संत निळोबा समाधी मंदिर,

पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर

संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व निळोबा हे पाच संत वारकरी संप्रदायाचे संतपंचायतन मानले जातात. या पंचायतनमधील पाचवे संत म्हणून संत निळोबा आपल्या गुरुभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. असे सांगितले जाते की तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतरही त्यांनीच आपल्याला अनुग्रह द्यावा, यासाठी अन्नपाणी वर्ज्य करून निळोबांनी तुकारामांचा अखंड जप सुरू केला. त्यांचा हा हट्ट व भक्ती पाहून तुकारामांना वैकुंठाहून मृत्युलोकी येऊन त्यांना अनुग्रह द्यावा लागला. अशा या थोर संताची समाधी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर य

पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर हे वारकऱ्यांसाठी पंढरपूर, देहू व आळंदीइतकेच महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून देहू, आळंदी व पंढरपूरसाठी पायी दिंड्या वा वारी निघतात; परंतु संत निळोबांसाठी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आळंदीहून शेकडो वारकऱ्यांसह संत ज्ञानेश्वरांची दिंडी पिंपळनेर येथील त्यांच्या समाधी मंदिरात येते.

संत चरित्रातील संदर्भांनुसार, पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे भाद्रपद शुद्ध नवमी, सन १६७५ या दिवशी निळोबांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील घोडनदीच्या तीरावर असलेल्या रामलिंग मंदिरात पूजा-अर्चा करत असत. निळोबा मोठे होऊ लागले, तसे तेही वडिलांकडे असलेले कुळकर्णी वतन सांभाळून रामलिंगाची पूजा-अर्चा करू लागले. वतनाचा कार्यभार सांभाळताना पूजेत व्यत्यय येऊ लागल्याने त्यांनी वतन परत केले व भगवंताच्या नामस्मरणात ते पूर्ण वेळ तल्लीन होऊ लागले. त्यांनी देहू, आळंदी व पंढरपूर अशी नियमित वारी सुरू केली. एकदा वारी करीत असताना संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांच्याशी त्यांची ओळख झाली. नारायण महाराजांकडून तुकारामांचे चरित्र ऐकून निळोबा प्रभावित झाले.

शिरूर सोडून निळोबा आता पारनेर येथे राहू लागले. तेथील नागेश्वर मंदिरात ते पूजा-अर्चा करत असत. तेथून ते नियमित वारी करू लागले. पारनेर येथे असताना निळोबांच्या मुलीचे लग्न ठरले. तेव्हा लग्नविधी पूर्ण होईपर्यंत स्वतः पांडुरंगाने विठू गड्याच्या रूपाने निळोबांकडे पाणी भरण्यापासूनची सर्व कामे केली. लग्नविधी पार पडल्यानंतर विठूला काही मोबदला द्यावा म्हणून त्यांनी बोलावले असता, देवघरातील काम उरकून येतो, असे म्हणून विठू देवघराकडे गेला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने निळोबा देवघरात जाऊन पाहतात तर तेथे फक्त तुळशीपत्र व बुक्का होता. तेव्हा स्वतः पांडुरंगाने आपला भार उचलला, हे निळोबांनी जाणले.

संत तुकाराम हेच आपले गुरू असावेत, असे निळोबारायांना मनोमन वाटत होते. त्यांनी तुकाराम महाराजांचा ध्यासच घेतला. ‘तुका ध्यानी, तुका मनी | तुका दिसे, घरी रानी ||’ अशी त्यांची अवस्था झाली होती. सदेह वैकुंठगमनानंतर तुकाराम महाराज आपली मुलगी भागीरथी, संताजी महाराज व तेली जगनाडे यांच्यासाठी परत आलेच होते. त्यामुळे आपल्यासाठीही ते येतील व अनुग्रह देतील, असा ठाम विश्वास बाळगून त्यांनी अन्नपाणी सोडून तुकारामांचा अखंड जप सुरू केला. काही दिवसांनी स्वतः पांडुरंगाने निळोबांना दर्शन दिले; परंतु त्यांनी परखडपणे पांडुरंगालाही खडसावले, ‘देवा मी तर तुला बोलाविले नाही, मग तू का आलास? मी तुला ओळखत नाही. मी तुकारामांच्या भेटीसाठी आतुर आहे. तेव्हा तू परत जा.’ निळोबारायांची ही प्रखर गुरुनिष्ठा व भक्ती पाहून पांडुरंगालाही परत जावे लागले. शेवटी पांडुरंगाने सांगितल्यानंतर तुकारामांनी निळोबांना उठविले व त्यांच्या मस्तकावर हात ठेऊन अनुग्रह दिला.

