अडबंगनाथ तपशिला मंदिर

भामाठाण (भामानगर), ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर

अडबंगनाथ हे नाथ संप्रदायातील एक नाथ. श्रीरामपूर तालुक्यात गोदावरीच्या तीरावर असलेले भामाठाण हे गाव अडबंगनाथांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. गुरू गोरक्षनाथांच्या सांगण्यावरून अडबंगनाथांनी या ठिकाणी १२ वर्षे तपश्चर्या केली होती. असे सांगितले जाते की त्यांनी ज्या शिळेवर बसून तपश्चर्या केली ती पवित्र शिळा (तपशिला) सीता हरणानंतर श्रीराम लक्ष्मण एकमेकांच्या गळ्यात पडून रडले होते त्यावेळी त्यांचे अश्रू वाळूवर पडून निर्माण झालेली आहे. ‘श्री नवनाथ भक्तिसारग्रंथामध्ये या क्षेत्राचा उल्लेख आहे.

भामाठाण येथे ज्या ठिकाणी आज मंदिर आहे, तेथे पूर्वी माळरानाच्या जागेवर अनेक वर्षांपासून लिंबाच्या झाडाखाली अडबंगनाथांची मूर्ती होती. पंचक्रोशीतील भाविक येथे दर्शनाला येत असत. सराला बेटाचे मठाधिपती नरायणगिरी महाराज यांचे शिष्य स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी काही काळ येथे तपश्चर्या केली होती. यावेळी त्यांना या ठिकाणी अनेक साक्षात्कार झाले. त्यांनी हे अनुभव आपले गुरू नारायणगिरी महाराज यांना सांगितल्यावर ही अडबंगनाथांची तपोभूमी असल्याचे त्यांनी दिव्यदृष्टीने जाणले. त्यानुसार शोध घेतला असता येथे श्रीरामलक्ष्मण यांच्या अश्रूंनी तयार झालेली अखंड शिळा आढळली. तोपर्यंत या स्थानाबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. नारायणगिरी महाराजांच्या आदेशानुसार स्वामी अरुणनाथगिरी यांनी येथे भव्य सुंदर मंदिराची उभारणी केली. मंदिराची बांधणी सुरू असताना अडबंगनाथांनी त्यांच्या एका भक्ताला स्वप्नदृष्टांत देऊन या ठिकाणी विहीर असल्याचे सागितले. त्याप्रमाणे शोध घेतला असता तपशिळेजवळ अखंड पाण्याची विहीर सापडली. मंदिराच्या गाभाऱ्याच्या खालच्या बाजूला आजही ती विहीर पाहता येते.

मंदिराची आख्यायिका अशी की वनवासकाळात श्रीरामलक्ष्मणसीता नाशिक येथील पंचवटी परिसरात एका पर्णकुटीत वास्तव्यास होते. त्यावेळी मारीच राक्षस कांचन मृगाचे रूप घेऊन पर्णकुटीसमोर आला. कांचन मृगाचा दरवळणारा सुगंध, त्याची सुवर्ण कांती, लकाकणारे डोळे पाहून सीतेला त्या हरणाचा मोह झाला तिने श्रीरामांकडे त्या हरणासाठी हट्ट धरला. श्रीरामांना ते हरीण मायावी आहे हे माहिती असूनही पत्नीहट्टासाठी त्यांनी धनुष्य घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. गोदावरीच्या तीरावरून श्रीरामांना हुलकावणी देत ते मायावी मृग पुढे पुढे जात होते. मृग नजरेच्या टप्प्यात आल्यावर श्रीरामांनी त्याच्यावर बाण सोडला. तो बाण मृगाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाला लागला. घायाळ झालेल्या मारीच राक्षसाने रामाच्या आवाजातलक्ष्मणा मला वाचवअसा आवाज काढल्याने सीतेने लक्ष्मणाला श्रीरामांच्या रक्षणासाठी पाठविले. मारीच राक्षसाला मारून श्रीराम पर्णकुटीकडे येत असताना लक्ष्मण आणि त्यांची गोदावरीच्या तीरावर भेट झाली. त्यावेळी श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले तू सीतेला एकटीला सोडून आल्यामुळे ती आता तेथे नसणार आणि ते दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. त्यांच्या अश्रूंमुळे येथे एक शिळा निर्माण झाली. असे सांगितले जाते की ते ठिकाण म्हणजे आजचे भामाठाण होय. ही शिळा भामाठाण येथील अडबंगनाथ मंदिरात आहे. या शिळेची खोली किती आहे हे मोजण्याचा प्रयत्न झाला; परंतु ते शक्य झाले नाही.

श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामधील उल्लेखानुसार, पूर्वी माणिक नावाचा शेतकरी शेतात काम करीत असताना भुकेने व्याकुळ झालेले गोरक्षनाथ तेथे आले. त्यांनी माणिकजवळ काहीतरी खाण्यास मागितले. माणिकनेही त्वरित आपली शिदोरी पाणी त्यांना दिले. स्वतःसाठी आणलेली शिदोरी दिल्याने गोरक्षनाथ माणिकवर प्रसन्न झाले तुला काही वर मागायचा असेल तर माग, असे म्हणाले. त्यावर माणिक म्हणाला, ‘मीच तुला माझी शिदोरी दिली, तू मला काय वर देणार? तुझे पोट भरले असेल तर आता तू येथून निघून जा.’ त्यावर गोरक्षनाथ माणिकला म्हणाले, ‘तुला जर माझ्याकडून वर नको असेल तर तूच मला वर दे.’ माणिकने त्याला संमती दिली. त्यावर गोरक्षनाथांनी सांगितले कीइच्छेला जे येईल ते तू करू नकोस.’ माणिकला वाटले त्यात काय असे अवघड आहे, म्हणून त्याने गोरक्षनाथांना होकार दिला.

