
अहिल्यानगर, सोलापूर व पुणे या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कर्जत तालुक्यातील राशीन या गावात अष्टभुजा जगदंबा मातेचे ७ व्या शतकातील स्थान आहे. जगदंबेचे येथील मंदिर हे राशीनच्या धार्मिक, ऐतिहासिक व वैभवशाली परंपरेचे प्रतीक मानले जाते. ही जगदंबा माता येथील हजारो कुटुंबीयांचे कुलदैवत आहे. यमाई देवी म्हणूनही ती बहुश्रुत आहे. विजयादशमीच्या दिवशी येथे साजरा होणारा देवीचा रथ उत्सव (पालखी) प्रसिद्ध असून २४ तासांहून अधिक वेळ चालणाऱ्या या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी हजारो भाविक येतात. याच दिवशी जगदंबेची मोठी यात्रा भरते.
राशीन हे गाव धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन जगदंबा मंदिरासोबतच येथे काशी विश्वेश्वराचे हेमाडपंती शैलीतील मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील भलीमोठी पितळी घंटा. ही घंटा वाजविल्यावर काही किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज जातो. येथील विष्णू मंदिरही प्रसिद्ध आहे. एका आख्यायिकेनुसार, महिषासुराशी नऊ दिवस लढाई करून देवीने त्याचा येथे वध केला होता. यावेळी हजारो दैत्यांच्या मृतदेहांच्या राशी या परिसरात पडल्या होत्या. या राशींवरून या गावाचे नाव ‘राशीन’ झाले.
राशीनमधील या सर्व मंदिरांची आख्यायिका अशी की पूर्वी या भागात राहणाऱ्या भुजंगाप्पा शेटे-जंगम याला सोन्याच्या मोहरा असलेला हंडा सापडला होता. तो त्याने एका भिंतीत लपवून ठेवला होता. तेव्हा येथील जगदंबा देवीने त्याचा मुलगा अक्काप्पा याला स्वप्नदृष्टांत देऊन मंदिर बांधण्याविषयी सांगितले. अक्काप्पाने वडिलांच्या मदतीने राशीनमध्ये जगदंबा देवीचे भव्य मंदिर बांधले. या देवीचे स्थान प्राचीन असले तरी सध्याचे मंदिर हे १६९० मध्ये बांधलेले आहे. या मंदिरासोबतच काशी विश्वेश्वर व विष्णुमंदिराचेही बांधकाम अक्काप्पा यांनी केले.
जगदंबा मंदिराभोवती उंच तटबंदी आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून आत आल्यावर फरसबंदीचे प्रांगण, विहीर व तटभिंतीच्या आतील बाजूला ओवऱ्या आहेत. त्या पेशवाईतील प्रसिद्ध मुत्सद्दी सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांनी बांधल्याचा उल्लेख येथील शिलालेखात आहे. या ओवऱ्यांमध्ये रेखीव मूर्ती आहेत. ओवऱ्यांवरील फुलांचे नक्षीकाम बारकाईने पाहिले असता सगळी फुले वरवर सारखी वाटत आहेत; परंतु ते घडविणाऱ्यांनी प्रत्येक फुलात वेगळेपण आणले आहे. धार्मिक विधीसाठी व विश्रांतीसाठी भाविकांकडून या ओवऱ्यांचा वापर केला जातो.
मंदिरासमोर दोन उंच व वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळा आहेत. त्यांचे बांधकाम खालील बाजूने दगडी, तर वरील बाजूला विटांचे आहे. यातील एका दीपमाळेच्या वर जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या आहेत, तर दुसऱ्या दीपमाळेला आतून पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून दीपमाळेच्या टोकावर गेले असता तेथे एक आडवा लाकडी दांडा आहे. तो धरून हलविला असता या दीपमाळा झुलायला लागतात. दर्शनासाठी आलेले अनेक भाविक या दीपमाळांच्या टोकांवर चढून या झुलणाऱ्या दीपमाळांचा आनंद घेतात.
मंदिर प्रांगणात श्री गणेश, काळभैरव, शैनेश्वर, श्रीजमदग्नी, विठ्ठल-रुक्मिणी यांची मंदिरे तर नरसिंहाचे स्थान व कल्लोळतीर्थ आहे. असे सांगितले जाते की महिषासुराचा वध केल्यानंतर याच कल्लोळतीर्थात देवीने त्याला बुडविले होते. जगदंबेचे मूळ मंदिर काळ्या दगडांत आहे. या मंदिराची रचना सिंहमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी आहे. महादेवाच्या मंदिरासमोर जसा नंदीमंडप असतो तसा या मंदिराच्या समोरील बाजूस सिंहमंडप आहे. या मंडपात सिंहाची पितळी मूर्ती स्थानापन्न आहे. सभामंडपात भक्तांच्या सोयीसाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गाभाऱ्यात मुख्य मूर्ती अष्टभुजा जगदंबा मातेची आहे. या मूर्तीच्या बाजूला तुकाई व चतुशृंगी देवी यांच्या मूर्ती आहेत.
जगदंबा मातेच्या मंदिरात होणारा दसरा प्रसिद्ध आहे. या वेळी काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित असतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत हा सोहळा रंगतो. हा उत्सव ‘रथ उत्सव’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिरात दररोज सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांना जगदंबा मातेचे दर्शन घेता येते. नवसाला पावणारी देवी म्हणून या जगदंबेची ख्याती आहे.