पारनेर ही पराशर ऋषींची यज्ञभूमी म्हणून परिचित आहे. पराशर ऋषींच्या नावावरून पुढे पारनेर हे नाव पडले. या परिसरात महादेवांची १२ मंदिरे असून ती पारनेरची १२ ज्योर्तिलिंगे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पारनेर हे गाव ‘प्रतिकाशी’ म्हणूनही ओळखले जाते. या ज्योर्तिलिंगांपैकी सिद्धेश्वर वाडी येथील २ डोंगरांच्या दरीत असलेले सिद्धेश्वर मंदिर हे प्राचीन व जागृत स्थान समजले जाते.
पारनेरहून सिद्धेश्वर वाडी या गावात जाताना सिद्धेश्वर देवस्थानाची कमान लागते. तेथून काही अंतरावर असलेले सिद्धेश्वर मंदिर हे यादवकालीन वास्तू असल्याचे सांगितले जाते. १८ व्या शतकात पेशव्यांचे सरदार नगरकर यांनी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. २३ मे १७३९ रोजी चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसईची लढाई जिंकून पोर्तुगीजांचे त्या परिसरातील वर्चस्व नष्ट केले. या मोहिमेवरून आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या पितळी घंटा महाराष्ट्रातील काही मंदिरांमध्ये असून त्यापैकी एक या सिद्धेश्वर मंदिरात आहे.
मंदिराबाबत आख्ययिका अशी की पारनेर हा परिसर पूर्वी दंडकारण्यात होता. येथे पराशर ऋषींचा आश्रम होता. या परिसरात ते यज्ञ, हवन असे विधी करीत असत; परंतु येथे असलेल्या राक्षसांच्या उपद्रवामुळे त्यांचे कार्य सिद्धीस जात नव्हते. वनवास काळात असताना श्रीराम जेव्हा दंडकारण्यात आले तेव्हा पराशर ऋषींनी ही व्यथा त्यांना सांगितली. पराशर ऋषींना आश्वस्त करून श्रीराम राक्षसांच्या संहारासाठी सज्ज झाले. श्रीरामांच्या पराक्रमामुळे राक्षसांचा पराभव झाला. त्यानंतर पराशर ऋषींचा यज्ञ सिद्धीस गेला. त्यावेळी पराशर ऋषींनी श्रीरामांना विनंती केली, ‘तुमच्यामुळे माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. त्यामुळे तुमच्या हस्ते येथे कार्यसिद्धीस नेणाऱ्या सिद्धेश्वराची स्थापना करावी.’ पराशर ऋषींच्या विनंतीनुसार श्रीरामांनी येथे महादेव मंदिराची स्थापना केली. तेच हे आजचे सिद्धेश्वर मंदिर होय.
दोन डोंगरांच्या दरीमध्ये असलेल्या या मंदिर परिसराचे पावसाळ्यातील सौंदर्य अवर्णनीय भासते. मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरांमध्ये पवनऊर्जेचे उंचच उंच असंख्य खांब दिसतात. त्याखाली असलेल्या दरीत घनदाट वृक्षांच्या मधोमध सिद्धेश्वर मंदिर आहे. निसर्गसमृद्ध वातावरण व बाजूने खळाळत वाहणारे पाणी असा हा परिसर प्रसन्न भासतो. मंदिराजवळून वाहणाऱ्या नदीवरील पुलावरून मंदिराकडे जाता येते. मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र फरसबंदी आहे.
नंदी मंडप, सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. काहीशा उंच असलेल्या नंदी मंडपातील नंदीवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. या नंदीच्या आयाळीमध्ये वीणाधारी नारद असून नारद व नंदी एकाच दगडात कोरलेले दिसतात. नंदीवरील घुंगरमाळ, लहान–लहान घंटांचा हार व दोरखंड दगडाचे असूनही ते खरे असावेत असे भासतात. सभामंडपात मध्यभागी दगडी कासवाची मूर्ती आहे. त्या शेजारी चक्रधर स्वामींचे बसण्याचे स्थान होते, असे सांगितले जाते. गाभाऱ्यातील शिवलिंग ८ व्या ते ९ व्या शतकातील असावे, असा अभ्यासकांचा दावा आहे. गाभाऱ्याच्या वितानावर (छत) सुंदर कलाकुसर दिसते. सभामंडप व गाभाऱ्यावर स्वतंत्र कळस असून गाभाऱ्याचा कळस वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो कागदाच्या घड्या करून ते एकमेकांवर ठेवल्याप्रमाणे भासतो. दगडांच्या अनेक थरांवर लहान–लहान कळस लावून हा संपूर्ण कळस बनविण्यात आले आहे. मुख्य मंदिराच्या बाजूला एका मंदिराचे केवळ शिखर दिसते. हे शंकराचे मंदिर जमिनीखाली असून त्या शिखराजवळून खाली असलेल्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. जमिनीपासून साधारणतः १५ फूट खाली असलेल्या या मंदिराच्या शिखराला अनेक गवाक्ष (झरोके) असून त्यातून मंदिराच्या गाभाऱ्यात सूर्यप्रकाश पोचतो. तेथे शिवलिंग व पार्वतीची मूर्ती आहे.
मंदिर परिसरात उंच कपारीत असलेल्या एका कोरीव गुहेत दत्तगुरुंचे स्थान आहे. याशिवाय येथे पेशवेकालीन धर्मशाळा आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिवलिंगांसह महिषासुरमर्दिनी, शंकर–पार्वती, विष्णू–लक्ष्मी व गणपती आदी प्राचीन मूर्ती आहेत.
मंदिराच्या प्रांगणातून नदीपात्राकडे उतरण्यासाठी १८ दगडी पायऱ्या आहेत. खाली आल्यावर जमिनीच्या आतील भागात आणखी एक दगडांत कोरलेले मंदिर दिसते. असे सांगितले जाते की या मंदिरात बसून पराशर ऋषी तपश्चर्या करीत असत. सध्या या मंदिरात पराशर ऋषी यांचे छायाचित्र, नंदी व शिवलिंग स्थापित आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चक्रधर स्वामींचे स्थान आहे. चक्रधर स्वामींचे या ठिकाणी ७ दिवस वास्तव्य होते, असा उल्लेख ‘लीळा चरित्रा’त आहे. मंदिराच्या बाजूलाच एक लहानसे कुंड आहे, त्याला ‘सीता न्हाणी’ असे म्हटले जाते. या कुंडातून कायम पाणी वाहत असते. सीता न्हाणीच्या बाजूला मध्यम आकाराचे चौकोनी बारव असून त्यात उतरण्यासाठी चारही बाजूने पायऱ्या आहेत.
महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासून येथे पूजा, अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम सुरू होतात. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी येथे जत्रा भरते. या दिवशी होणाऱ्या उत्सवात शंकराच्या नीळकंठ व नटराज रूपांची पूजा करण्यात येते. या विशेष सोहळ्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. मंदिरात दररोज सकाळी ६ वाजता आरती होते. सकाळी ५.३० पासून सायंकाळी ७ पर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.