तुकाराम महाराजांच्या अनुग्रहानंतर निळोबांनी अनेक अभंग, गवळणी, चांगदेव चरित्र, तुकाराम स्तुती असे लेखन केले. पारनेरहून पंढरपूर वारीसाठी जाताना निळोबा पिंपळनेर येथील पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरात मुक्काम करीत असत. पिंपळनेरमधील एक पाटील भुलोजी गाजरे दुर्धर रोगाने पीडित होते. पिंपळेश्वर महादेव हे पाटलांचे दैवत. एकदा पाटलांच्या मुलाला महादेवाने दृष्टांत देऊन सांगितले की तुमच्या मंदिरात एक संत वास्तव्याला आहे, त्यांच्या हातून वडिलांना बुक्का लावल्यास त्यांची व्याधी बरी होईल. त्यानुसार त्यांनी निळोबांचे दर्शन घेऊन बुक्का लावण्याची विनंती केली. बुक्का लावल्यावर काही दिवसांनी त्यांची व्याधी पूर्णपणे बरी झाली. आजारातून बरे झाल्यावर पिंपळनेरच्या भुलोजी पाटलांनी निळोबांना पिंपळनेरमध्येच राहण्याची विनंती केली. त्यानुसार ते पिंपळनेरला स्थायिक झाले व तेथून ते आळंदी, पंढरीची वारी करू लागले.

वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत निळोबारायांची पंढरपूर वारी सुरू होती; परंतु शरीर थकल्यामुळे त्यांनी देवाला साकडे घातले, ‘पांडुरंगा आता मला तुझ्या भेटीला पंढरपूरला येता येणार नाही. एकतर तू मला तुझ्या चरणी विलीन करून घे, नाहीतर माझ्याकडे पिंपळनेरला ये.’ निळोबांच्या या आग्रहानंतर पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला की देऊन ‘भीमा नदीच्या काठावर असलेल्या तळेगावजवळ विठ्ठलवाडी येथील डोहात मी आहे, तेथून मला घेऊन जा.’ त्याप्रमाणे निळोबांनी त्या डोहातून पांडुरंग व रुक्मिणीच्या मूर्ती बाहेर काढून पालखीतून पिंपळनेर येथे आणल्या. भुलोजी पाटलांनी निळोबांना राहण्यासाठी दिलेल्या जागेत निळोबारायांनी पांडुरंग व रुक्मिणीसाठी मंदिर उभारले. तेव्हापासून पिंपळनेर हे ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. निळोबांनी या मंदिरात सुरू केलेला आषाढी-कार्तिकी एकादशीचा उत्सव आजतागायत सुरू आहे.

पिंपळनेर येथे निळोबारायांचा राहता वाडा आहे. त्यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असून निळोबांचे समाधी मंदिर गावाबाहेरील नदीकिनाऱ्यावर आहे. प्रशस्त परिसर व निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर स्थित आहे. या मंदिरात संत निळोबारायांची सुंदर मूर्ती असून त्यासमोर त्यांचे समाधीस्थान आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला निळोबाराय व तुकाराम महाराज यांची पुण्यतिथी एकाच दिवशी असते; परंतु भाविकांच्या सोयीसाठी निळोबांचा पुण्यतिथी उत्सव फाल्गुन महिन्यातील पहिले तीन दिवस पिंपळनेर येथे साजरा करण्यात येतो. यावेळी पिंपळनेर येथे मोठी यात्रा भरते. या यात्राकालावधीत आळंदीसह राज्यातील अनेक भागांतून वारकरी दिंड्या व पालख्या घेऊन येथे येतात. समाधी मंदिराजवळ भाविकांसाठी भक्तनिवासाची सुविधा करण्यात आली आहे.

उपयुक्त माहिती:

  • पारनेरपासून १४ किमी, तर अहमदनगरपासून ४७ किमी अंतरावर
  • पारनेरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात भक्तनिवासाची सुविधा
Back To Home