आपल्या देशात दोन तीर्थस्थाने अशी आहेत जेथे उत्सवाच्या वेळी गाभाऱ्यातील मूळ मूर्ती त्यांच्या स्थानावरून हलवून पालखीत ठेवण्यात येते. त्यापैकी एक आहे जगन्नाथपुरी आणि दुसरे आहे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेची मूर्ती. तुळजाभवानीचे माहेर असलेले अहमदनगरजवळील बुऱ्हाणनगर (देवीचे माहेर) येथून आलेल्या रिकाम्या पालखीत ही तुळजाभवानीची मूर्ती ठेवण्यात येते व तिची वाजत–गाजत लाखो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक निघते. सुमारे ५०० वर्षांहूनही अधिक काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजतागायत कायम असून सासर–माहेरच्या नात्याची नाळ आजही घट्ट असल्याचे येथे पाहायला मिळते.
ऐतिहासिक नोंदींनुसार, पैठण येथील शालिवाहन घराण्यातील राजा शंभूराव यांनी देवीची मूर्ती व सिंहासन बुऱ्हाणनगरला आणले होते. त्यावेळी अंधेरी नगरी म्हणून हे ठिकाण ओळखले जात असे आणि येथे तेलंगा नावाचा राजा राज्य करीत होता. देवीची मूर्ती ३०० ते ४०० वर्षे या ठिकाणी होती. हे राजघराणे प्रथम देवकर व नंतर भगत म्हणून ओळखले जाऊ लागले. तेलंगा राजा कर्नाटकावर स्वारी करण्यास गेल्यानंतर देवीची मूर्ती सोबत घेऊन गेला. मार्गात डोंगराळ प्रदेश असलेल्या चिंचपूर येथे (सध्याचे तुळजापूर) मूर्ती सुरक्षित ठेवण्यात आली. लढाईत तेलंगा राजाचा अंत झाला. त्यामुळे पुढील अनेक वर्षे ती मूर्ती तुळाजापुरातच होती. आजही तुळजाभवानी मातेच्या डाव्या बाजूच्या टेकडीवर तेलंगा राजाची समाधी आहे. त्यानंतर बहामनी राजवट सुरू झाल्यावर मूर्ती पुन्हा बुऱ्हाणनगरला आणण्यात आली.
अहमदनगरला निजामाचा कहर सुरू झाल्यावर मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेण्यात आली. निजामापासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी जानकोजी देवकर भगत यांनी कष्ट घेतले. निजामाची राजवट संपल्यानंतर मूर्ती परत बुऱ्हाणनगरला आणण्यात आली. जानकोजी हे तुळजाभवानीचे निस्सीम भक्त होते. देवीवर त्यांची अपार श्रद्धा होती. देवीने त्यांना एकदा मुलीच्या रूपात दर्शन दिले. त्यांनी तिचे नाव कौतुकाने अंबिका ठेवले. या अंबिकेने जानकोजीच्या तेलाच्या व्यवसायात त्यांना मदत केली. (आजही मंदिराच्या बाजूला देवीने चालविलेला तेलाचा घाणा पाहायला मिळतो) या व्यवसायामुळे सावकाराच्या कर्जातून जानकोजी मुक्त झाले. अल्पावधीतच ते श्रीमंत झाले व पंचक्रोशीत प्रसिद्ध व्यापारी म्हणून परिचित झाले. ही अंबिका १२ वर्षे जानकोजींकडे राहिली. या काळात बुऱ्हाणनगरच्या बादशहाची अंबिकेवर नजर गेली. बादशहाने अंबिकेला आणण्यासाठी सैन्य धाडले. मात्र कुणाचेही तिला स्पर्श करण्याचे धाडस झाले नाही. त्यावेळी अंबिकेने शाप दिला की बुऱ्हाणनगर निर्मनुष्य होईल. त्यामुळे गावात रोगराई वाढून अनेकांचा मृत्यू झाला, अनेक जण गाव सोडून गेले. मात्र जे देवीभक्त होते त्यांना कोणताही त्रास झाला नाही. त्यानंतर देवीने जानकोजींना खरे रूप दाखविले व ती लुप्त झाली.
