अहमदनगर जिल्ह्यातील गर्भगिरी पर्वतरांगांमध्ये स्थित असलेले मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ मंदिर नाथसंप्रदायासोबतच हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे सांगितले जाते की गोरक्षनाथांनी या ठिकाणी १२ वर्षे तपश्चर्या केली होती, त्यामुळे या क्षेत्राला गोरक्षनाथांची तपोभूमी म्हटले जाते. संपूर्ण श्रावण महिन्यात येथे येणाऱ्या भाविकांना भंडारा (महाप्रसाद) देण्यात येतो. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षनाथ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त भरणारी येथील यात्रा ही अहमदनगर जिल्ह्यांतील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक समजली जाते.
‘श्रीनवनाथ भक्तीसागर’ ग्रंथाच्या २३ व्या अध्यायात दिलेल्या माहितीनुसार, गुरू मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथ आणि बालक मिनीनाथ यांच्यासह औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन नेवासे–सोनईमार्गे गर्भगिरी पर्वताकडे निघाले होते. या प्रवासात राणी मैनावती यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यावेळी राणीने मच्छिंद्रनाथांना दक्षिणा म्हणून एक सोन्याची वीट दिली. ती झोळीत घेऊन मच्छिंद्रनाथ मार्गस्थ झाले. मार्गक्रमण करीत असताना मच्छिंद्रनाथांनी सोन्याची वीट असलेली झोळी गोरक्षनाथांकडे दिली. झोळीतील सोन्याची वीट पाहून आपल्या गुरूंना संपत्तीचा मोह आहे, असा गोरक्षनाथांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी ती वीट गर्भगिरी डोंगरावरून खाली फेकून दिली व त्याऐवजी त्याच वजनाचा दगड झोळीत ठेऊन दिला. (ही वीट जेथे पडली त्या गावाचे नाव पुढे ‘सोनई’ असे पडले.)
झोळीत सोन्याची वीट नसून दगड आहे हे पाहून मच्छिंद्रनाथांनी आक्रोश करून गोरक्षनाथांकडे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गोरक्षनाथांना वाईट वाटले. गुरूंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या सिद्धीच्या जोरावर संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी सांगितले की राणी मैनावती यांच्याकडून ही वीट घेण्याचे कारण सोन्याचा मोह नव्हता तर तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर देवी–देवता, गंधर्व व शिष्यांना अन्नदान करण्याची माझी इच्छा होती. मच्छिंद्रनाथांचा हा हेतू समजल्यावर गोरक्षनाथांनी त्यांची माफी मागितली. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गंधर्वांच्या मदतीने गर्भगिरी पर्वत रांगेतील या गडावर देवी–देवतांसह सर्व ऋषी, मुनी, गण, गंधर्व व नद्या यांना निमंत्रण देऊन संपूर्ण श्रावण महिन्यात अन्नदान केले. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी काही वर्षे राहून तपश्चर्या केली. तेव्हापासून ही परंपरा सुरू असून आजही श्रावण महिन्यात येथे अन्नदान केले जाते.
अहमदनगर–वांबोरी रस्त्यावर डोंगरगण येथून जवळ असलेल्या गर्भगिरी डोंगरावर मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर जाण्यासाठीचा मार्ग आहे. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. आता थेट गडापर्यंत रस्ताही करण्यात आला आहे. डोंगरावर स्थित असलेल्या भव्य तटबंदीयुक्त मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरताना एखाद्या किल्ल्यात प्रवेश करतो आहोत, असा भास होतो. मंदिर प्रांगण प्रशस्त असून मधोमध गोरक्षनाथ मंदिर आहे. दर्शन मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर गोरक्षनाथांची काळ्या पाषाणातील प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गावर हिंगळा देवी, श्रीदत्त व मच्छिंद्रनाथ यांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी असून संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला व शांत भासतो. या परिसरातून आजूबाजूच्या अनेक गावांचे विहंगम दृश्य पाहता येते. श्रावण महिन्यात दररोज सकाळपासून पूजा, अभिषेक व पारायण असे विधी येथे होत असतात. नवनाथभक्त व देवस्थानाच्यावतीने येथे येणाऱ्या भाविकांना भंडारा देण्यात येतो. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षनाथ प्रकट दिन सोहळा होतो. त्यावेळी येथे मोठी यात्रा भरते. या कालावधीत हजारो भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते. या दिवशीही भाविकांसाठी भंडारा असतो. अहमदनगर येथून भाविकांच्या सोयीसाठी या कालावधीत खास ‘यात्रा विशेष’ एसटीची सुविधा असते.
दररोज पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन गोरक्षनाथांचे दर्शन घेता येते. पहाटे ४ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता मंदिरात आरती असते.