विशाल गणपती मंदिर,

माळीवाडा, नगर शहर, जि. अहमदनगर

अहमदनगर शहराचे नाव पूर्वी अंबिकानगर होते. या शहराच्या दक्षिणेकडील माळीवाडा भागात शहराचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले प्राचीन विशाल गणपती मंदिर आहे. जागृत स्थान व नवसाला पावणाऱ्या या गणपतीचा शहराच्या गणेशोत्सव मिरवणुकीत पहिला मान असतो. येथील गणपतीची मूर्ती तब्बल ११.५ फूट उंचीची असून हे मंदिरही ७५ फूट उंचीचे आहे.

माळीवाड्यात हा गणपती ९०० ते ९५० वर्षांपासून अस्तित्वात आहे. १२ व्या शतकातील त्याच्या अस्तित्वाचे पुरावे मोडी लिपीत उपलब्ध आहेत. १४९० मध्ये अंबिकानगर (अहमदनगर) शहराची स्थापना झाल्याचे सांगितले जाते, पण त्याच्याही आधी सुमारे २०० ते २५० वर्षांपासून माळीवाड्यात विशाल गणपती मंदिर असल्याच्या नोंदी त्या कागदपत्रांमध्ये आहेत. या मंदिराची स्थापना कोणी केली, याबाबत माहिती उपलब्ध नसली तरी या नोंदींमध्ये देवाची पूजा-अर्चा, देवाची जमीन, खर्च-उत्पन्न अशी माहिती आहे. अहमदनगरमधील उद्योजक व हॉटेल व्यावसायिक विनायक नामदेवराव कोके-पाटील यांच्याकडे हे दस्तावेज उपलब्ध आहेत.


या मंदिराची आख्यायिका अशी की श्रीराम दंडकारण्यात आले असताना त्यांनी या गणपतीची पूजा केली होती. औरंगजेब जेव्हा येथे आला तेव्हा त्याने दहशत माजविण्यासाठी या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला; परंतु गणेशाने त्याची प्रचिती दिल्यानंतर औरंगजेबाला त्याच्या कृत्याचा त्रास झाला व त्याने तातडीने या मंदिराच्या दिवाबत्तीची सोय केली होती. तेव्हापासून औरंगजेबही या गणेशाच्या दर्शनाला येऊ लागला. गणेशाच्या या स्वयंभू मूर्तीचा आकार दरवर्षी तिळातिळाने वाढत होता, त्यामुळे ती एवढी मोठी झाली. मूर्ती वाढत राहिली तर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे या मूर्तीच्या डोक्‍यावर खिळा ठोकण्यात आला. तेव्हापासून या मूर्तीची वाढ थांबली. गणेश पुराणातही या मंदिराचा उल्लेख आहे.

अहमदनगर शहरातील गजबजलेल्या भागात हे मंदिर आहे. भव्य अशा या मंदिराचे बांधकाम राजस्थानातील मुस्लिम कारागिरांनी केले आहे. शुभ्र संगमरवराचा वापर करून ही वास्तू उभारण्यात आली आहे. मंदिराला दोन सभामंडप असून पहिल्या सभामंडपाच्या मध्यभागी विशाल गणपतीची मूर्ती आहे. याशिवाय दुसऱ्या सभामंडपात धार्मिक विधी व प्रवचनासाठी मोकळी जागा आहे. याशिवाय या मंदिरात ध्यानगृह व कार्यालय आहे. येथील गणपतीची मूर्ती ११.५ फूट उंच व ७ फूट रुंद अशी भव्य आहे. उजव्या सोंडेची ही मूर्ती चतुर्भुज आहे. बैठकीवर बसलेल्या अवस्थेत असणाऱ्या या मूर्तीच्या एका हातात मोदक, तर उरलेले ३ हात आशीर्वाद मुद्रेत आहेत. एकाच वेळी ३ हातांनी आशीर्वाद देणारी अशी मूर्ती दुर्मिळ समजली जाते. मूर्तीच्या कमरेभोवती नागबंध असून पोटावर शिवलिंग व डोक्यावर पगडी आहे.

हे मंदिर एका नाथपंथीय सत्पुरुषाने स्थापन केले आहे. आई गणेशभक्त होती म्हणून तिच्या स्मरणार्थ त्यांनी हे मंदिर उभारले. त्या सत्पुरुषाची संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्याच्या मागे असून तेथे एक शिवपिंडी आहे. मंदिरात पूजेपासून सर्व विधी नाथपंथाप्रमाणे होतात. असे सांगितले जाते की गणेशाची नाथपंथीय पूजापरंपरा येथे १०० वर्षांहूनही आधीपासून सुरू आहे. गुरू गेंडानाथ महाराजांच्या आधीपासून चालत आलेली ही परंपरा आजही सुरू आहे. नाथ परंपरेनुसार गणपती नवनाथांपैकीच एक मानला जातो. त्यामुळे नाथपंथीय मंत्रोच्चारानुसार रोज सकाळी व संध्याकाळी विशाल गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनेही पूजा-आरती होते. ओंकार आदिनाथ, उदयनाथ पार्वती, सतनाथ ब्रह्मा, संतोषनाथ विष्णू, अचेले अचंबे नागनाथ, गजभेली गजकंथडनाथ म्हणजे गणपती, ग्यानपारखी सिद्धचंद्रमा चौरंगीनाथ, मायास्वरुपी दादा मच्छिंद्रनाथ व ज्योतीस्वरुपी गुरू गोरक्षनाथ असे नऊ नाथ या परंपरेत आहेत. नाशिक येथील कुंभमेळ्याच्या काळात अनेक नाथपंथीय साधू येथे आसरा घेतात. कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी ते आवर्जून या गणेशाचे दर्शन घेतात.

गणेश जयंती, संकष्ट चतुर्थीला येथे पहाटेपासून भाविकांचा राबता असतो. दररोज रात्री ७.४५ ते ८.३० या दरम्यान नाथ संप्रदायाप्रमाणे होणाऱ्या आरतीच्यावेळी नगाऱ्यासह विशिष्ट वाद्ये वाजविली जातात. यावेळी शेकडो भाविक उपस्थित असतात. गणेशोत्सवात व विसर्जन मिरवणुकीत विशाल गणपतीचा मान पहिला असतो. या उत्सवात पहिल्या दिवशी अहमदनगर जिल्हा पोलिस प्रमुखांच्या हस्ते येथील पूजा-अर्चा होते, तर उत्तरपूजा ही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येते.


 

उपयुक्त माहिती:

  • अहमदनगर बस स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • राज्यातील अनेक जिल्ह्यांतून अहमदनगरसाठी एसटीची सुविधा
  • निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याच
Back To Home