संध्याकाळ झाल्यावर माणिकने आपले औत (नांगर) सोडले ते डोक्यावर घेतले. त्यानंतर घराकडे जावे, अशी इच्छा त्याच्या मनात येताच त्याला गोरक्षनाथांना दिलेले शब्द आठविले. तो तसाच डोक्यावर औत घेऊन तेथेच एक तप तटस्थ उभा राहिला. १२ वर्षे एकाच जागेवर राहिल्याने माणिकच्या शरीरात त्राण उरले नव्हते. एके दिवशी गोरक्षनाथ गुरू मच्छिंद्रनाथ चौरंगीनाथांसह येथे आले. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना माणिकबद्दल सांगितले. दिलेल्या शब्दाला माणिक जागला होता. मच्छिंद्रनाथ म्हणाले, ‘खरोखरच तू महान तपस्वी आहेस. तुझ्यासारख्यांचा गुरू करून अनुग्रह घ्यावा, अशी माझी इच्छा आहे.’ त्यावर माणिकने स्वभावानुसार प्रत्युत्तर केले कीमी का गुरू होऊ तुमचा, त्याऐवजी तुम्हीच माझे गुरू व्हा.’ त्यानंतर गोरक्षनाथांनी माणिकच्या कानावर आपले मुख लावत कान फुंकताच तो सज्ञान झाला. त्यांच्या मंत्राने माणिकच्या कानात प्रवेश करताच तो ब्रहस्पतीसमान (देवांचे गुरू) विद्वान झाला. गोरक्षनाथांनी माणिकला मच्छिंद्रनाथांसमोर आणले आणि सांगितले की हा अडबंग आहे, त्यासअडबंगनाथअसे ओळखले जावे. अडबंगनाथाला नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन निर्धारित यात्रेस गोरक्षनाथ आपल्यासोबत घेऊन गेले. पुढे तीर्थयात्रा करताना अडबंगनाथांनी सर्व विद्या संपादित केल्या. त्यांनी अनेक ठिकाणी तपश्चर्या केली. त्यापैकी भामाठाण हे महत्त्वाचे स्थान मानले जाते.

भामाठाण (भामानगर) या स्थानाबद्दल श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या अध्याय ३३ मध्ये पुढील उल्लेख आहे – 

यापरी गोरक्षनाथ। मही भ्रमता नाणीतिर्थ।।

ते गोदातटी अकस्मात। येऊनिया पोहोचला।।

तो गोदातटी भामानगर। तया अरण्यात गौरकुमर।।

परम झाला क्षुधादूर। जठरानले करोनिया।।

२००५ मध्ये सराला मठाचे मठाधिपती नारायणगिरी महाराज यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन झाले. मंदिर परिसरात सर्वत्र फरसबंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे श्रीदत्त डावीकडे गणपती यांची मंदिरे आहेत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून तेथील सर्व भिंतींवर नवनाथांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारी अनेक मूर्तीचित्रे माहितीसह लावली आहेत. गर्भगृहात एका चौथऱ्यावर सुमारे पाच फूट उंचीची अडबंगनाथांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या उजवीकडून असलेल्या पायरी मार्गाने उतरून अडबंगनाथांच्या समाधीस्थळाकडे जाता येते. तेथे त्यांची तप करण्याची जागा, विठ्ठलरुक्मिणीच्या मूर्ती, लहानशी विहीर अश्रू शिळा आहे. संपूर्ण मंदिरावर उत्तम कलाकुसर असून कळसावरील कोरीवर काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिर परिसरात गुरुकुल इमारत असून तेथे काही विद्यार्थी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण घेतात.

श्री अडबंगनाथ यांची तपोभूमी असलेले हे स्थान नाथ संप्रदायात विशेष प्रिय समजले जाते. माघ शुद्ध द्वितीया या दिवशी येथे धर्मबीज उत्सव साजरा केला जातो. (या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती, त्यामुळे नाथपंथात या तिथीला महत्त्व आहे.) नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात राज्यातील अनेक नामवंत कीर्तनाकारांचे कीर्तन होते. उत्सव काळात हजारो नाथपंथीय भाविक येथे दर्शनासाठी येतात. अडबंगनाथ (माणिक शेतकरी) यांनी गोरक्षनाथांना अन्नदान केले होते. त्यामुळे आजही या मंदिरात आलेल्या भाविकांना अन्नदान करण्यात येते. अडबंगनाथ चिरंजीव आहेत, जो भाविक अडबंगनाथांना प्रार्थना करून येथे अन्नदान करतो, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

उपयुक्त माहिती:

  • श्रीरामपूरपासून १७ किमी, तर नेवासापासून २३ किमी अंतरावर
  • मंदिर परिसरात निवासाची सुविधा नाही
  • नेवासे, श्रीरामपूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
Back To Home