काळभैरवनाथ मंदिर, बहिरवाडी,

ता. नेवासे, जि. अहिल्यानगर

समुद्रमंथनातून मिळालेले अमृतकुंभ देवांकडून हिसकावून पळून जात असताना राक्षसांच्या हातून तो नदीत पडला. असे सांगितले जाते की ज्या ठिकाणी अमृतकुंभ पडला ते ठिकाण म्हणजे नेवासे तालुक्यातील बहिरवाडी येथील प्रवरा नदीचे पात्र होय. अशी भावना आहे की आजही या नदीपात्राखाली अमृत सुरक्षित असून अमृतकुंभाचे रक्षण येथील काळभैरवनाथ करीत आहेत. त्यामुळे श्री क्षेत्र बहिरवाडी हे काळभैरवनाथांचे जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

या स्थानाची आख्यायिका अशी की दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवांची शक्ती क्षीण झाली होती. राक्षसांचा राजा बाली याने देवांना पराभूत करून तिन्ही लोकांवर विजय मिळविला होता. आपली शक्ती परत मिळविण्यासाठी काहीतरी तोडगा काढावा, यासाठी सर्व देव विष्णूंकडे गेले. त्यावर विष्णू देवांना राक्षसांबरोबर मैत्री करण्यास सांगितली. राक्षसांकडील शक्तीचा वापर करून समुद्रमंथन करण्याचे त्यांनी सुचविले. समुद्रमंथनातून मिळणारे अमृत प्राशन करून सर्व देवांना त्यांची शक्ती परत मिळणार होती. समुद्रमंथनातून १४ रत्ने प्राप्त झाली. त्यामध्ये विष, कामधेनू गाय, उच्चेश्रवा घोडा, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, रंभा-अप्सरा, लक्ष्मी, वारुणी (विशिष्ट प्रकारचे मद्य), चंद्र, पारिजात वृक्ष, शंख, वैद्यराज धन्वंतरी व अमृत यांचा सहभाग आहे. अमृताच्या आधी जी १३ रत्ने निघाली त्यातील उच्चेश्रवा घोडा आणि वारुणी दानवांनी, कामधेनू गाय ऋषींनी, तर बाकी १० रत्ने देवांनी वाटून घेतली.

१४ वे रत्न अमृत वाटपावरून देव व राक्षसांमध्ये वाद सुरू झाला. देवांची शक्ती आधीच क्षीण झाल्यामुळे राक्षसांनी अमृतकुंभ पळवून नेला. ते अमृत कोणी व किती घ्यायचे यावरून राक्षसांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. ती संधी साधून स्वतः विष्णूंनी सुंदर स्त्रीचे (मोहिनी) रूप घेतले व राक्षसांकडे गेले. या सुंदर स्त्रीने राक्षसांवर मोहिनी घातली, त्यामुळे अमृत विसरून सर्वजण या स्त्रीकडे आकर्षित झाले. त्यावेळी त्या स्त्रीने राक्षसांना एक पर्याय सुचविला, ‘अमृताचा कुंभ माझ्याकडे द्या, मी राक्षस व देवांना त्याचे समान वाटप करीन.’ त्या स्त्रीने सुचविलेल्या पर्यायावर राक्षसांपैकी कोणीही शंका घेतली नाही व अमृतकुंभ तिच्या स्वाधीन केले. त्यानंतर मोहिनी रूप घेतलेल्या विष्णूंनी देवांना व राक्षसांना वेगवेगळ्या रांगेत बसण्यास सांगितले. त्यानुसार देवांना अमृताचे वाटप व राक्षसांना मद्य दिले जात होते. सर्व राक्षस हे मोहिनी रूप घेतलेल्या स्त्रीच्या सौंदर्यावर मोहित झाल्यामुळे त्यांना काय होत आहे हे कळत नव्हते; परंतु त्या राक्षसांमधील राहू याला विष्णूंचा हा डाव समजला व देवांचे रूप घेऊन तो देवांच्या पंक्तीत बसला. विष्णूंनी दिलेले अमृत त्याने त्वरित प्राशन केले. विष्णूंच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा आपल्या मूळ रूपात येऊन त्यांनी सुदर्शन चक्राने राहूचे शिर धडावेगळे केले.

ही घटना घडल्यावर राक्षस सावध झाले व आपल्याला फसविण्यात आले आहे, याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तेथील अमृतकुंभ पळविण्याचा प्रयत्न केला; परंतु अमृत प्राशनामुळे देवांची क्षीण झालेली शक्ती परत आली होती. त्यावेळी देव व राक्षसांमध्ये युद्ध झाले. हे युद्ध सुरू असताना राक्षसांकडील अमृतकुंभ नदीच्या पाण्यात पडले. कुंभातील शिल्लक अमृत नदीपात्रात वाहून जाऊ नये, यासाठी महादेवांनी आपलेच रूप असलेल्या काळभैरवनाथाला बोलावून नदीपात्रातील अमृत सुरक्षित ठेवण्याची आज्ञा केली. त्यानुसार काळभैरवनाथांनी महादेवांच्या त्रिशुलाने येथील नदीत खड्डा करून सर्व अमृत साठवले. असे सांगितले जाते की ही घटना जेथे घडली ते ठिकाण म्हणजे आजचे बहिरवाडी येथील प्रवरा नदीपात्रात असलेले काळभैरवनाथ मंदिर होय. आजही येथील नदीच्या तळाशी असलेल्या अमृताचे संरक्षण काळभैरवनाथ करत आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

बहिरवाडी गावात प्रवरा नदीपात्राच्या मधोमध आज जे मंदिर आहे त्याखाली सुमारे २० फूट खोलीवर काळभैरवनाथांचे मूळ स्थान आहे. तेथेच काही वर्षांपूर्वी खांबांच्या आधारावर दुमजली मंदिर उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीला जास्त पाणी असले तरी भाविकांना पहिल्या मजल्यावरील काळभैरवनाथांचे दर्शन घेता येते. नव्या मंदिरात जाण्यासाठी नदीपात्रात सुमारे ५० मीटर लांबीचा पूल तयार करण्यात आला आहे. या पुलाला जोडून काळभैरवनाथांचे मंदिर आहे. या मंदिरातून खाली असलेल्या काळभैरवनाथांच्या मूळ मूर्तीच्या दर्शनासाठी जाता येते. तेथे सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना आहे. चारही बाजूंनी मोकळ्या असलेल्या सभामंडपात मध्यभागी गर्भगृह आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील काळभैरवनाथांची मूर्ती आहे. या मूर्तीच्या वर पहिल्या मजल्यावरील मंदिराचा गाभारा आहे. तेथेही काळभैरवनाथांची नवीन मूर्ती आहे. यासोबत येथे अष्टभैरवांचेही स्थान आहे.

पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी येथे यात्रा भरते. या वेळी भाविक मंदिर परिसरात ३ दगडांच्या चुलीवर डाळ-रोडग्याचा प्रसाद तयार करून तो नैवेद्य देवाला दाखवितात. चौथ्या रविवारी सकाळी गंगेतून आणलेल्या कावडीच्या पाण्याने काळभैरवनाथांना अभिषेक घालण्यात येतो. उत्सव काळात आलेल्या भाविकांना येथे आमटी-भाताचा प्रसाद दिला जातो. सकाळी ६ ते संध्याकाळी ९ पर्यंत भाविकांना या मंदिरातील काळभैरवनाथांचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • नेवासेपासून ५ किमी, तर अहिल्यानगरपासून ६४ किमी अंतरावर
  • नेवासेपासून एसटी तसेच रिक्षाची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home