महाराष्ट्रात एक गाव असे आहे, जेथे आपल्या मुलाचे नाव मारुती, हनुमान वा पवन असे ठेवले जात नाही. या गावात मारुतीचे मंदिर तर नाहीच, शिवाय कोणी तेथे मारुतीचे नावही घेत नाही. तो अपशकुन समजला जातो. गावाचे वेगळेपण म्हणजे येथे चक्क दैत्याचे मंदिर असून सर्वजण त्याचीच पूजा करतात. ही प्रथा रामायण काळापासून पाळली जात असल्याचे सांगितले जाते. या दैत्य मंदिराच्या नावावरून या गावाला ‘दैत्यनांदूर’ हे नाव पडले आहे. हा दैत्य नवसालाही पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
राज्यात मारुतीचे मंदिर असलेली बहुसंख्य गावे आहेत; परंतु त्याला अपवाद आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव. मुलखावेगळे हे गाव गर्भगिरीच्या डोंगररांगेत वसले असून भगवान गडापासून हाकेच्या अंतरावर आहे. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निंबादैत्य मंदिर हे दुमजली आहे. त्यामुळे असे सांगितले जाते की गावात कुणीही दुमजली घर बांधत नाहीत. याशिवाय मारुती नावाशी साधर्म्य असलेली गाडीही खरेदी केली जात नाही.
या मंदिराची आख्यायिका अशी की रावणावर विजय मिळवून श्रीराम लंकेहून सीतेला अयोध्येला घेऊन जातात. परंतु काही कारणाने त्यांना सीतेला पुन्हा जंगलात पाठवावे लागणार होते. तेव्हा ही जबाबदारी त्यांनी हनुमंतावर सोपविली. हनुमंत व सीता येथील दंडकारण्यात असलेल्या काशी केदारेश्वर (सध्याचे पाथर्डी तालुक्यात असलेले स्थान) या ठिकाणी आले. सीतेसाठी फळे शोधत असताना हनुमंत निंबादैत्य राक्षसाचे वास्तव्य होते, त्या भागात जाऊन फळे तोडण्यास सुरुवात करतो. परवानगी न घेता आपल्या राज्यातील संपत्तीची कोणीतरी चोरी करत आहे, हे निंबादैत्याच्या लक्षात येते. त्याला राग येतो व तो हनुमंताला युद्धासाठी आव्हान देतो. हनुमंतही गदा घेऊन त्या निंबादैत्यावर चाल करतो. यावेळी या दोघांमध्ये घनघोर युद्ध होते. त्यात दोघेही जखमी होतात; परंतु कोणीही पराभूत होत नव्हते. एका क्षणी जखमी अवस्थेतील निंबादैत्य श्रीरामांचा धावा करतो. आपल्या परमेश्वराचे नाव निंबादैत्याच्या मुखातून ऐकल्यावर हनुमंत आश्चर्यचकित होतो. त्याचवेळी निंबादैत्याचा धावा ऐकून श्रीराम प्रकट होतात. श्रीरामांनी निंबादैत्याच्या शरीरावरून हात फिरविल्यानंतर त्याच्या अंगावरील जखमा पूर्णपणे बऱ्या होतात. निंबादैत्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीराम त्याला वर देतात, ‘यापुढे या गावात हनुमंताचे नावही घेतले जाणार नाही. येथे फक्त तुझीच पूजा होईल.’
गावातील नदीच्या किनाऱ्यावर असलेले निंबादैत्य मंदिर दगडी बांधकामाचे असून ते १६ व्या शतकातील असावे. सभामंडप व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. गर्भगृहात निंबादैत्याची दगडी मूर्ती आहे. उत्सवाच्या वेळी याला चांदीचा मुकुट व अलंकार परिधान केले जातात.
निंबादैत्य महाराजांचे कुळ राक्षसाचे असले तरी त्यांना दररोज शाकाहारी नैवेद्य दाखविला जातो. दररोज दुपारी १२ वाजता गावातील एका घरातून येथे पुरणपोळीचा नैवेद्य आणला जातो. प्रत्येक शनिवारी होणाऱ्या येथील आरतीला शेकडो भाविक उपस्थित असतात. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथील अनेक घरांवर वा वाहनांवर ‘दैत्याची कृपा, दैत्य प्रसन्न’ असे लिहिलेले असते. निंबादैत्य महाराज येथील अनेक कुटुंबांचे कुलदैवत असून दैत्यनांदूरचे ते ग्रामदैवत आहे.
निंबादैत्य महाराजांचा जत्रोत्सव गुढीपाडव्यापासून ३ दिवस असतो. त्यांच्या दर्शनाने येथील भाविक नववर्षाची सुरुवात करतात. ३ दिवस चालणाऱ्या या यात्रेचा मुख्य दिवस हा गुढीपाडवा असतो. या दिवशी कावडीतून आणलेल्या गंगेच्या पाण्याने निंबादैत्य महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केला जातो. याशिवाय छबिना (मिरवणूक), कुस्ती स्पर्धा, महाआरती असे विविध कार्यक्रम यावेळी होतात. नोकरी–व्यवसायानिमित्त देश–परदेशात असलेले येथील नागरिकही या उत्सवासाठी हमखास येथे येतात.