गोंडबाबा देवस्थान
दस्तूर नगर, अमरावती, ता. जि. अमरावती
विदर्भाची ऐतिहासिक नगरी असलेल्या अमरावती शहराच्या आग्नेय भागात जुन्या बायपास मार्गालगत दस्तूर नगर परिसरात श्री गोंडबाबा देवस्थान आहे. हे देवस्थान मूळ उत्तर भारतातील बुंदेलखंड प्रांतातून विदर्भात स्थलांतरित झालेल्या समाजाचे कुलदैवत मानले जाते. लोकपरंपरेनुसार शेती, भूमी, पशुधन आणि कुटुंबाचे रक्षण करणारी ग्रामदेवता म्हणून गोंडबाबांची पूजा केली जाते. सुमारे शतकाहून अधिक काळापूर्वी उघड्या जागेत स्थापन केलेल्या मूळ पाषाणशिळेवर हे मंदिर उभारले गेले. मंदिरात गोंडबाबांसोबतच शक्तिदेवता आणि नागदेवतेची नित्य पूजा चालते. श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला म्हणजेच नागपंचमीच्या तिथीला मंदिरात होणारा दोन दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव हा येथील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा आहे.
अमरावती परिसराला प्राचीन काळापासून समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. १८९३ आणि १९११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अमरावती जिल्हा गॅझेटिअर’मधील नोंदींनुसार प्राचीन काळी या परिसरात औदुंबराची वने विपुल होती. त्यामुळे या प्रदेशाचे मूळ नाव ‘उदुंबरावती’ असे होते. कालौघात प्राकृत भाषेमध्ये त्याचे ‘उमरावती’ आणि पुढे ‘अमरावती’ असे रूपांतर झाले.
शहरात आढळलेल्या इसवी सन १०९७ मधील जैन तीर्थंकर आदिनाथ यांच्या संगमरवरी मूर्तीच्या पाषाणपीठावरील कोरीव शिलालेखात अमरावती या नावाचा स्पष्ट उल्लेख मिळतो. मौर्य, वाकाटक, चालुक्य, देवगिरीचे यादव, मुघल आणि नागपूरकर भोसल्यांच्या कालखंडात या परिसराचा विस्तार झाला. एकोणिसाव्या शतकात वऱ्हाड प्रांत ब्रिटिश नियंत्रणाखाली आल्यावर कापूस जिनिंग, प्रेसिंग आणि व्यापारामुळे शहराचा विस्तार जुन्या परकोटाच्या वेशीबाहेर दक्षिणेकडे बडनेरा मार्गावर आणि आग्नेयेस दस्तूर नगरच्या दिशेने वेगाने झाला. याच नागरीकरणाच्या प्रक्रियेत दस्तूर नगर ही वसाहत निर्माण झाली.
भारतीय लोकसंस्कृतीच्या इतिहासानुसार मानवी समाजाने स्थिर कृषी वस्ती निर्माण केल्यानंतर नैसर्गिक संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि भूमीच्या सुफलतेसाठी संरक्षक दैवतांची स्थापना केली. या प्रक्रियेतून ग्रामसीमांचे रक्षण करणारे क्षेत्रपाल आणि कुलदैवते अस्तित्वात आली. काळाच्या ओघात अनेक स्थानिक देवता शैव, शाक्त अथवा वैष्णव परंपरेत समाविष्ट झाल्या. तरी अनेक लोकदेवतांनी आपले मूळ स्वरूप स्वतंत्र ठेवले. बुंदेलखंड आणि मध्य भारताच्या पठारी प्रदेशात ग्रामरक्षक म्हणून ‘गोंडबाबा’ किंवा ‘गौड़बाबा’ यांच्या पूजनाची प्राचीन परंपरा चालत आली आहे. स्थानिक मौखिक आख्यायिकांनुसार गोंडबाबा हे शेती, गोधन आणि ग्रामस्थांचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करणारे जागृत दैवत मानले जाते.
अमरावती येथील गोंडबाबा मंदिराच्या स्थापनेचा इतिहास एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या एका नैसर्गिक संकटाशी जोडलेला आहे. इसवी सन १८९६ ते १८९७ च्या काळात संपूर्ण बुंदेलखंड प्रांतात दुष्काळ पडला होता. या दुष्काळामुळे शेती आणि रोजगाराची साधने नष्ट झाल्याने बुंदेलखंडातील अनेक कुटुंबांनी मध्य प्रांतातील वऱ्हाड भागाकडे स्थलांतर केले.
त्या काळात अमरावती हे कापूस व्यापार आणि जिनिंग उद्योगाचे केंद्र असल्याने अनेक श्रमिक कुटुंबे अमरावतीत दाखल झाली. या समाजाने आपली सांस्कृतिक पाळेमुळे जतन करण्यासाठी आपल्यासोबत आणलेल्या गोंडबाबांच्या पाषाणमूर्तीची अमरावतीत प्रतिष्ठापना केली. सुरुवातीला मोकळ्या जागेत झाडाखाली असलेल्या या मूळ शिळेवर इसवी सन १९२४ मध्ये पक्के मंदिर उभारण्यात आले. इसवी सन २०२४ मध्ये या मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.
