अहमदनगर–पुणे मार्गावरील पारनेर तालुक्यातील वाळवणे हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील प्राचीन काळभैरवनाथ मंदिरामुळे. शेकडो वर्षांपासून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे देवस्थान जागृत असल्याची मान्यता आहे. चैत्र वद्य प्रतिपदेला भरणारी येथील यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते. येथील काळभैरवनाथ आपले रक्षण करतो, अशी भावना ग्रामस्थांची असल्यामुळे त्याला ‘क्षेत्रपाळ’ म्हणूनही संबोधले जाते.
मंदिराची आख्यायिका अशी की वाळवणेपासून जवळ असलेल्या कामरगाव येथून काळभैरवनाथ रथावर बसून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. वाळवणे–कामरगावच्या वेशीवरील निसर्गसमृद्ध परिसरात काही वेळ विसाव्यासाठी ते तेथे थांबले. त्यावेळी गावातील एक गुराखी मुलगी गुरे घेऊन या भागात आली होती. तिने लगेच काळभैरवनाथांना ओळखून मनोभावे नमस्कार केला. त्या लहानशा मुलीची भक्ती पाहून देव प्रसन्न झाले व तिला वर मागण्यास सांगितले. त्यावर ती मुलगी म्हणाली, ‘देवा मला काहीही नको, फक्त तू माझ्यासोबत माझ्या गावी वाळवणे येथे चल आणि तेथेच थांब, जेणेकरून मला रोज तुझे दर्शन घेता येईल.’ त्या मुलीची इच्छा ऐकून देव तिच्यासोबत गावात येण्यासाठी तयार झाले. देवांनी तिला आपल्या रथात घेतले व ते दोघेही वाळवणे गावात जाण्यासाठी निघाले.
देवांच्या रथातून या दोघांचे गावाच्या दिशेने प्रस्थान सुरू असताना काही अंतरावर गेल्यावर रथाचा आख (दोन्ही चाकांना जोडून ठेवणारा व संपूर्ण रथाचा भार ज्यावर असतो त्या भागाला ‘आख’ म्हणतात) वाकला. ज्या ठिकाणी हा आख वाकला तेथे आज जिवंत पाण्याचा झरा आहे. पुढे काही अंतर पुढे आल्यावर तोच आख तुटला व रथाचे चाक निखळून पडले. ते ठिकाण म्हणजे आजचे बिरोबाचे माळ. या ठिकाणी निखळून पडलेले चाक आजही ग्रामस्थांनी जतन करून ठेवले आहे.
मूळ मंदिर १०व्या शतकातील असले, तरी त्यात काळानुरूप बदल होत गेले. १९७१ मध्ये ग्रामस्थांनी नूतनीकरण केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. यासाठी सुमारे २ कोटींचा खर्च आला. असे सांगितले जाते की येथील पूर्वीचे मंदिर हे केवळ गर्भगृह व त्यात काळभैरनाथांची मूर्ती असे होते. त्यानंतर त्यापुढे अंतराळ, त्याच्यापुढे सभामंडप अशी टप्प्याटप्प्याने कामे करण्यात आली. याशिवाय मंदिराच्या प्रांगणात धार्मिक कार्यक्रमांसाठी भव्य सभामंडप उभारण्यात आला. मंदिराच्या शेजारी विठ्ठल–रुक्मिणी, श्रीदत्त व तुळजाभवानी अशी मंदिरे आहेत.
चैत्र वद्य प्रतिपदेला येथील यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेसाठी ग्रामस्थ प्रवरा संगमावर जाऊन कावडीने येथे पवित्र जल घेऊन येतात. या पाण्याने सकाळी भैरवनाथांना अभिषेक केल्यानंतर यात्रोत्सव सुरू होतो. रात्री १२ वाजता देवाचा छबिना (पालखी) निघतो. छबिना निघण्याआधी देवाचा कौल घेतला जातो. त्यानुसार येथील मध्यम आकाराचा दगड (स्थानिक भाषेत त्याला ‘गोटी’ म्हणतात) ११ भाविकांनी एकत्र येऊन प्रत्येकी केवळ एका बोटाचा वापर करून तो वर उचलायचा असतो. तसा उचलता आला तर देवाने कौल दिला, असे समजून छबिना पुढे मार्गस्थ होतो. ‘भैरवनाथांच्या नावानं चांगभलं’ अशा जयघोषात मिरवणूक रात्रभर सुरू असते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा भरतो, त्यात नामवंत मल्ल भाग घेतात. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला काळभैरवनाथ जन्मोत्सवाचा कार्यक्रमही येथे उत्साहात साजरा होतो. त्यावेळी ७ दिवस अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतात. या २ दिवसांत येथे २ लाखांहून अधिक भाविक काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी येतात, अशी नोंद आहे.
येथील विशेष बाब म्हणजे येथे देवाला फूल (कौल) लावण्याची प्रथा आहे. त्यानुसार मनात इच्छा ठेऊन मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूला फूल लावले जाते. उजवीकडील फूल खाली पडले तर देवाने कौल दिला, अशी समजूत आहे. दररोज सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात काळभैरवनाथांची आरती होते. राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्राच्या ‘क’ दर्जाच्या यादीत या देवस्थानाचा समावेश झालेला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून १ लाखांहून अधिक व ४ लाखांहून कमी भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त होतो.)