रेणुका माता मंदिर,

केडगाव, ता. जि. अहिल्यानगर

‘येल्लम्मा’ म्हणून रेणुका मातेची देशभर ओळख आहे. देशात कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात नांदेडमध्ये देवीचे शक्तिपीठ आहे. नांदेडमधील माहूरगडावरील रेणुका देवीचे प्रतिरूप म्हणून केडगावच्या रेणुका मातेची ख्याती आहे. नवरात्रोत्सवात भरणारी येथील यात्रा प्रसिद्ध असून यावेळी लाखो भाविक येथे देवीच्या दर्शनाला येतात.

मंदिराची आख्यायिका अशी की रेणुका मातेच्या आशीर्वादामुळे पूर्वी येथील एका गुरव कुटुंबास पुत्ररत्न झाले. या मुलाचे नाव देवीच्या नावावरून ‘भवानी’ असे ठेवण्यात आले. लहानपणापासून भवानी गुरव देवीच्या पूजा-अर्चेत तल्लीन राहू लागला. अनेकदा तो केडगावहून देवीच्या दर्शनासाठी माहूरगडावर जात असे. त्याच्या या निस्सीम भक्तीवर रेणुका माता प्रसन्न झाली व तुझ्यासोबत मी केडगावला येते, असे सांगितले. मजल दरमजल करत देवी भवानी गुरवसोबत माहूरगडावरून केडगाव येथे आली; परंतु गाव जवळ आल्यावर भवानी गुरवच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे त्याने मागे वळून देवीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देवी तेथेच अंतर्धान पावली व स्वयंभू मूर्तीच्या रूपाने या जागेवर प्रगट झाली. आज जेथे मंदिर आहे त्याच जागेवर ही स्वयंभू मूर्ती प्रगट झाली होती. ही मूर्ती हुबेहूब माहूरगडावरील मूर्तीप्रमाणेच आहे.

असे सांगितले जाते की दैवदैठण येथील निंबराज महाराज काशी यात्रेहून कावडीमध्ये गंगातीर्थ घेऊन परत येत असताना या मंदिरात थांबले होते. त्यांना भूक लागली होती. त्यावेळी गवळणीच्या रूपात येऊन देवीने त्यांना प्रसाद दिला होता. निंबराज महाराजांनी आपल्या शक्तीने जाणले की ही रेणुका माताच आहे. त्यामुळे त्यांनी काशी येथून आणलेली गंगातीर्थाची कावड मंदिरासमोर असलेल्या बारवमध्ये रिकामी केली. त्यामुळे या बारवेचे पाणी गंगातीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यातही या बारवमधील पाणी कमी होत नाही, असे भाविकांचे म्हणणे आहे.

पुणे-अहिल्यानगर मार्गावर अहिल्यानगर शहरापासून जवळच केडगाव येथील गजबजलेल्या परिसरात हे मंदिर असल्याने येथे कायमच भाविकांचा राबता असतो. या वास्तूला भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील मुख्य प्रवेशद्वारासमोर बाहेरच्या बाजूला दीपमाळ असून प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस नगारखाना आहे. तटबंदीच्या आतील बाजूस ओवऱ्या (लहान लहान खोल्या) असून धार्मिक विधी करण्यासाठी व उत्सव काळात विश्रांतीसाठी भाविक त्याचा वापर करतात. मंदिराच्या आवारात छोटेखानी विठ्ठल-रुक्मिणी आणि भैरवनाथ यांची मंदिरे आहेत. रेणुका माता मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात रेणुका मातेची मूर्ती आहे. शेजारी तुळजाभवानीची मूर्ती आहे. रेणुका मातेच्या मूर्तीसमोर भवानी गुरव या भक्ताच्या पादुका आहेत. मंदिराच्या उजवीकडे महादेवाचे मंदिर आहे.

नवरात्र हा येथील प्रमुख उत्सव. या काळात मंदिर परिसरात शेकडो स्त्रिया घटी बसतात. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ६ वाजता देवीचा अभिषेक करण्यात येतो. मंदिर परिसरातील मंगळाई देवी, भवानी गुरव यांच्या पादुका, भैरवनाथ मंदिर पूजन, परशुराम पूजन झाल्यानंतर विधिवत घटस्थापना होते. यावेळी होणाऱ्या महाआरतीसाठी हजारो भाविक उपस्थित असतात. उत्सवकाळात देवीला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात येतात. सातव्या माळेस येथे खूप मोठी यात्रा भरते. यावेळी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. नवमीला होम व दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन झाल्यानंतर परिसरातील गावांतून मानाच्या काठ्या मिरवणुकीने येथे येतात. उत्सवांच्या दिवशी आलेल्या सर्व भाविकांना येथे भोजनाची सुविधा असते. दररोज पहाटे देवीची काकड आरती होते. सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना मंदिरात रेणुका मातेचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • अहिल्यानगर बस स्थानक व रेल्वेस्थानकापासून २ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • राज्यातील अनेक जिल्ह्यांतून अहिल्यानगरसाठी एसटी व रेल्वे सेवा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय

रेणुका माता मंदिर,

केडगांव, त. जिला. अहिल्यानगर

Back To Home