ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले बालमटाकळी हे गाव अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात गेवराई–बीड मार्गावर वसले आहे. पेशवे व त्यानंतर इंग्रजांच्या हद्दीतील बालमटाकळी हे शेवटचे गाव होते. तेथून पुढे निजाम राजवटीची हद्द होती. निजामाच्या हद्दीतून व्यापारासाठी आलेल्या मालावर येथे कर वसूल केला जात असे. त्यामुळे संरक्षणदृष्ट्याही हे गाव महत्त्वाचे मानले जात असे.
शेवगाव तालुक्यातील महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र म्हणून बालमटाकळी ओळखले जाते. माहूरगडावरील देवीचे साक्षात रूप असलेली बालंबिका देवी येथे अवतरली, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बालंबिका देवी मंदिरासोबतच या गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामध्ये १७५२ मध्ये बांधलेले विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, १७५९ मधील बारवेतील महादेव मंदिर, १७६६ मधील दगडी दीपमाळ व १७८५ मधील बारवेवरील हनुमान मंदिर यांचा समावेश आहे. या मंदिरांचा येथे समूह आहे. याशिवाय येथे १३ व्या शतकातील टाकेश्वर व प्राचीन राममंदिर आहे. असे सांगितले जाते की येथील ग्रामदैवत बालंबिका देवीच्या नावावरून गावाला ‘बालमटाकळी’ असे नाव पडले.
बालंबिका मंदिराची आख्यायिका अशी की काही वर्षांपूर्वी या परिसरातील गावांची वतनदारी गरुड देशमुख घराण्याकडे होती. त्या वतनदाराला बाली नावाची एक मुलगी होती. ही बाली लहानपणापासून रेणुका देवीची भक्ती करीत असे. गावात रेणुका देवीचे मंदिर बांधावे, असा ती आई–वडिलांकडे सतत हट्ट करत असे. बालीचा आठव्या वर्षीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतरही ती जिवंत असल्याचा भास येथील गावकऱ्यांना होत असे.
बालीच्या मृत्यूनंतर देशमुखांच्या जमिनीत विहीर खोदण्याचे काम सुरू होते. ते काम सुरू असताना कामगारांना विहिरीमध्ये कठीण पाषाण लागला. अनेक घाव घालूनही तो पाषाण फुटेना. तेव्हा कामगारांनी सर्व शक्तीनिशी देवीचे नाव घेऊन पाषाणावर पहार चालवली असता ती पहार त्या पाषाणात घुसली आणि तेथून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हे दृश्य पाहून कामगार जागीच मूर्च्छित पडला. त्याच रात्री बाळूबाई देशमुख घराण्यातील मुख्य पुरुषाच्या स्वप्नात आली व सांगितले, ‘विहिरीत रेणुका माता असून तिच्या डोक्याला पहार लागली आहे. माझा मंदिर बांधण्याचा हट्ट तुम्ही पूर्ण केला नाहीत; परंतु आता मंदिर बांधून त्यात देवीची प्रतिष्ठापना करा.’
तसाच स्वप्नदृष्टांत त्या कामगारालाही झाला. त्यानुसार त्यांनी कुशल कारागिरांच्या हातून देवीची तांदळास्वरूप मूर्ती विहिरीबाहेर काढली. जेथे मूर्ती सापडली त्याच जागी मंदिराची उभारणी करण्यात आली.
बालमटाकळी गावाच्या मधोमध बालंबिका देवीचे स्थान आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यातील चौथऱ्यावर असलला देवीचा तांदळा ४ फूट उंच व ३ फूट रुंद आहे. उत्सवकाळात या देवीला चांदीचा मुकुट, साडी व अनेक अलंकार परिधान केले जातात. या मूर्तीच्या शेजारी परशुराम व गणपती यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे मूळ बांधकाम हे काळ्या पाषाणातील होते; परंतु नंतरच्या काळात त्याचा जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
दरवर्षी नवरात्रात तेथे मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या काळात गावात घरोघरी उपवास केले जातात. याशिवाय शेकडो भाविक मंदिरात घटी बसतात. उत्सवकाळात सकाळी व सायंकाळी देवीच्या आरतीसाठी शेकडो भाविक उपस्थित असतात. शाकंभरी पौर्णिमेला (पौष पौर्णिमा) देवीची यात्रा भरते. यानिमित्ताने येथे कुस्त्यांचे सामने होतात. त्यासाठी राज्यभरातून अनेक कुस्तीपटू एक महिना आधीपासून बालमटाकळी येथे मुक्कामाला येऊन सराव करतात. या काळात बालमटाकळीचे ग्रामस्थ या कुस्तीपटूंना सर्व सुविधा पुरवितात. सुमारे २०० वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याचे सांगितले जाते. नवसाला पावणारी व हाकेला धावून जाणारी बालंबिका देवी ही बालमटाकळीचे ग्रामदैवत, तर परिसरातील शेकडो गावांतील भाविकांचे आराध्य दैवत मानली जाते.