श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक (अष्टविनायक क्षेत्र),

ता. कर्जत, जि. अहमदनगर

भीमा नदी जेथे दक्षिणवाहिनी होते, त्या पवित्र ठिकाणी सिद्धटेक येथे राज्यातील अष्टविनायकांपैकी दर्शनक्रमानुसार दुसऱ्या स्थानावर असणारे सिद्धिविनायक मंदिर आहे. अष्टविनायकांपैकी एकमेव उजव्या सोंडेची ही मूर्ती आहे. असे सांगितले जाते की श्रीविष्णूंनी गंडकी शिळेच्या रूपात या गणेशाची स्थापना केली होती. उजवीकडे सोंड असलेल्या गणेशाचे सोवळेओवळे कडक असून उपासकाला तो लवकर पावतो, तसेच पापकर्माचे फळही त्वरित देतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

सिद्धटेक स्थानाची आख्यायिका अशी की ब्रह्मदेवांच्या मनात जेव्हा सृष्टीच्या निर्मितीचा विचार आला, तेव्हा त्यांनी गणेशाची तपश्चर्या केली. गणेशाने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांस वर मागण्यास सांगितले. त्यावर ब्रह्मदेवाने सांगितले, ‘हे गणेशा मी कशासाठी तप केले हे आपणास ठाऊक आहे. माझी ही मनोकामना सिद्धीस जाईल, असा मला वर द्या.’ त्यानुसार गणेशाने तथास्तू म्हटल्यावर ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या निर्मितीस आरंभ केला. परंतु हे करताना एक संकट निर्माण झाले. विष्णूंच्या कानातून प्रकट झालेल्या मधू व कैटभ या दोन राक्षसांनी ब्रह्मदेवांना त्यांच्या कार्यात अडथळा आणण्यास सुरुवात केली.


राक्षसांच्या वाढत्या उपद्रवामुळे ब्रह्मदेवाने विष्णूची प्रार्थना करून यावर तोडगा काढण्यास विनविले. त्यानंतर विष्णू आणि मधू-कैटभ राक्षस यांच्यात युद्ध सुरू झाले. परंतु अनेक दिवसांनंतरही विष्णूंना यश येत नव्हते. तेव्हा ते महादेवांकडे गेले व या राक्षसांचा पराभव करण्यासाठी मी कुठे कमी पडतोय, हे विचारले. महादेव म्हणाले, ‘कोणत्याही कार्याच्या प्रारंभी गणेशाचे स्तवन करायचे असते. आपण ते केले नसल्यामुळे आपणास यश येत नाही.’ त्यानंतर विष्णूंनी एका टेकडीवर गंडकी शिळेच्या रूपात गणेशमूर्तीची स्थापना करून ‘श्री गणेशाय नमः’ असा जप सुरू केला. गणेश प्रसन्न होऊन त्यांनी विष्णूंना सिद्धी दिली. गणेश सिद्धीमुळे विष्णूंनी मधू व कैटभ यांचा वध केला. विष्णूंनी जेथे गणेशाची आराधना केली व गणेशाने त्यांना सिद्धी दिली ते ठिकाण म्हणजे आजचे सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिर. पुराणांतील उल्लेखानुसार, महर्षी व्यासांनी या ठिकाणी यज्ञ केला होता. त्यामुळे येथील उत्खननात अजूनही भस्मासारखी माती आढळते. संत मोरया गोसावी व केडगाव येथील प्रसिद्ध दत्तभक्त नारायण महाराज यांनीही येथे साधना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या.

सिद्धटेक या क्षेत्रासंदर्भात ऐतिहासिक प्रसंगही सांगितले जातात. इंग्रजांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके येथे काही काळ राहिले होते. पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके हे याच गावचे. त्यांचा आजही येथे वाडा पाहायला मिळतो. खर्डा येथील विजयानंतर परतल्यावर फडक्यांनी खास तिकडचे दगड आणून सिद्धटेक गावाची वेस बांधली होती. एकदा गैरसमजातून पेशव्यांनी हरिपंत फडके यांच्याकडून सेनापती पद काढून घेतले. त्यानंतर हरिपंतांनी या मंदिरात सिद्धिविनायकाची उपासना सुरू केली. २१ व्या दिवशी त्यांना पेशव्यांकडून निरोप आला. त्यावेळी ते चांदीची सिद्धिविनायकाची मूर्ती पालखीत ठेवून पालखीबरोबर पुण्यात गेले. हरिपंतांसंदर्भात असलेले गैरसमज दूर झाले होते व पेशव्यांनी पुन्हा त्यांना सन्मानाने सेनापदीपद बहाल केले होते.

भीमा नदीच्या तीरावर असलेले सिद्धटेक येथील हे मंदिर काहीसे उंचवट्यावर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार व भीमा नदीवरील प्रशस्त घाटाचे बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी, तर मंदिरापर्यंतचा रस्ता हा पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी केल्याची नोंद आहे. उत्तराभिमुख असलेल्या या मंदिरासमोर दगडी कमान असून त्यावर नगारखाना आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल म्हणून मोद-प्रमोद यांची चित्रे आहेत. मूळ गाभाऱ्यासमोर सभामंडप नंतरच्या काळात बांधलेले वाटते. सभामंडपात अनेक चित्रे रेखाटली आहेत. त्यामध्ये तपश्चर्या करणाऱ्या भृशुंड मुनींना सिद्धिविनायक आशीर्वाद देताना, तसेच इतर देव-देवतांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रे पाहायला मिळतात.

गाभाऱ्यातील दगडी सिंहासनावर पितळेच्या मखरात सिद्धिविनायकाची उजव्या सोंडेची आसनस्थ मूर्ती असून ती ३ फूट उंच व २.६ फूट रुंद आहे. गणेशाच्या मांडीवर ऋद्धी-सिद्धी आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य व गरूड असून मध्यभागी नाग आहे. गाभारा एका लहानशा टेकडीच्या एका कडेला असल्यामुळे मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी पूर्ण टेकडीला प्रदक्षिणा करावी लागते. ही प्रदक्षिणा १ किलोमीटर अंतराची आहे. अशा २१ प्रदक्षिणा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिरात महिन्यातील दोन्ही चतुर्थींचा उत्सव होतो. वार्षिक उत्सवांत भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळात उत्सव होतात. यावेळी विविध अलंकारांनी मूर्तीचा शृंगार केला जातो. मंदिरात दररोज पहाटे ५ वाजता काकड आरती व प्रक्षाळ पूजा होते. सकाळी ११ वाजता महापूजा व दुपारी १२ वाजता महानैवेद्य असतो. रात्री ८.३० वाजता सिद्धिविनायकाला दूध-भात व ओल्या हरभऱ्याची डाळ हा नैवेद्य दाखविला जातो. पहाटे ५.१५ ते रात्री ९.३० या काळात भाविकांना मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • दौंडपासून १८ किमी, तर कर्जतपासून ४५ किमी अंतरावर
  • दौंडहून एसटीच्या सिद्धटेकसाठी थेट सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home