अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावे ऋषी–मुनींमुळे परिचित आहेत. अगस्ती ऋषींमुळे अकोले, पराशर ऋषींमुळे पारनेर, तसेच मांडव्य ऋषींमुळे मांडवगण गावाला नावलौकिक मिळाला आहे. मांडव्य ऋषींची तपोभूमी आणि कर्मभूमी असलेले श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण हे गाव सिद्धेश्वर देवस्थानासाठी ओळखले जाते. मांडव्य ऋषींच्या तपसामर्थ्यामुळे प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर आणि काशीची गंगा येथे अवतरली, असे सांगितले जाते.
एकेकाळी अतिशय समृद्ध आणि वैभवशाली गाव म्हणून मांडवगणची ओळख होती. या वैभवाच्या खुणा आजही ठिकठिकाणी पाहायला मिळतात. येथील कटाक्षा आणि वटाक्षा नद्यांच्या संगमावर व चिंचेच्या बनात सिद्धेश्वर देवस्थान स्थित आहे. असे सांगितले जाते की प्राचीनकाळी उत्तर आणि दक्षिण भारतातील तीर्थस्थळांना जोडणारा मार्ग मांडवगणमधून जात होता. त्यामुळे अनेक संत–महंत या तीर्थक्षेत्री वास्तव्याला असत. समर्थ रामदासांचे शिष्य जयरामस्वामी, संत कैकाडी महाराज, रामदास महाराज यांचा जन्म मांडवगणमध्येच झाला.
तीर्थक्षेत्रासोबतच मांडवगण ही शूरवीरांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. निजामशाहीतील शक्तिशाली माळोजीराजे यादव (देशमुख) याच गावातील. आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी निजामशहाकडून ३६० गावांचे देशमुखी इनामी वतन आणि ‘भूपतीराव’ हा मानाचा किताब मिळवला होता. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.
सिद्धेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की मांडव्य ऋषी एकदा काशी येथे गेले असता त्यांनी काशी विश्वेश्वराला आपल्या गावी निंबोडी येथे येण्याची विनंती केली. मांडवगणपासून जवळ असलेले हे निंबोडी गाव मांडव्य ऋषींची तप आणि यज्ञ करण्याची भूमी होती. ऋषींच्या विनंतीवरून काशी विश्वेश्वर व गंगा नदी त्यांच्या मागोमाग निघाली. गाव जवळ आल्यावर मांडव्य ऋषींनी खात्री करण्यासाठी मागे वळून पाहिले. त्याच क्षणी महादेव अदृश्य झाले व त्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले. तेच आजचे मांडवगण येथील सिद्धेश्वर क्षेत्र. या मंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या गुहेतून गंगा वाहू लागली. हे स्थान ‘काशी आई’ म्हणून प्रसिद्ध आहे. आजही हे पाणी तेथून सिद्धेश्वराच्या पिंडीपर्यंत येते.
पेशव्यांचे सरदार आणि अक्कलकोटच्या महाराजांचे दिवाण कोनाप्पा नाईक यांनी १७५० साली सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून तटबंदी, दीपमाळ आणि पंचायतन मंदिरांची उभारणी केली. अक्कलकोट येथील राजे शहाजीराव भोसले यांच्या पत्नी सखूबाई यांनी १७६७ साली सिद्धेश्वराला चांदीची मूर्ती (मुखवटा) भेट दिली होती. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती उत्सवावेळी सिद्धेश्वराच्या पिंडीवर ही चांदीची मूर्ती ठेवण्यात येते. सुमारे २५० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
२ नद्यांच्या संगमावर व डोंगरपायथ्याशी असलेल्या सिद्धेश्वर मंदिर परिसराला तटबंदी आहे. तटबंदीतून आत शिरल्यावर मंदिराच्या उद्यानात प्रवेश होतो. अनेक शोभेची झाडे व विविध रंगांच्या फुलांमुळे हा परिसर सुंदर व प्रसन्न भासतो. येथील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या उद्यानातून पुढे मंदिराकडे जाताना आडवी दगडी तुळई (भिंत) आहे. तिची उंची अतिशय कमी असून तेथून प्रत्येकाला वाकूनच मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करावा लागतो.
