ज्ञानेश्वर मंदिर (पैस खांब)

नेवासे, ता. नेवासे, जि. अहिल्यानगर

समुद्रमंथनाच्या वेळी विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन राहू या राक्षसाचा वध केला होता. ब्रह्मपुराणानुसार, राहूला मारल्यानंतर त्याच्या धडातून सांडलेल्या अमृताच्या थेंबांतून जो प्रवाह निर्माण झाला, त्यातून प्रवरा नदी निर्माण झाली. या ‘अमृतवाहिनी’ प्रवरेच्या तीरावर असलेले नेवासे हे क्षेत्र वारकरी म्हणजेच भागवत धर्माचे आध्यात्मिक पीठ मानले जाते. १३व्या शतकात नेवासे गावातील एका मंदिराच्या ज्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेचे निरूपण केले, तो खांब म्हणजे येथील पैस खांब आणि भावार्थ दीपिका म्हणजे मराठीतील महान ग्रंथ ज्ञानेश्वरी!

विविध ग्रंथांमधील वर्णनांनुसार, संन्याशाची मुले म्हणून निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई या भावंडांना समाजाकडून सतत त्रास दिला जात होता. भविष्यात आपल्या मुलांचे काय होईल, या चिंतेने विठ्ठलपंत व रुख्मिणीबाई यांनी आळंदी येथील ब्रह्मवृंदास आमच्या परिवाराला शुद्ध करून घ्या, अशी विनवणी केली; परंतु त्यांनी या कुटुंबाला पैठण क्षेत्री जाण्यास सांगितले. पैठण क्षेत्रातील ब्रह्मवृंदांनी विठ्ठलपंत व रुख्मिणीबाई यांना देहांत प्रायश्चित्त द्यावे, असा निर्णय दिला. त्यानुसार ते आपल्या चारही मुलांना सोडून प्रयाग येथे आत्मविसर्जनासाठी निघून गेले.

वडीलभाऊ म्हणून निवृत्तिनाथांनी पुन्हा आळंदी ब्रह्मवृंदांकडे आमचे व्रतबंध करा व शुद्धिपत्र द्या, अशी विनंती केली; परंतु पुन्हा या भावंडांना पैठण येथे जाण्यास सांगितले. पैठण येथील धर्मसभेत शुद्धिपत्रासाठी गेलेल्या निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई या भावंडांचा तेथील धर्मपंडितांनी अपमान केला. एका धर्मपंडिताने ज्ञानेश्वरांना सांगितले की तुझा व प्राणिमात्रांचा आत्मा एकच आहे हे तू सिद्ध करून दाखव. धर्मपंडितांचे हे आव्हान ज्ञानेश्वरांनी स्वीकारले व त्या भर सभेत एका रेड्याच्या मुखातून ओंकार (ऋग्वेद) वदवून घेतले. ज्ञानेश्वर महाराजांच्या या कृतीने सर्व धर्मपंडितांनी माना खाली घातल्या व ज्ञानेश्वरादी भावंडांना शुद्धिपत्रक दिले.

रेड्याला आपल्यासोबत घेऊन ज्ञानेश्वरादी भावंडे पैठणहून आळंदीला जात असताना नेवासे येथे आली व त्यांना हा परिसर भावला. येथील प्राचीन करविरेश्वर मंदिरात ही चारही भावंडे थांबली. गुरुबंधू निवृत्तिनाथ यांनी ज्ञानेश्वरांना येथेच संस्कृतमध्ये असलेल्या गीतेवर सर्वसामान्यांना कळेल अशा मराठी भाषेत भाष्य करण्याची आज्ञा केली. गुरू आज्ञा शिरसावंद्य मानून ज्ञानेश्वरांनी या करविरेश्वर मंदिरातील एका खांबाला टेकून गीतेतील ७०० श्लोकांवर ९००० ओव्यांची रचना केली. ज्ञानदेवांनी हे भाष्य नेवासे येथील सच्चीदानंद बाबा कुलकर्णी यांना सांगितले व बाबांनी ते लिहून घेतले. ज्ञानेश्वरांच्या मुखातून निघणारे भाष्य श्रवण करण्याकरिता त्यांचे थोरले बंधू व गुरू निवृत्तिनाथ व इतर भावंडेही येथे उपस्थित असत. येथे केलेल्या ज्ञानेश्वरीच्या लेखनासंदर्भात ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायातील १८१० क्रमांकाच्या ओवीत उल्लेख आहे –

शके बारा शते बारोत्तरे। टीका केली ज्ञानेश्वरे।।
सच्चिदानंद बाबा आदरे। लेखकु झाला।।

वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीमध्ये ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. (ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची अभंगगाथा या ग्रंथांचा प्रस्थानत्रयीमध्ये समावेश आहे.) असे सांगितले जाते की १५व्या शतकापर्यंत करविरेश्वराचे मंदिर सुस्थितीत होते. त्यानंतर मात्र त्याची पडझड झाली; परंतु तेथील तो पवित्र खांब मात्र आपले अस्तित्व टिकवून होता. जळके खुर्द येथील श्री परदेशी यांनी प्रथम १९०१ मध्ये या पवित्र खांबाभोवती लहानसे मंदिर बांधले. त्यानंतर १९१७ मध्ये कृष्णाजी त्रिंबक जोशी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. १९४९ ते १९६३ या काळात बन्सी महाराज तांबे यांच्या देखरेखीखाली येथील ज्ञानेश्वर मंदिराचे बांधकाम करण्यात आले. मूळ करविरेश्वर मंदिरात असलेल्या दगडी खांबाभोवती हे मंदिर बांधण्यात आले. खांब वरच्या व खालच्या बाजूस चौरस व मध्यभागी गोलाकार आहे. हा खांब पैसचा खांब म्हणून ओळखला जातो.


ज्ञानेश्वर मंदिराचा परिसर सुमारे पाच एकरचा आहे. या परिसराभोवती तटबंदी आहे. तळघर, दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात मध्यभागी असलेल्या पैस खांबाला ‘ज्ञानोबाचा खांब’ असेही म्हटले जाते. या खांबावर शिलालेख व चंद्र-सूर्य कोरलेले आहेत. येथील तळघरात भाविकांना ज्ञानेश्वरी पारायण करण्यासाठी विशेष सुविधा करण्यात आल्या आहेत. फाल्गुन वद्य एकादशी ते त्रयोदशीपर्यंत येथे यात्रा भरते. तसेच ज्ञानेश्वरांचा जन्मसोहळा, बन्सी महाराज यांची पुण्यतिथी, तुकाराम बीज असे कार्यक्रमही येथे होतात. मराठवाड्यातून जाणाऱ्या दिंड्यांचा मुक्काम येथे एक दिवस असतो. मंदिर संस्थानतर्फे भाविकांसाठी येथे भक्तनिवासाची सुविधा करण्यात आली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत भाविकांना मंदिरातील पैस खांबाचे दर्शन घेता येते.


उपयुक्त माहिती:

  • नेवासे बस थांब्यापासून दीड किमी,
  • अहिल्यानगरपासून ५६ किमी अंतरावर
  • अहिल्यानगर, शिर्डी येथून बस सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home