देशात शनिदेवांची तीन स्थाने सिद्धपीठ म्हणून ओळखली जातात. त्यात शनिशिंगणापूर (महाराष्ट्र), कोकिळा वन (वृंदावन) आणि ग्वाल्हेर (गोमतीच्या काठावर) यांचा समावेश आहे. तीनही सिद्धपीठांपैकी शनिशिंगणापूरला भाविकांची सर्वाधिक वर्दळ असते. नेवासा तालुक्यातील शिंगणापूर या गावाची ओळख शनिदेवांच्या मंदिरामुळे आहे. शनिदेवांचे हे स्थान जागृत मानले जाते. आजही येथे शनिदेव वास करीत आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या गावातील घरांना दरवाजे वा कुलूप लावले जात नाहीत, येथे कधीही चोरी होत नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे.
देवस्थानाबद्दल आख्यायिका अशी की सुमारे ३५० ते ४०० वर्षांपूर्वी शिंगणापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता. यावेळी काळ्या पाषाणाची एक शिळा येथे वाहून आली आणि एका बोरीच्या झाडाला अडकली. पुराचे पाणी ओसरल्यावर गावातील काही मेंढपाळ, गुराखी गुरे चरायला गेले होते. त्यावेळी त्यांना ही काळ्या पाषाणातील शिळा दिसली. त्यांनी काठीने ही शिळा हलविण्याचा प्रयत्न केला असता त्या शिळेतून रक्त येऊ लागले. पाषाणातून रक्त येत असल्याचे पाहून ते घाबरले आणि त्यांनी तेथून पळ काढला. गावात पोहोचून ग्रामस्थांना त्यांनी ही माहिती दिली तेव्हा ती शिळा पाहण्यासाठी गर्दी झाली. त्या रात्री शनिदेवाने एका भक्ताला स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले, ‘मी तुझ्या गावाजवळील नदीच्या किनाऱ्यावर आलो आहे, गावात आणून माझी प्रतिष्ठापना कर’. दुसऱ्या दिवशी स्वप्नदृष्टांताबाबत या भक्ताने ग्रामस्थांना सांगितल्यावर ते शनिदेवाची शिळा आणण्यासाठी बैलगाडी घेऊन तिथे पोहोचले. सर्वांनी मिळून ती बैलगाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण शिळा काही जागची हलली नाही. सर्व प्रयत्न व्यर्थ ठरल्यावर ते गावाकडे परतले.
दुसऱ्या दिवशी रात्री शनिदेवाने पुन्हा त्याच भक्ताला दृष्टांत देऊन सांगितले, ‘जे सख्खे मामा-भाचे असतील, तेच मला उचलू शकतील’. त्यानुसार दुसऱ्या दिवशी दोन मामा-भाचे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ती शिळा सहज उचलून गावात आणली व एका चौथऱ्यावर ठेवून तिची प्राणप्रतिष्ठापना केली.
शनिमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर मोकळ्या प्रांगणामध्ये एका संगमरवरी चौथऱ्यावर शनिदेवांची काळ्या पाषाणातील शिळा आहे. भगवे वस्त्र परिधान करून शनिदेवांची पूजा करावी लागते. शनिदेवांना तिळाचे तेल, काळे तीळ, काळे उडीद वाहतात. तसेच घोड्याचा नाल, नजर बाहुलीदेखील त्यांना प्रिय आहे. येथे एक विहीर असून त्यातील पाण्याने शनिदेवांना अभिषेक केला जातो. त्या विहिरीचे पाणी इतर कोणत्याही कामासाठी वापरले जात नाही. येथील शनिदेवांच्या शिळेवर छत नाही, ती मोकळ्या आकाशाखाली आहे. असे सांगितले जाते की शनिदेवांना कोणाचेही अधिपत्य मान्य नाही. याआधीही चौथऱ्याभोवती मंदिर बांधण्याचा प्रयत्न झाला असता ते बांधकाम सतत पडत होते. सध्या जिथे शनिदेवांची शिळा आहे, त्या चौथऱ्याच्या उत्तर दिशेला कडुलिंबाचे एक मोठे झाड आहे. त्या झाडाची एखादी फांदी वाढून तिची सावली शिळेवर पडायला लागली, तर त्या फांदीची पाने सुकून ती गळून पडतात.
शनिशिंगणापूर मंदिरात दर्शन घेतल्याने शनिदोष नाहीसा होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शनिदेवांना न्यायाची देवताही मानली जाते. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही शनि जयंती म्हणून साजरी केली जाते. असे सांगितले जाते की ज्या व्यक्तीला शनिच्या साडेसातीचा त्रास होत असेल, त्याने शनि जयंतीला शनिशिंगणापूर येथील या शिळेवर तेल अर्पण केल्यास त्याची पिडा कमी होते. शनिवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी शनिशिंगणापूरला हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
शिंगणापूरबाबत अशी मान्यता आहे की शनिदेव रक्षण करीत असलेल्या या गावात कोणीही चोरी करू शकत नाही. जो कोणी चोरी करण्याचा प्रयत्न करतो, त्याला शनिदेव शासन करतात. त्यामुळे येथील घरे व कार्यालयांना कुलूप लावले जात नाहीत. देशातील हे एकमेव असे गाव असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे येथील राष्ट्रीयीकृत युको बँक शाखेच्या दरवाजालाही कुलूप नाही. मंदिरात दररोज पहाटे ४.३०, दुपारी १२ आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आरती होते. शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी येथे अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अल्पदरात भोजन व भक्तनिवासाची सुविधा आहे.
२०१६ पूर्वी या शनिदेवांच्या चौथऱ्यावर महिलांना जाण्याची परवानगी नव्हती. २६ जानेवारी २०१६ रोजी शेकडो महिलांनी मंदिरावर मोर्चा काढला. त्यांना शनिदेवांच्या चौथऱ्यावर प्रवेश करायचा होता, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले; परंतु ३० मार्च २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला महिलांना येथील चौथऱ्यावर प्रवेश देण्याचे आदेश दिले. तेव्हापासून महिलांनाही शनिदेवांच्या चौथऱ्यावर जाऊन पूजा करता येऊ लागली.