महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा हा अनेक वैशिष्ट्यपूर्ण व चमत्कारिक म्हणता येतील अशा मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. येथील पाथर्डी तालुक्यात चक्क दैत्याचे मंदिर आहे, तर अहमदनगर तालुक्यातील अगडगाव येथील काळभैरवनाथांच्या मंदिरात भुतांची जत्रा भरते, अशी श्रद्धा आहे. याच पंक्तीतील आणखी एक आगळेवेगळे दुर्योधनाचे मंदिर कर्जत तालुक्यातील दूर्गाव येथे आहे. या मंदिरामुळे या गावाचे नाव दुर्गाव पडले असून संपूर्ण महाराष्ट्रात दुर्योधनाचे हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.
कौरव बंधूंमधील ज्येष्ठ व महापराक्रमी राजा असलेल्या दुर्योधनाची महाभारतात खलनायक म्हणून प्रतिमा आहे. परंतु त्याच्यामध्ये अनेक चांगले गुणही होते. या गुणांमुळे भारतात अनेक ठिकाणी त्याची पुजा होते. याशिवाय देशात काही ठिकाणी त्याची मंदिरेही आहेत. (डेहराडून येथे असलेल्या कौरवांच्या मंदिरांमधील व केरळमधील इडाक्कड येथील दूर्योधन मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.) राशीनपासून जवळ असणाऱ्या कुळधरण गावाशेजारी दुर्गाव हे छोटेसे गाव आहे. प्रत्येकाला आपल्या परिसरातील देवस्थानावर श्रद्धा असते, तशी दुर्गाव येथील ग्रामस्थांचे दुर्योधन मंदिर हे श्रद्धास्थान आहे. दर ३ वर्षांनी अधिक महिन्यात येथे होणारा उत्सव प्रसिद्ध असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या उत्सवांमध्ये त्याची गणना होते.
मंदिराची अख्यायिका अशी की महाभारतात झालेल्या कौरव–पांडवांच्या युद्धानंतर भीमाच्या भीतीने जखमी झालेला दुर्योधन एका सरोवरात पाण्याखाली लपून बसला होता. भीमाने त्या सरोवराजवळ जाऊन तेथील जलदेवतेला दुर्योधनाला बाहेर पाठविण्याचे आवाहन केले. त्यानुसार जलदेवतेने त्याला बाहेर जायला सांगितले. त्यावेळी भीम व दुर्योधनामध्ये युद्ध झाले. दुर्योधनाने मृत्यूपूर्वी दुर्गाव येथील महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांची आराधना केली. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन त्यांनी दूर्योधनाला आपल्या मंदिराच्या कळसामध्ये काही काळ लपण्यासाठी जागा दिली. तेव्हापासून दूर्योधनाचा वास येथे असल्याचे सांगितले जाते.
जलदेवतेने आपल्याला पाण्यात स्थान दिले नाही, म्हणून दुर्योधनाला पाण्याचे साठे, पाण्याने भरलेले ढग यांचा राग आहे. दुर्योधनाची दृष्टी जर ढगांवर पडली तर पाऊस न पडताच ते पुढे जातात आणि या परिसरात दुष्काळी परिस्थिती ओढवते. परंतु जेव्हा अशी परिस्थिती ओढवते, त्या वेळी दुर्योधनाची मूर्ती मंदिरात कोंडली जाते, म्हणजे पाऊस पडतो, अशी येथील पंचक्रोशीतील गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
हे मंदिर गावाच्या सीमेवर निसर्गरम्य परिसरात स्थित आहे. दुर्योधन मंदिर म्हणून त्याची ओळख असली तरी हे मुख्य मंदिर महादेवाचे आहे. सुमारे ४ ते ५ फुट उंच जगतीवर (चौथरा) संपूर्ण दगडात ते बांधलेले आहे. सभामंडप व गाभारा अशी या मंदिराची रचना आहे. काही वर्षापूर्वी या मंदिरासमोर नव्याने एक प्रशस्त मंडप बांधण्यात आला आहे. ४ पायऱ्या चढल्यावर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात नंदी असून गर्भगृहात २ शिवपिंडी आहेत. त्यापैकी १ चौकोनी तर दुसरी गोलाकार आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या गाभाऱ्यातून भूयारी मार्ग होता व त्यातून गावाच्या वेशीवर असलेल्या प्राचीन चिंतामणी मंदिरापर्यंत जाता येत असे.
मंदिराच्या बाजुने वर कळसावर जाण्यासाठी एक पायरी मार्ग आहे. कळसाजवळ गेल्यावर आत जाण्यासाठी दरवाजा आहे. आतमध्ये कळसाच्या पोकळीत दूर्योधनाची पद्मासनातील मूर्ती आहे. या मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला उत्सव असतो. यावेळी येथे येणाऱ्या हजारो भाविकांमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप येते. दर ३ वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात येथे दुर्योधनाची मोठी मिरवणूक काढण्यात येते. अधिक महिन्याचे वर्णन येथील ग्रामस्थ ‘आगाऊ महिना’ असे करतात. दुर्योधन आगाऊ होता म्हणून या महिन्यात त्याची मिरवणूक काढण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. याशिवाय अधिक महिन्यात ८ दिवस येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
राज्य सरकारकडून या स्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देण्यात आला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून १ लाखांहून अधिक व ४ लाखांहून कमी भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त होतो.) सकाळी ६ पासून सायंकाळी ६ पर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते. दररोज सकाळी सात वाजता येथे आरती होते.