मंदिर प्रांगणात प्रवेश केल्यावर विटा आणि चुन्याचा वापर करून बांधलेली अष्टकोनी दीपमाळ दिसते. एका चौथऱ्यावर उभी असलेली ही दीपमाळ ४९ फूट उंचीची (५ मजली इमारतीइतकी) असून दीपमाळेच्या आतून पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून दीपमाळेच्या टोकावर गेल्यावर तेथील भिंत हलवली असता संपूर्ण दीपमाळ हालू लागते. अशा प्रकारची हालणारी दीपमाळ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील राशीनच्या रेणुकामाता मंदिरासमोरही आहे. या दीपमाळा कशा हलतात, याचे रहस्य अजून उलगडलेले नाही. उत्सवकाळात या दीपमाळेवर मशाल पेटवली जाते. दीपमाळेच्या बाजूला मंदिराचे भव्य व वैशिष्ट्यपूर्ण असे ५ मजली प्रवेशद्वार आहे. या महाद्वाराच्या वरच्या मजल्यांवरून संपूर्ण परिसराचे विहंगम दृश्य दिसते. एका बाजूला सुंदर उद्यान, तर दुसरीकडे सिद्धेश्वर मंदिर दृष्टीस पडते. महाद्वाराच्या डाव्या बाजूला नगारखाना आणि मध्यभागी हेमगिरीबुवांची संजीवन समाधी आहे. असे सांगितले जाते की हेमगिरीबुवा आणि त्यांचे शिष्य टिकेगिरी महाराज १७३२ मध्ये मांडवगणला आले होते. त्यांनी सुमारे १६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर १७४८ मध्ये येथेच समाधी घेतली.
सिद्धेश्वराचे मूळ मंदिर हेमाडपंती शैलीतील असले तरी २००९ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. प्रवेशद्वारावरील मुख्य दीपमाळेव्यतिरिक्त मंदिराजवळ आणखी २ दीपमाळा आहेत. त्यातील एक चुनखडी दगडांत, तर दुसरी घडीव दगडांत बांधलेली दिसते. मंदिरासमोरील वैशिष्ट्यपूर्ण तुळशी वृंदावन हे राजस्थानातून आणलेल्या गुलाबी दगडांचा वापर करून तयार करण्यात आले आहे.
मुख्य मंदिरासमोर चौथऱ्यावर नंदी विराजमान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी असून त्याच्या बाजूला अनेक शिल्पे कोरलेली दिसतात. सभामंडपाच्या मध्यभागी भल्या मोठ्या आकारातील काळ्या पाषाणात घडवलेले कासव आहे. डावीकडे श्री चक्रधर स्वामींचे आसन आहे. असे सांगितले जाते की १२६७ नंतर ते मांडवगणला आले असावेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गणपती व मारुतीच्या मूर्ती आहेत. हे प्रवेशद्वार रंगीत बिलोरी काचा आणि आरशांच्या तुकड्यांनी सजवलेले आहे. गर्भगृहात काशी विश्वेश्वराची स्वयंभू पिंड असून त्याच्याभोवती गंगा वाहते. असे सांगितले जाते की येथून १०० मीटरवर असलेल्या काशी आईचं हे पाणी १९३० मध्ये गोविंदराव बळवंतराव यादव (देशमुख) यांनी मातीच्या जलवाहिनीद्वारे गाभाऱ्यापर्यंत आणले. ९० वर्षांनंतरही ही जलवाहिनी सुस्थितीत आहे.
सभामंडपाच्या शेजारी काळभैरव, खंडोबा आणि शेषनागाची मंदिरे आहेत, तर मंदिराच्या आवारात गणपती, सूर्यनारायण, शनिदेवता, लक्ष्मीनारायण, दत्त आणि भगवतीमाता यांची मंदिरे आहेत. या परिसरात ओवऱ्या असून धार्मिक विधी करण्यासाठी व बाहेरून आलेल्या भाविकांच्या निवासासाठी त्यांचा वापर होतो. मंदिराच्या दक्षिणेकडे बारव असून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी ती बांधून दिल्याची नोंद आहे.
मांडवगणला ज्यांच्यामुळे ओळख मिळाली त्या मांडव्य ऋषींची समाधी मंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर आहे. नदी ओलांडून तेथे जावे लागते. तेथे मोठ्या चौथऱ्यावर असलेल्या मंदिरात मांडव्य ऋषींची मूर्ती आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ते पौर्णिमेदरम्यान श्री सिद्धेश्वराची यात्रा भरते. या ५ दिवसांत हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यात्रोत्सवात येथे रोज रात्री कीर्तन होते. पौर्णिमेला काल्याच्या कीर्तनाने यात्रेची सांगता होते. याशिवाय विजयादशमीचा उत्सवही येथे साजरा होतो.