राघवेश्वर मंदिर,

कुंभारी गाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर

कोपरगाव तालुक्यात गोदावरीच्या तीरावर अनेक सुंदर मंदिरे आहेत. या परिसरात लहान-मोठी अशी सुमारे २०० मंदिरे आहेत. त्यामध्ये गुरू शुक्राचार्य मंदिर, संजीवनी पार, कचेश्वर महाराज मंदिर, साईबाबा तपोभूमी, स्वामी जनार्दन महाराज (मौनगिरी), जंगलीदास महाराज, उपासनी महाराज, विभांडक ऋषी आश्रम, श्रृंगेश्वर मंदिर, महानुभव आश्रम, पुणतांबा येथील चांगदेव महाराज समाधी अशा महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

कोपरगावमधील प्राचीन मंदिरांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले राघवेश्वर मंदिर हे गोदावरीच्या पात्रापासून सुमारे २५ फूट उंचीवर आहे. एक एकराच्या प्रशस्त परिसरात हे मंदिर उभे आहे. असे सांगितले जाते की मंदिराखाली सुमारे १०० फूट खोलीपर्यंत दगडांचा भराव टाकलेला असून त्यावर हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र फरशा बसविलेल्या असल्याने हा परिसर सुंदर व स्वच्छ भासतो. मंदिर परिसरात असलेल्या साई जनार्दन मंदिरात श्रीसाईबाबा व जनार्दन स्वामी (मौनगिरी) यांच्या मूर्ती आहेत. राघवेश्वर मंदिराला उत्तरेकडे व पश्चिमेकडे अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते.

महादेवाची पूर्वाभिमुख शाळुंका असलेले राज्यातील एकमेव मंदिर म्हणून कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीच्या तीरावरील साधारणतः १००० वर्षांपूर्वीच्या हेमाडपंती शैलीतील या मंदिरातील गर्भगृहाच्या विशिष्ट रचनेमुळे वर्षातील काही दिवस सूर्योदयाच्यावेळी सूर्याची किरणे थेट शिवपिंडीवर पडतात. असे सांगितले जाते की गौतम ऋषींनी काही वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली होती.

इतिहासकार व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेशव्यांच्या फौजा पुण्याहून ग्वाल्हेरला जात असत तेव्हा पुणे, संगमनेर, वावी, मंजुर, मुखेड, येवला या मार्गाने जाताना राघवेश्वर मंदिर परिसरात काही काळ थांबत. असे सांगितले जाते की रघुनाथराव पेशवे यांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात ते कोपरगाव-हिंगणी-कुंभारी अशा भुयारी मार्गाने दर्शनाला येत असत. रघुनाथराव यांच्या नावावरून मंदिराला राघवेश्वर देवस्थान असे नाव देण्यात आले आहे.

सुमारे चार फूट उंच जगतीवर (जोता) उभ्या असलेल्या या मंदिरातील सभामंडपात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दोन बसलेल्या हत्तींची शिल्पे आहेत. प्रवेशद्वारातून आत जाताच सुबक दगडी नंदी पाहायला मिळतो. दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला सिंहाची शिल्पे आहेत. सभामंडप प्रशस्त असून तेथे असलेल्या १२ खांबांवर देव-देवतांच्या मूर्तींसह विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. या मंदिराचे वितान (छत) आकर्षक शिल्पकृतींनी अक्षरशः भरलेले आहे. दगडी झुंबर भासावे, अशी कलाकुसर वितानावर केलेली दिसते.

सभामंडपासमोर असलेल्या गर्भगृहातील शिवपिंडीवर पितळी आवरण आहे. मंदिराच्या आतील भागातील गणपती, भैरवनाथ, कार्तिक स्वामी, श्रीदत्त, राधा-कृष्ण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूने असलेल्या देवकोष्टकांमध्ये नवग्रहांच्या मूर्ती आहेत. याशिवाय बाह्यभागावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत.

महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. यावेळी पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. पहाटे महाभिषेक, काकडा, महाआरती, दुपारी कीर्तन व सायंकाळी राघेश्वरांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. उत्सवाच्या दिवशी दुपारी येथे कुस्त्यांच्या स्पर्धा, तर रात्री मिरवणुकीनंतर भारुडाचा कार्यक्रम होतो. देवस्थानतर्फे या दिवशी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद देण्यात येतो. येथे दिवाळीचा उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. मंदिर परिसरात तेव्हा हजारो दीप प्रज्वलित केले जातात. फुलांची सजावट व विजेच्या दिव्यांची रोषणाई केली जाते. महाशिवरात्र व दिवाळी या उत्सवांसाठी येथे हजारो भाविक हजेरी लावतात. मंदिरात दररोज पहाटे काकड आरती होते. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांना राघवेश्वराचे दर्शन घेता येते.


उपयुक्त माहिती:

  • कोपरगावपासून ८ किमी, तर अहिल्यानगरपासून १०९ किमी अंतरावर
  • कोपरगावपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • कोपरगाव येथे निवासासाठी अनेक पर्याय
Back To Home