अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अकलापूर हे गाव येथील जागृत एकमुखी दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. १२०० वर्षांपूर्वीच्या या प्राचीन व स्वयंभू स्थानाचे वैशिष्ट्य असे की येथे दर गुरुवारी व पौर्णिमेला एका विशिष्ट प्रकारच्या साबुदाण्याच्या खिचडीचा महाप्रसाद दिला जातो, येथे दिला जाणारा हा महाप्रसाद प्रसिद्ध आहे. दानशूर भाविकांना हा प्रसाद देण्यासाठी (अन्नदान) नोंदणी केल्यापासून सुमारे सहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. दिवसेंदिवस प्रतीक्षा यादीचा काळ वाढत आहे. येथील दत्त जयंती हा मोठा उत्सव असून या दिवशी तीन लाख भाविक श्रीदत्तांच्या दर्शनाला येतात, अशी नोंद आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत श्रीमहिपती महाराज यांचे टाळकरी कोंडाजी बाबा यांना श्रीदत्तांनी स्वप्नदृष्टांत देऊन आपले वास्तव्य अकलापूर गावाजवळील अनुसया टेकडीवर असल्याचे सांगितले. त्यानंतर कोंडाजींनी ग्रामस्थांच्या मदतीने येथे शोध घेतला असता श्रीदत्तांची सुंदर अशी एकमुखी वालुकामय मूती सापडली. तो दिवस वैशाख शुद्ध द्वादशीचा होता. त्यानंतर ग्रामस्थांनी अकलापूर येथे छोटे मंदिर बांधून या मूर्तीची त्यात प्रतिष्ठापना केली. दुसऱ्या आख्यायिकेनुसार संत ज्ञानेश्वरादी भावंडे पैठणहून आळंदीकडे रेड्यासोबत निघाले होते, त्यावेळी प्रवासात रेडा थकल्यामुळे ते २ दिवस या ठिकाणी मुक्कामाला होते.
अकलापूरमधील अनुसया टेकडीच्या पायथ्याशी विस्तीर्ण परिसरात सध्याचे मंदिर आहे. नव्याने बांधलेल्या एका सुंदर कमानीतून वास्तूच्या आवारात प्रवेश होतो. मंदिरात दर्शनाला जाताना प्रथम प्राचीन औदुंबर वृक्ष, त्यानंतर काही दत्तभक्तांच्या समाध्या, वैशिष्ट्यपूर्ण असे गायीचे शिल्प, होमकुंड व त्यापुढे मंदिर अशी रचना आहे. मंदिर परिसरात सुंदर उद्यान विकसित केले असून शोभिवंत झाडांसह अनेक फुलझाडांमुळे या मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. जमिनीपासून साधारणतः ७ ते ८ फूट उंचीवर हे मंदिर आहे.
२९ नोव्हेंबर २००३ रोजी गगनगिरी महाराजांच्या हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिरावर सुमारे ५ किलो वजनाचा सोन्याचा कळस बसविण्यात आला. भव्य सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. मूळ मंदिरापुढे सभामंडप नव्याने बांधला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर प्रथम कोंडाजी बाबा यांचे समाधी स्थान आहे. पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर श्रीदत्तांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. भाविकांना गर्भगृहात प्रवेश नसल्यामुळे या पादुकांचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपालांची शिल्प असून आतमध्ये सुंदर सोनेरी मखरामध्ये श्रीदत्तांची वालुकामय मूर्ती आहे. या मूर्तीला सोनेरी मुकुट व अनेक अलंकारांनी अलंकृत केलेले आहे.
मंदिर परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, मुक्ताबाई आणि सोपानदेव यांच्या मूर्ती आहेत. स्वामी गगनगिरी महाराज व काशीहून आलेले ब्राह्मण रंगदास स्वामी व काळभैरवनाथ यांची येथे छोटेखानी मंदिरे आहेत. येथील पिंपळ आणि लिंबाच्या झाडाखाली अन्नपूर्णा देवीचे स्थान आहे. उत्सवात या देवीला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. मंदिराशेजारी असलेल्या जागेत अनेक हनुमान वृक्षांची लागवड केलेली आहे. हे हनुमान वृक्ष दुर्मिळ असून त्याचे आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे, असे सांगितले जाते.
मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे दत्त जयंतीचा उत्सव साजरा होतो. या दिवशी पहाटेपासून पूजा, अभिषेक, कीर्तन आदी कार्यक्रम होतात. येथील नोंदीनुसार ३ लाखांहून अधिक भाविक श्रीदत्तांच्या दर्शनाला येतात. भाविकांच्या सोयीसाठी या दिवशी संगमनेरपासून एसटीच्या विशेष फेऱ्या असतात. वैशाख शुद्ध द्वादशी (प्रकट दिन) व गुरुपौर्णिमा या दिवशीही येथे उत्सवाचे स्वरूप असते. प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे महाआरती असते. या आरतीसाठीही हजारो भाविक उपस्थित असतात. या सर्व दिवशी भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टतर्फे महाप्रसाद देण्यात येतो.
दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन श्रीदत्तांचे दर्शन घेता येते. सकाळी ७ वाजता येथे आरती होते. देवस्थानच्या वतीने भाविकांना राहण्यासाठी भक्त निवासाची सुविधा करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्राच्या ‘ब’ दर्जाच्या यादीत या देवस्थानाचा समावेश झालेला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षाला ४ लाखांहून अधिक भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त होतो. त्या दर्जानुसार येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी–सुविधांसाठी वेळोवेळी शासनाकडून निधी उपलब्ध होतो.