पराशर ऋषी व संत निळोबा महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पारनेरमध्ये महादेवाची १२ मंदिरे असून ती पारनेरची १२ ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यापैकी पारनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले नागेश्वर मंदिर हे शहरातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक मानले जाते. असे सांगितले जाते की़ या मंदिरात संत निळोबाराय यांनी अनेक वर्षे राहून नागेश्वराची पूजा– अर्चा केली होती. येथेच त्यांना पांडुरंगाने दर्शन दिले होते. जमिनीखाली अखंड सापडलेले हे मंदिर पारनेरचे ग्रामदैवत आहे. या मंदिराच्या शेजारी पुरातन श्रीराम मंदिर व श्रीलक्ष्मीनारायण मंदिर आहे.
एका आख्यायिकेनुसार, सध्या जेथे नागेश्वर मंदिर आहे तेथे पूर्वी गायरान भाग होता. चरता चरता एकदा एका गायीचा पाय मातीत अडकला. खूप प्रयत्न करूनही तो निघेना म्हणून गुराख्याने ग्रामस्थांच्या मदतीने गायीला तेथून सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु ते शक्य झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी गाय जेथे अडकून पडली होती तेथील बाजूची जमीन खोदण्यास सुरुवात केली असता त्यांना तेथे मंदिराचा कळस असल्याचे जाणवले. आणखी खोदकाम केल्यानंतर संपूर्ण मंदिर समोर आले, हेच आजचे नागेश्वराचे मंदिर होय. या मंदिराशेजारी प्राचीन बारव असून त्याला लागून श्रीराम मंदिर आहे.
पारनेर शहरातील नागेश्वर गल्लीत असलेले नागेश्वराचे हे मंदिर हेमाडपंती शैलीतील आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. जमिनीपासून काहीसे खाली असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावे लागते. येथील मुखमंडपात चौथऱ्यावर नंदी विराजमान आहे. तेथून पुढे सभामंडपात गेल्यावर मधोमध ६ फूट व्यासाची वर्तुळाकार शिळा आहे. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून त्यावर पितळी आवरण आहे.
असे सांगितले जाते की पराशर ऋषींच्या काळापासून या मंदिरात श्रावणात दररोज लघुरुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे. आजही ती अविरतपणे सुरू आहे. प्रत्येक सोमवारी, श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला येथे भरणारी जत्रा ही पारनेरमधील मोठी जत्रा असते. या दिवशी मंदिरात पहाटे ४ वाजल्यापासून पूजा, अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम होतात. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी दुपारी १२ वाजता महाआरती होते. दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.
नागेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या एका जुन्या वाड्यात पेशवेकालीन श्रीराम मंदिर आहे. हे मंदिर खासगी मालकीचे असल्याने तेथे फारसे उत्सव साजरे होत नाहीत; परंतु या मंदिराचे दगडी बांधकाम व गाभाऱ्यातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. श्रीराम मंदिराचा कळस आणि नागेश्वर मंदिराचा कळस यांची उंची व त्यावरील कलाकुसर जवळपास सारखीच आहे. या मंदिराचा गाभारा प्रशस्त असून त्यात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या शाळीग्राम शिळेतील मूर्ती आहेत. या मूर्तींच्या खालच्या बाजूला शुभ्र संगमरवरी विष्णू मूर्ती आहे.
नागेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला दशावतारी लक्ष्मीनारायण मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख विष्णू मंदिरांमध्ये पारनेर येथील या दशावतारी लक्ष्मीनारायण मंदिराचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात १२ व्या शतकातील प्राचीन मूर्ती आहेत. अखंड दगडातून कोरलेल्या या मूर्ती ४ ते ५ फुटांच्या असून त्यावर अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेली दिसते. येथील लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीमध्ये मत्स्य, कुर्म, वराह, परशुराम, वामन, नरसिंह, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी हे १० अवतार कोरलेले आहेत. अशी विष्णूमूर्ती दुर्मिळ समजली जाते. या मूर्तीच्या एका बाजूला लक्ष्मी व दुसऱ्या बाजूला पद्मावती देवी यांच्या मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की या सर्व मूर्ती मंदिरासमोरील एका विहिरीत सापडल्या होत्या. सुमारे ३०० वर्षांपूर्वी एका भाविकाला झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार त्याने या विहिरीत शोध घेतला असता या मूर्ती आढळल्या. मार्गशीर्ष प्रतिपदेला येथे मूर्ती स्थापना दिवस साजरा केला जातो. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दररोज सकाळी व सायंकाळी ६.३० वाजता या मंदिरात आरती होते.