
रामायण काळातील, सप्तऋषींमधील श्रेष्ठ असणारे ऋषी अगस्ती, यांनी भारतात अनेक ठिकाणी वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. त्यामुळे देशात त्यांची अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर व नागपूर येथे त्यांची मंदिरे आहेत. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील प्रवरा नदी किनाऱ्यावर असलेले अगस्ती देवस्थान प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की अगस्ती ऋषींनी दंडकारण्यातील या भागात पहिल्यांदा मानवी वसाहत निर्माण केली. लंका विजयानंतर श्रीराम, लक्ष्मण व सीता पुष्पक विमानातून अयोध्येकडे जाताना अगस्तींच्या दर्शनासाठी त्यांचे विमान येथे उतरले होते.
स्कंद पुराणातील उल्लेखानुसार, देवतांच्या विनंतीला मान देऊन अगस्ती ऋषी काशी येथून दंडकारण्यात आले. दंडकारण्यात असताना नाशिक व अहमदनगरमध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्रेतायुगात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवास काळात असताना अगस्ती ऋषींना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी अगस्तींचे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सध्याच्या अनकाई किल्ल्यावर वास्तव्य होते. श्रीरामांनी तेथे एक दिवस वास्तव्य केले होते. त्यावेळी श्रीरामांना विशेष दीक्षा देऊन अगस्तींनी लंकाधीश रावणाचा या भूमीवर सुरू असलेला अत्याचार संपविण्याचे सुचविले. यासाठी दिव्य शस्त्रास्त्रांसह कधीही समाप्त न होणाऱ्या बाणांचा भाता त्यांनी श्रीरामांना दिला होता. सीतेच्या अपहरणानंतर अगस्ती ऋषींकडून रामायण ऐकण्यासाठी स्वतः महादेवांनीही सतीसह चार महिने येथे वास्तव्य केले होते.
नाशिकमधील वास्तव्यानंतर अगस्ती ऋषी सध्याच्या अकोले शहराच्या सीमेवर प्रवरा नदीच्या काठावर वास्तव्यासाठी आले. येथे आश्रम बांधून दंडकारण्यातील पहिली वसाहत त्यांनी या भागात निर्माण केली. प्राचीन काळापासून हा परिसर अगस्ती ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखला जातो. हे मंदिर फार प्राचीन असून त्याचे बांधकाम त्रेतायुगात झाले असावे, असे सांगितले जाते. वेळोवेळी नूतनीकरण केल्यानंतर या देवस्थानाला सध्याचे स्वरूप आले आहे.
अकोले शहराच्या सीमेवर असलेले हे मंदिर काहीसे उंचावर आहे. मंदिराभोवती तटबंदी असून सुमारे २५ ते ३० पायऱ्या चढल्यानंतर मंदिराच्या दर्शन मंडपात प्रवेश होतो. तेथून पुढे प्रशस्त सभामंडप असून सभामंडपाच्या भितींवर स्कंद पुराणात अगस्ती ऋषींबद्दल आलेले वर्णन चित्र व माहिती स्वरूपात लावण्यात आले आहेत. दर्शन मंडप व सभामंडप नंतरच्या काळात बांधलेले आहे. या सभामंडपापासून सुमारे पाच फूट उंचीवर मूळ मंदिर आहे. येथून आणखी पाच फूट उंचावर गर्भगृह असून त्यात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मखरात अगस्ती ऋषींची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीला दररोज विशिष्ट प्रकारचे कपडे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा व डोक्यावर फेटा परिधान केला जातो, त्यामुळे मूर्ती प्रसन्न व खुलून दिसते. मूर्तीसमोर अगस्तीं ऋषींच्या पादुका आहेत. भाविकांना मूर्तीजवळ जाण्यास परवानगी नसल्याने ते या पादुकांचे दर्शन घेतात.
मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र फरसबंदी असून येथील वृक्षराजींमुळे हा परिसर निसर्गरम्य भासतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका झाडाच्या खोडाला गणपती मूर्तीसारखा आकार आलेला आहे. मंदिराच्या शेजारी विठ्ठल–रुक्मिणी, गोरोबाकाका व अमृतेश्वर अशी मंदिरे आहेत. या परिसरात २ कुंडे आहेत. त्यापैकी उत्तरेकडील कुंड श्रीरामांनी बाण मारून तयार केला आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. हा कुंड इरावती तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. (संस्कृतमध्ये इरा म्हणजे पाणी. इरावती म्हणजे विपुल पाणी असलेले स्थान.) या कुंडात स्नान केल्यामुळे पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराशेजारी प्रवरा नदीला मिळणाऱ्या एका झऱ्याला कर्पुरनिर्झर असे म्हटले जाते. या पाण्याला काहीअंशी कापराचा सुगंध येतो. असे म्हटले जाते की या झऱ्यामध्ये देवी सीतेने स्नान केले होते.
महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी परिसरातील हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. याशिवाय श्रीराम जन्मोत्सव, हनुमान जयंती, तुकाराम बीज, आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा हे उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अगस्ती देवस्थानातून पंढरपूर, आळंदी आणि त्र्यंबकेश्वरसाठी निघणाऱ्या पालख्यांसोबत शेकडो भाविक पायी जातात.