जानकोजींची देवीवर अपार श्रद्धा होती. देवीचा विरह सहन न झाल्याने ते तुळजापूर येथे गेले व आत्मदहन करणार इतक्यात देवी अंबिका त्यांच्यासमोर प्रकट झाली. त्यावेळी जानकोजी देवीला म्हणाले, ‘मी जशी तुझी सेवा केली तशी माझ्या पिढ्यानपिढ्यांना ही सेवा लाभावी.’ त्यावर देवी म्हणाली, ‘तू (बुऱ्हाणनगरहून) पाठविलेल्या पालखीतून मी सीमोल्लंघन करीन व पलंगावर पाच दिवस निद्रा करीन.’ तेव्हापासून आजतागायत या पलंग पालखीच्या सोहळ्यात खंड पडलेला नाही.
अहमदनगर शहराच्या वेशीवर असलेले बुऱ्हाणनगर हे देवीचे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजले जाते. बुऱ्हाणपूर येथील मंदिर मोठे असून मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशा रचनेचे आहे. १९९४–९५ साली केलेल्या नूतनीकरणानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. मंदिर परिसरात अनेक पूजासाहित्याची दुकाने आहेत. मंदिराच्या समोर दोन प्राचीन दीपमाळा आहेत. दर्शन मंडपातून आत गेल्यानंतर सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्टीलचे रेलिंग लावून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील सभामंडपात देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मोठी पितळी मूर्ती असून देवीचा पलंगही येथे आहे. सभामंडपाच्या छतावर अनेक पेशवेकालीन कंदील आहेत. गर्भगृहात चांदीच्या मखरात देवी स्थित आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूला लहान मंदिरांमध्ये एक महादेवांचे मंदिर आहे, तर दुसऱ्या मंदिरात अंबिका देवीने तेल काढण्यासाठी ज्या घाण्याचा वापर केला होता, तो घाणा ठेवण्यात आला आहे. असे सांगितले जाते की नवीन मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम केले असता त्यातून तेलाचा घाणा, दोन दगडी दिवे व महादेवांची पिंडी सापडली होती.
दरवर्षी राहुरी येथे नवीन पालखी बनविली जाते. गणेशोत्सवातील अष्टमीपर्यंत पालखी तयार केली जाते. पितृ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पालखी राहुरीतून निघते. ही पालखी राहुरी, पारनेर व अहमदनगर तालुक्यातील सुमारे ४० गावांमध्ये फिरून घटस्थापनेला हिंगणगावात येते. नंतर दुसऱ्या दिवशी अहमदनगर येथील भिंगार कॅम्प येथे येते. तिसऱ्या माळेला बुऱ्हाणनगरची यात्रा असते. या दिवशी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिराला पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात. पालखीला सर्व अठरापगड जातीचे लोक हात लावतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी तुळजापूरकडे मार्गस्थ होते. तुळजापूरला होणाऱ्या विजयादशमीच्या उत्सवात पहाटे देवीची मूळ मूर्ती पालखीत घालून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते व नंतर ही मूर्ती बुऱ्हाणनगर येथून आणलेल्या पलंगावर पाच दिवस ठेवली जाते.
तब्बल ५०० वर्षांचा इतिहास असलेल्या या पलंग पालखीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक तुळजापूर येथे येतात. तुळजापूरकरांसाठी हा एक मोठा उत्सव असतो. बुऱ्हाणनगर येथील देवीचा रोज सकाळी ८ वाजता अभिषेक होतो. सकाळी ७ ते दुपारी १.३० व सायंकाळी ४ ते ९.३० या वेळेत भाविकांना मंदिरातील देवीचे दर्शन घेता येते.