अहमदनगर जिल्ह्यात काळभैरवनाथांची अनेक भव्य मंदिरे आहेत; परंतु पारनेर तालुक्यातील पुणेवाडी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच गावात जेमतेम १०० मीटर अंतरावर दोन काळभैरवनाथांची मंदिरे आहेत. त्यापेकी एक मंदिर डोंगरावरील कातळात कोरलेले असून दुसरे भव्य मंदिर याच डोंगराच्या पायथ्याशी स्थित आहे. काळभैरवनाथांची ही मंदिरे प्रसिद्ध असून दररोज शेकडो भाविक येथे दर्शनाला येतात.
मंदिराची आख्यायिका अशी की पुणेवाडी गावातील पद्मावती नावाची महिला काळभैरवनाथांची निस्सीम भक्त होती. दररोज सकाळी गावाच्या डोंगरावर असलेल्या काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी ती जात असे, त्यानंतरच ती इतर दैनंदिन कामे करत असे. तिचा हा दिनक्रम अनेक वर्षांपासून सुरू होता. तिच्या या निर्मळ भक्तीने एके दिवशी काळभैरवनाथ प्रसन्न झाले व तिला वर मागण्यास सांगितले. त्यावर पद्मावतीने आपल्या घरच्या देव्हाऱ्यात स्थानापन्न व्हावे, अशी देवाकडे इच्छा व्यक्त केली.
पद्मावतीच्या मागणीला देवानेही ‘तथास्तु’ म्हणत तिच्यासोबत येण्याचे मान्य केले; परंतु असे करताना देवाने तिच्यासमोर अट ठेवली. त्यानुसार काहीही झाले तरी तुझे घर येईपर्यंत तू कुठे थांबायचे नाही अथवा मागे वळून पाहायचे नाही. जर तू थांबलीस वा मागे वळून पाहिलेस तर तू तेथेच शिळा होऊन पडशील. पद्मावतीने काळभैरवनाथांची ही अट मान्य करून ती गावातील घराकडे चालू लागली. भैरवनाथ तिच्या मागे डोंगराच्या पायथ्याशी येताच विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यामुळे घाबरून ती डोंगराच्या पायथ्याशी थांबली. त्यानुसार देवही तेथेच थांबले. जेथे देव थांबले तेथे काळभैरवनाथांची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली व जेथे पद्मावती थांबली होती तेथे तिची शिळा झाली. गावकऱ्यांनी काही वर्षांनी या जागेवर काळभैरवनाथांचे भव्य मंदिर बांधले. या मंदिर परिसरातच पद्मावतीची शिळा आहे.
पारनेर–कान्हूर मार्गावर पारनेरपासून जवळ असलेले पुणेवाडी येथील काळभैरवनाथांचे मंदिर अतिशय जागृत स्थान समजले जाते. मुख्य रस्त्याला असलेल्या भव्य कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात फरसबंदी असून त्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर भासतो. मंदिरासमोर असलेल्या उंच दीपमाळेसमोर त्याच उंचीचे काळभैरवनाथांचे दुमजली मंदिर आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला हे स्वरूप आले आहे. जमिनीपासून ४ ते ५ फूट उंच जगतीवर (पाया) या मंदिराचे बांधकाम आहे. ७ ते ८ पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जाता येते.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या असून वरच्या बाजूला नगारखाना आहे. या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून त्यात शुभ्र संगमरवरी नंदी आहे. या नंदीवर असलेल्या दगडी लाल रंगाच्या झालरीमुळे त्याचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. सभामंडपातील खांब व भिंतींवर सुंदर कलाकुसर आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस सुमारे २० ते २५ मोठ्या पितळी घंटा व नगाराही आहे. आरतीच्या वेळी या घंटांचा व नगाऱ्याचा वापर करण्यात येतो.
गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर आकर्षक कलाकुसर असून ललाटबिंबावर शिवपिंडी कोरलेली दिसते. ही शिवपिंडीही वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामागे प्रभावळ कोरलेली आहे. अशा पद्धतीचे ललाटबिंब शंकराच्या व काळभैरवनाथांच्या मंदिरात इतरत्र सहसा पाहायला मिळत नाही. गर्भगृहात चांदीच्या मखरात काळभैरवनाथांची शेंदूरचर्चित दगडी शिळा असून तेथे एक शिवलिंगही आहे.
मंदिराचा कळस ६० ते ७० फूट उंचीचा आहे. या गोलाकार कळसामध्ये अनेक देवड्यांची रचना करण्यात आली असून त्या प्रत्येक देवडीमध्ये विविध देवता, ऋषी यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. कळसासह या मूर्तींनाही सुंदर रंगकाम केल्यामुळे त्या वैशिष्ट्यपूर्ण भासतात. मंदिराच्या प्रांगणात पद्मावतीचे समाधीस्थळ असून त्यामध्ये तिची शिळा आहे.
या मंदिराच्या बाजूने डोंगरावर असलेल्या काळभैरवनाथ मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. सुमारे २५० ते ३०० पायऱ्या चढून डोंगरातील कातळात असलेल्या काळभैरवनाथ मंदिरात जाता येते. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त येथे फार मोठी यात्रा भरते. यावेळी एक लाखांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात, अशी नोंद आहे. यात्रोत्सवात भैरवनाथांची पालखी काढण्यात येते. त्यावेळी आबालवृद्धांसह सर्वजण त्यात सहभागी होतात. या उत्सवाच्या वेळी डोंगरावरील मंदिरापासून ते पायथ्याशी असलेल्या मंदिरापर्यंत आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते. ही दोन्ही मंदिरे या रोषणाईने उजळून निघतात. या परिसराला तेव्हा जत्रेचे स्वरूप आलेले असते. मंदिर समितीतर्फे आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. या उत्सवानिमित्त येथे होणारी बैलगाड्यांची शर्यत प्रसिद्ध असून त्यात भाग घेण्यासाठी शेकडो बैलगाड्या येथे येतात.