बुंदेलखंडातील लोकसंस्कृतीत गोंडबाबांच्या पूजनाला ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय पुरावे मिळतात. झाशी जिल्ह्यातील मऊरानीपूर तालुक्यातील खोजरा या गावी असलेले ‘गोंडबाबा मढिया’ हे शिखरयुक्त प्राचीन मंदिर भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षित स्मारकांच्या अधिकृत यादीत नोंदवलेले आहे. याशिवाय नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने बुंदेली समाजसंस्कृतीवर केलेल्या
अभ्यासात बुंदेलखंडातील पारंपरिक ग्रामदेवतांच्या वर्गीकरणात खेरमाता, भिडोहिया, घटोइया यांच्यासमवेत ‘गौड़बाबा’ ऊर्फ ‘गोंडबाबा’ यांचा प्रमुख कुलदैवत म्हणून उल्लेख केला आहे. या मंदिरात गोंडबाबांसोबत नागदेवतेची स्वतंत्र पाषाणमूर्ती स्थापन केलेली दिसते. ही मूर्ती बुंदेली कृषक संस्कृतीतील प्राचीन नागपूजन परंपरेचा भाग आहे. शेतीप्रधान समाजात शेताचे रक्षण करणारा आणि भूमीशी निगडित जीव म्हणून नागाला पूजनीय स्थान लाभले आहे. स्थलांतरित समाजाने नव्या वसतीस्थानात कुलदेवतेसोबतच आपल्या आराध्य नागदेवतेचीही स्थापना केली.
दस्तूर नगर येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मंदिराचे बाह्य आणि अंतर्गत बांधकाम सिमेंट काँक्रीटचे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पेव्हर ब्लॉकचे फरसबंद प्रांगण आहे. प्रांगणाच्या एका बाजूला तुळशीवृंदावन आहे. मंदिराची मूळ वास्तू बंदिस्त सभामंडप आणि गर्भगृह अशा दोन विभागांत विभागलेली आहे. सभामंडपात सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी भिंतींमध्ये वातायने ठेवलेली आहेत. सभामंडपाचे सपाट छत चौकोनी स्तंभांवर तोललेले आहे. बाहेरील स्तंभ भिंतीत सामावले आहेत. स्तंभांवर आडव्या तुळयांची रचना आहे. सभामंडपाच्या भिंतींवर विविध देवीदेवता आणि संतांच्या तसबिरी लावलेल्या आहेत. गर्भगृहाच्या दिशेने असलेल्या सभामंडपातील देवकोष्टकात नागबाबांची शेंदूरचर्चित स्वयंभू पाषाणमूर्ती आहे. या मूर्तीवर अखंड पाषाणात कोरलेले नागफणी छत्र आहे. बाजूला इतर शक्तिदेवतांची शिल्पे आणि धातूचा त्रिशूळ ठेवलेला आहे.
सभामंडपाच्या पुढे मंदिराचे मुख्य गर्भगृह लागते. गर्भगृहात एका उंच पीठावर गोंडबाबा आणि शक्तिदेवता यांच्या तांदळा स्वरूपातील अखंड शेंदूरचर्चित मूर्ती शेजारी शेजारी आहेत. या दोन्ही मूर्तींवर भाविकांनी अर्पण केलेले चांदीचे मुखवटे, डोळे, नासिका आणि गंधतिलक बसवलेले आहेत. दोन्ही मूर्ती वस्त्रालंकारांनी सुशोभित केल्या जातात. मस्तकावर चांदीचे कोरीव मुकुट चढवले जातात. गोंडबाबांच्या मूर्तीशेजारी फणा उभारलेली पितळी धातूची नागप्रतिमा ठेवलेली आहे. गर्भगृहाच्या छतावर वर निमुळते होत गेलेले चौकोनी आकाराचे आधुनिक शिखर आहे. शिखराच्या माथ्यावर गोलाकार आमलक आणि त्यावर धातूचा कळस बसवलेला आहे.
बुंदेली लोकपरंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये चुलीवर तवा चढवला जात नाही. तसेच सुरी किंवा कात्री यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर टाळला जातो. ही परंपरा अमरावतीतील भाविक आजही उत्सवाच्या दिवशी पाळतात. श्रावण शुद्ध पंचमीला साजरा होणारा नागपंचमी महोत्सव हा या देवस्थानातील सर्वांत मोठा वार्षिक सोहळा आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान मंदिरात गोंडबाबा आणि नागदेवतेचा महाअभिषेक, लघुरुद्र आणि महापूजा केली जाते. मंदिराच्या सभामंडपात अखंड भजन, कीर्तन आणि कथावाचनाचे कार्यक्रम होतात.
नागपंचमीच्या दिवशी गोंडबाबा आणि नागदेवतेच्या चांदीच्या मुखवट्यांची पालखीतून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. या उत्सवाच्या काळात अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी आणि पारंपरिक कुलाचार करण्यासाठी मंदिरात येतात. यावेळी कुलपरंपरेनुसार गोंडबाबांना आणि नागदेवतेला दूध, लाह्या आणि धान्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. दुपारी ४ वाजल्यापासून मंदिरात महाप्रसादाचे वाटप केले जाते. असे सांगितले जाते की सुमारे पन्नास हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. याव्यतिरिक्त श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी, महाशिवरात्रीला आणि नवरात्रोत्सवात मंदिरात भाविकांची गर्दी असते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- अमरावती रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर
- बडनेरा जंक्शन रेल्वे स्थानकापासून ७ किमी अंतरावर
- शहरातील विविध भागांतून एसटी बस व ऑटोरिक्षांची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात तसेच अमरावती शहरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : सुनील गुप्ता, अध्यक्ष, मो. ९३२५३२२२१३, शैलेश साहू, उपाध्यक्ष, मो. ९३७१३४१४१२
