काळभैरवनाथ मंदिर 

आगडगाव, ता./जि.अहमदनगर

अहमदनगर शहरापासून काही अंतरावर आगडगाव नावाचे लहानसे गाव आहे. चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथील काळभैरवनाथांच्या मंदिरात मोठी जत्रा भरते. जागृत देवस्थान असल्यामुळे हजारो भाविक या दिवशी येथे दर्शनाला येतात; परंतु दूरवरून आलेले सर्व भाविक सायंकाळ झाली की त्वरेने आपापल्या घरी निघतात. गावातील मंडळीही गावाबाहेर असलेल्या मंदिर परिसरातून गावात परततात. दुसऱ्या दिवशी कोणीही भाविक या मंदिराकडे फिरकतही नाहीत, कारण त्या दिवशी येथे चक्क भुतांची जत्रा भरते. महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण आहे, जेथे भुतांची जत्रा भरते, अशी मान्यता आहे.

आगडगाव येथील काळभैरवनाथांचे मंदिर प्राचीन असून या मंदिराच्या बांधकामात मोठमोठ्या दगडांचा वापर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांचे काम दगडांमध्ये झालेले आहे; परंतु बांधकामात अशा प्रकारचे मोठ्या आकाराचे दगड अभावानेच दिसतात. त्यामुळे हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या राक्षसांनी वा भुतांनी बांधले असावे, असे मानले जाते. एका आख्यायिकेनुसार, आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी देवाच्या आज्ञेवरून एका रात्रीत या मंदिराचे बांधकाम केले आहे. मंदिर परिसरात आगडगाव, रतडगाव आणि देवगाव अशी तीन गावे शेजारी शेजारी आहेत. आणखी एक बाब म्हणजे या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांची मुंडकी कोरलेली आहेत. त्यावरूनही या मंदिराचे बांधकाम राक्षसांसारख्या अफाट शक्तींनी केलेले असावे, याला बळ मिळते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

चोहोबाजूंनी डोंगर आणि मधील दरीत काळभैरवनाथांचे मंदिर आहे. या परिसरात अनेक प्राचीन वृक्ष आहेत. चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथील जत्रा झाल्यावर सोमवारी येथे भुतांची जत्रा भरते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी मंदिर परिसरात कोणी जाऊ नये, असा संकेत आहे. हा संकेत पाळण्यासाठी कोणावर सक्ती केली जात नसली तरी गावकरी अनेक पिढ्यांपासून हा संकेत पाळतात. भुतांची जत्रा म्हणजे नेमके काय, या उत्सुकतेपोटी अनेकदा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विविध कारणांनी त्याला यश आले नाही.

आगडगावमधील भुतांची जत्रा नेमकी कधीपासून सुरू झाली याची माहिती उपलब्ध नसली तरी येथील वयोवृद्धांच्या म्हणण्याप्रमाणे, खूप वर्षांपूर्वी या गावातील गोपीनाथ कर्पे हे यात्रेच्या दिवशी काळभैरवनाथ मंदिरातील दीपमाळेजवळ तेलाची घागर विसरले. दुसऱ्या दिवशी रात्री आठवण झाल्यानंतर ते घागर आणण्यासाठी मंदिराजवळ गेले. तेव्हा त्यांना तेथे विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या. त्यांनी ही माहिती त्यावेळी गावकऱ्यांना दिली होती. त्यांच्या पिढीतील अनेक जण या माहितीला दुजोरा देतात.

भुतांच्या यात्रेची आख्यायिका असली तरी हे स्थान जागृत तीर्थक्षेत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी होते. आलेल्या भाविकांना येथे दुपारी १२.१५ ते वाजेपर्यंत आमटीभाकरी दिली जाते. भुतांच्या यात्रेसोबतच हे मंदिर आमटीभाकरीच्या महाप्रसादासाठीही प्रसिद्ध आहे. येथे देण्यात येणाऱ्या महाप्रसादासाठी देणगी देणाऱ्या भाविकांसाठी प्रतीक्षा यादी आहे. महाप्रसादासाठी कोणा भाविकाला नव्याने देणगी द्यायची असेल तर त्यासाठीही त्याला अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते.

खोलगट भागात असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी काही पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिराचा परिसर प्रशस्त असून त्यात भाविकांसाठी दुमजली अन्न छत्रालय, भक्त निवास, दर्शन रांगेची सुविधा मंदिर कार्यालय आहे. मंदिर परिसरात फरसबंदी असून मुख्य मंदिराची रचना दर्शन मंडप, सभामंडप गर्भगृह अशी आहे. दर रविवारी हजारो भाविकांची येथे गर्दी असल्यामुळे अनेक भाविक येथील दर्शन मंडपातून काळभैरवनाथांचे मुखदर्शन करतात. दर्शन मंडपाजवळ दीपमाळ आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस तीन मुंडकी कोरलेली आहेत. ती आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांची असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ जोगेश्वरी मातेच्या काळ्या दगडातील प्राचीन अर्धमूर्ती आहेत.

मंदिराच्या शेजारी जुने कडुनिंबाचे झाड आहे. याचे वैशिष्ट्य असे की त्या झाडाची पाने गोड लागतात. त्याला बहर येतो, पण लिंबोळ्या लागत नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून त्या वृक्षापासून एकही दुसरे रोपटे तयार झालेले नाही. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या झाडाच्या पानांनी झाकून ठेवले असता त्याचे विष उतरते, अशी येथे श्रद्धा आहे

या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले हे निश्चित सांगता येत नसले तरी देवस्थानाजवळ असलेल्या २४ समाध्यांवरून २४ पिढ्यांपेक्षा जुना इतिहास याला असल्याचे मानले जाते. दररोज सकाळी ते रात्री वाजेपर्यंत या मंदिरातील काळभैरवनाथ जोगेश्वरी मातेचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • अहमदनगरपासून १७ किमी अंतरावर
  • अहमदनगरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • भाविकांसाठी भक्त निवासाची सुविधा
  • दर रविवारी आमटीभाकरीच्या प्रसादाची सोय
Back To Home