प्रवरा नदीच्या उगमस्थळी आणि रतनगडाच्या पायथ्याशी असलेले प्राचीन अमृतेश्वर मंदिर म्हणजे नखशिखांत सजलेले कातळशिल्पच! कोरीव शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जाते. वेरूळचे घृष्णेश्वर, अंबरनाथचे शिवालय, नाशिकजवळील गोंदेश्वर, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी महाराष्ट्रात शिल्पमंदिरे आहेत. त्यामध्ये रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिराचा समावेश होतो. शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा नदीदरम्यान १२ शिवालये बांधली. त्यापैकी हे एक प्रमुख मंदिर मानले जाते.
भारतीय पुरातत्त्व खात्याच्या नोंदींनुसार, अमृतेश्वर मंदिर हे १२व्या वा १३व्या शतकातील आहे. भंडारदरा या प्रसिद्ध पर्यटनस्थळापासून अगदी जवळ असलेल्या रतनगडाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. निसर्गसमृद्ध परिसरात असलेल्या या शिल्पमंदिराची रचना इतर शिवालयांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मंदिर पश्चिममुखी असले तरी नंदीमंडप मात्र पूर्वेकडे आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने या मंदिरास प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडून प्रथम नंदीमंडप, त्यानंतर थेट गाभारा, अंतराळ व शेवटी सभामंडप लागतो. गाभाऱ्यात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन्ही दिशेने मार्ग आहेत. अशा प्रकारची रचना इतर शिवालयांमध्ये सहसा पाहायला मिळत नाही. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील गाभारा काहीसा खोल असून तेथून जिवंत पाण्याचे झरे वाहतात. हे प्रवरा नदीचे उगमस्थान समजले जाते. अमृतेश्वर मंदिरातून उगम पावते म्हणून तिला अमृतवाहिनी प्रवरा असेही म्हटले जाते. पावसाळ्याच्या दिवसांत अमृतेश्वर मंदिराचा गाभारा पाण्याने भरलेला असतो. साधारणतः जून ते डिसेंबर या काळात येथील शिवपिंडी पाण्याखाली असते.
पश्चिमेकडून मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरील वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांवर बारीक कलाकुसर असून अनेक देवी–देवतांसोबतच तेथे मैथुन शिल्पेही कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे, तर खालच्या बाजूला देव–देवतांसोबत अनेक सूरसुंदरी कोरल्या आहेत. सभामंडपातील दगडी खांब हे शेकडो लहान–लहान शिल्पांनी सजले आहेत. खांबाच्या वरील बाजूस भारवाहक यक्ष आहेत. प्रकाश येण्यासाठी सभामंडपाच्या भिंतींवर जागोजागी दगडी जाळ्यांची रचना केलेली आहे.
अंतराळातून गर्भगृहाकडे जाताना प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर सर्व बाजूंनी शिल्पे आहेत. खालील बाजूला कीर्तिमुख, डाव्या व उजव्या बाजूला वेली कोरलेल्या आहेत. अंतराळापासून सुमारे सहा ते सात फूट खोल गाभारा आहे. तेथून सहा ते सात पायऱ्या उतरून गाभाऱ्यात जावे लागते. गाभाऱ्यातील शिवपिंडीही वैशिष्ट्यपूर्ण असून शाळुंकेच्या वरील बाजूस असलेले शिवलिंग हे तीन थरांमध्ये आहे. त्यामध्ये खालील बाजूकडून वरील बाजूकडे निमुळते होत गेलेले, असा त्याचा आकार आहे. (तीन दगड एकमेकांवर ठेवल्यासारखे भासते) अशी शिवपिंडी अभावानेच पाहायला मिळते. गाभाऱ्यातून पूर्वेकडे बाहेर पडल्यावर समोर नंदीमंडप आहे. या मंडपात नंदी स्थापित असून बाजूला दोन क्षरित (खंडित) झालेले नंदी आहेत.
मंदिराच्या बाह्य भिंतीवर विविध भौमीतिक रचना आहेत. त्यामध्ये देव, दानव, यक्ष, अप्सरा, गंधर्व अशी अनेक कोरीव शिल्पे आहेत. याशिवाय ठिकठिकाणी मैथुन शिल्पेही आहेत. मंदिराचे शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून शिल्पकलेची श्रीमंती त्यात जाणवते. जाळीदार नक्षीचे उभे थर व त्यावर शिखरांच्या छोट्या प्रतिकृतींची रचना आहे. हे मंदिर भूमीज शैलीतील असल्याचे सांगितले जाते. प्राचीन स्थापत्य शास्त्रानुसार, मंदिरशैलीचे ‘नागर’ म्हणजे उत्तर भारतीय आणि ‘द्राविड’ म्हणजे दक्षिण भारतीय असे दोन प्रकार मानले जातात. या दोहोंचा संगम असलेली ‘वेसर’ नावाची आणखी एक उपशैली आहे. भूमीज शैली ही नागर शैलीच्या मंदिरांची उपशैली आहे. भूमीज शैलीतील मंदिरे नर्मदा नदीच्या परिसरात व महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आढळतात. मंदिराच्या परिसरात अनेक प्राचीन मूर्ती व विरगळी आहेत, तर काही भग्न मूर्तीही आहेत.
मंदिरापासून जवळ एक चौकोनी पुष्करणी असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पुष्करणीच्या चारही बाजूच्या भिंतींवर लहान–लहान मंदिरे आहेत. त्यामध्ये गणेश आणि विष्णूच्या विविध रूपांच्या प्रतिमा आहेत. स्थानिक लोक या पुष्करणीला ‘विष्णूतीर्थ’ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या १४ रत्नांतून हे मंदिर आणि तीर्थ प्रकट झाल्याची कथा सांगतात. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे.
महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. श्रावणी सोमवारीही येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर परिसरातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे. भाविक, पर्यटकांसोबतच इतिहासप्रेमी आणि शिल्पकलेचे अभ्यासक आवर्जून या मंदिराला भेट देतात.