बायजाबाई मंदिर

जेऊर, ता. / जि. अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील गर्भगिरी डोंगररांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी असलेले मोहटादेवी देवस्थान या डोंगररांगेत विराजमान आहे. नाथ संप्रदायाचा उदय याच पट्टयात झाल्याचे सांगितले जाते. राष्ट्रसंत तनपुरे महाराज, भगवानबाबा, भृंगऋषी, वामनभाऊ, गव्हाणेबाबा, खंडुजीबाबा आदींच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे. अशा या पवित्र भूमीत अहमदनगर तालुक्यातील जेऊर या गावी डोंगर कड्यावर असलेले बायजाबाईचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर जेऊरचे आराध्य दैवत मानले जाते.

पूर्वीच्या काळात अनेक ऋषीमुनींचे गर्भगिरी डोंगरावर वास्तव्य होते. एका आख्यायिकेनुसार गोरक्षनाथांनी हा डोंगर सोन्याचा केला होता. आता मात्र हा डोंगर सोन्याचा नसला तरी येथील बायजाबाई मंदिर पायापासून कळसापर्यंत सोनेरी रंगात आहे. त्यामुळे डोंगरकड्यावरील हे मंदिर किमीच्या परिघातून सहज दिसते. बायजाबाई ही अन्नपूर्णा देवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की या देवीने भुकेलेल्यांना अन्न दिले म्हणून गावालाजेऊरनाव पडले. आजही गावातून जाणाऱ्या शेकडो पालख्यांना गावकरी जेवायला देतात. ‘नवसाला पावणारीअशी देवीची ख्याती असल्यामुळे दररोज देवीच्या दर्शनाला शेकडो भाविक येत असतात.

मंदिराची आख्यायिका अशी की बायजाबाई नावाची एक मुलगी लग्न झाल्यावर सासरी नांदायला आली. एके दिवशी सासऱ्याला शेतावर जेवण घेऊन जात असताना तिला वाटेत काही सैनिक भेटले. या भुकेलेल्या सैनिकांनी बायजाबाईकडे जेवण देण्याची विनंती केली. सैनिकांच्या विनंतीवरून बायजाबाईने त्यांना आपल्याकडील भाजीभाकरी दिली. सैनिकांच्या घोड्यांनाही तिने वैरण दिले. सगळे सैनिक मनसोक्त जेवूनही तिच्याकडील जेवण तसेच शिल्लक होते. (जेवून उरले म्हणून गावाचे नाव जेऊर पडले) इकडे सूनबाई जेवण घेऊन आल्याने सासऱ्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. घडलेला प्रकार सासऱ्यांना समजला तर ते रागावतील, या कल्पनेने घाबरलेल्या बायजाबाईने डोंगरावर आश्रय घेतलातिला शोधत जेव्हा सासरे डोंगरावर आले तेव्हा ती दगडात लुप्त झाली. त्यानंतर काही वर्षांनी बायजाबाईने गावकऱ्यांना दृष्टांत देऊन डोंगरावरील दगडांमध्ये असलेल्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी बायजाबाईचे गर्भगिरीच्या डोंगरावर मंदिर बांधले.

अहमदनगर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर येथे जाताना वाटेत जेऊर गाव लागते. निसर्गाच्या सानिध्यात उंच डोंगरावर उभारलेल्या बायजाबाई मंदिरापर्यंत जाण्यासाठी आता रस्ता आहे. त्यामुळे वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत थेट जाऊ शकतात. याशिवाय पायथ्यापासून पूर्वीचा पायरी मार्गही अस्तित्वात आहे. डोंगरावरील एका लहानशा पठारावर हे मंदिर स्थित आहे.

काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मंदिरावरील वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामामुळे त्याचे सौंदर्य खुलून. मंदिराचा कळस अंदाजे ९० फूट उंच ( मजली इमारतीच्या उंचीचे) आहे. भव्य कळसावर प्रत्येक थरावर वेगवेगळ्या शिल्पाकृती आहेत. हे शिल्पकाम आंध्र प्रदेशमधील कुशल कारागीरांनी केले आहे.

भिंती कळसावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असून संपूर्ण मंदिर सोनेरी रंगाने रंगविले आहे. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप प्रशस्त असून त्यात तीनही बाजूंना भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा सभामंडप खुल्या प्रकारातील असून त्याला सर्व बाजूंनी अर्धभिंती आहेत. सभामंडपातून गाभाऱ्यात प्रवेश करताच बायजाबाईच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन होते. संगमरवरी देव्हाऱ्यात बायजाबाईची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. देवीवर चांदीचा मुखवटा असून साजशृंगाराने तिला सजवलेले असते.

वैशाख पौर्णिमेला येथे भरणारी यात्रा प्रसिद्ध आहे. दिवस चालणाऱ्या या यात्रेत दिवस कुस्ती स्पर्धा असतात. यावेळी राज्यातून अनेक नामांकित मल्ल त्यात सहभागी होतात. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना ग्रामस्थांकडून वांगीभाकरीचा महाप्रसाद दिला जातो. तिसऱ्या दिवशी प्रवरासंगम येथील पाणी आणून देवीला अभिषेक केला जातो. दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य आणि महाआरती होते. संध्याकाळी बायजाबाईच्या मुखवट्याची पालखीतून मिरवणूक (छबिना) काढली जाते.

उपयुक्त माहिती:

  • अहमदनगरपासून १७ किलोमीटर अंतरावर 
  • अहमदनगरपासून संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटीला जेऊरला थांबा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही 
Back To Home