत्यादी कार्यक्रम मंदिराच्या सभामंडपात साजरे होतात. नवरात्रकाळात नवस फेडण्यासाठी भाविक सवाद्य मिरवणुकीने देवीच्या दर्शनाला येतात. स्थानिक तसेच बाहेर गावाहून येणारे, नऊ दिवस उपवास करणारे (घटी बसणारे) स्त्री–पुरुष भाविक मंदिरातच वास्तव्यास असतात. पाचव्या व सातव्या माळेला कोल्हार–भगवतीपूर गावच्या पाटील परिवाराच्या वतीने देवीस चोळी–पातळ व तळी भरण्याचा मान असतो. यावेळी उपस्थित भाविक व गावकऱ्यांना पानसुपारी दिली जाते. अष्टमीस नवचंडी होम–हवन (यज्ञविधी) होतो. नवमीस घटविसर्जन होऊन दशमीस महापूजा होते. नवरात्रात देवीस अलंकृत केले जाते.
दररोज पहाटे ५.३० वाजता मूर्तींना अभिषेक घातला जातो. सकाळी व सायंकाळी ७.१५ वाजता देवींची आरती होते. पहाटे ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेता येते. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीतर्फे येथे भक्त निवासाची सुविधाही करण्यात आलेली आहे.