रेणुका माता मंदिर, उक्कडगाव,

ता. कोपरगाव, जि. अहमदनगर

कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूर गडावरील रेणुका माता या तिन्ही देवींचे एकत्रित रूप असलेले उक्कडगाव येथील रेणुका देवीचे स्थान जागृत मानले जाते. कोल्हापूर, तुळजापूर व माहूर गडावर केलेल्या नवसांची उक्कडगावच्या रेणुका मातेकडे पूर्ती करता येते, तसेच येथील देवीच्या दर्शनाने या तिन्ही ठिकाणी दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या देवीची आख्यायिका अशी की उक्कडगावातून एक ब्राह्मण दरवर्षी माहूर गडावरील रेणुका देवीच्या दर्शनाला जात असे. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्याचा हा क्रम सुरू होता. वयोमानामुळे माहूर गडावर येणे त्याला कठीण वाटू लागले, तेव्हा देवीने स्वप्नदृष्टांत देऊन ‘आता मंदिरात दर्शनाला येऊ नकोस, मीच तुझ्या घरी येते’, असे सांगितले. त्याप्रमाणे देवी वृद्ध ब्राह्मणाच्या घरी पोचली, परंतु या घटनेनंतर त्या ब्राह्मणाला गर्व झाला. माझी भक्ती श्रेष्ठ असल्याने मी देवीला येथपर्यंत घेऊन आलो, अशी त्याची भावना होऊ लागली. दिवसेंदिवस तो सर्वांशी तिरस्काराने वागू लागला. ब्राह्मणाच्या वागण्यात झालेल्या बदलाने देवी तेथून गुप्त झाली. त्यानंतर काही वर्षांनी देवीने येथील एका शेतकऱ्याच्या स्वप्नात येऊन, मी तुझ्या शेतात आहे, मला बाहेर काढ, असे सांगितले. त्यानुसार शेतकऱ्याने शेतात नांगर फिरवायला सुरुवात केली. एका ठिकाणी नांगराचा फाळ जमिनीत अडकला. माती काढल्यावर तेथे देवीची मूर्ती दिसली. त्याक्षणी देवीने शेतकऱ्याला सांगितले की मी आता जमिनीतून वर येत आहे. जोपर्यंत मी जमिनीबाहेर येत नाही, तोपर्यंत तू मागे पाहू नकोस, परंतु काही वेळाने शेतकऱ्याने उत्सुकतेपोटी मागे पाहिले तोपर्यंत देवीचे अर्धेच शरीर जमिनीबाहेर आले होते. त्यानंतर देवी त्याच अवस्थेत येथे स्थित झाली. गावकऱ्यांनी काही वर्षांनी या ठिकाणी देवीचे मंदिर बांधले.

उक्कडगावातील रेणुका देवीचे स्थान हे ४०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. कोपरगाव-वैजापूर मार्गावर असलेली ही देवी ‘तांदुळजा देवी’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे ही देवी कुलदैवत आहे, त्यामुळे येथे कायम भाविकांचा राबता असते.

उक्कडगावात मुख्य रस्त्यालगत असलेल्या प्रशस्त मंदिर परिसरात अनेक प्राचीन वृक्ष आहेत. मंदिरात असलेल्या काहीशा खोलगट गाभाऱ्यात देवीची तांदळा स्वरूपातील २ फूट उंचीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीत ३ चेहरे असून त्यामध्ये तुळजाभवानी, रेणुका माता व महालक्ष्मी यांचा समावेश आहे. या तिन्ही देवी बहिणी असून त्या एकत्र येथे प्रकट झाल्या आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिरासमोर असलेल्या दोन उंच दीपपाळा हे येथील वैशिष्ट्य आहे. ३५ फूट उंचीच्या (साधारणतः चार मजली इमारतीएवढ्या) या दीपमाळा गोलाकार असून खालून वर निमुळत्या होत गेलेल्या दिसतात. त्यांचे बांधकाम हे दगड व विटांच्या साह्याने केलेले आहे. या दोन्ही दीपमाळांच्या आत जाण्यासाठी प्रवेश मार्ग आहेत. आत गेल्यावर अरुंद वर्तुळाकार पायरी मार्ग असून तेथून दीपमाळांच्या टोकावर पोहचता येते. या दीपमाळांच्या पायरी मार्गालगत बाहेरच्या बाजूने आतमध्ये प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी काही खिडक्या आहेत. दीपमाळेच्या टोकावरून संपूर्ण मंदिराचे व परिसराचे दर्शन होते. या दीपमाळांच्या वरच्या बाजूला उभे राहून त्या जोराने हलविल्यावर त्या काही प्रमाणात हालतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

चैत्र पौर्णिमेला रेणुका देवीची २ दिवस, तर नवरात्रीला ९ दिवस येथे यात्रा भरते. त्यावेळी दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. उत्सवकाळात देवीला शृंगार करून चांदीची जर असलेली पैठणी नेसविली जाते. नवरात्रीला हजारो महिला येथे घटी (देवीच्या सानिध्यात राहून पूजाविधी करणे, देवीचे गुणगाण, स्तोत्र, मंत्रोच्चार, सप्तशतीचे पठण आणि महत्त्वाचे म्हणजे ९ दिवस देवीच्या नावाचा जप करणे) बसतात.

नवसपूर्तीसाठी नवरात्रीत येथे लिंब नेसण्याची प्रथा आहे. लिंब नेसणे म्हणजे ज्या स्त्रियांना नवस फेडायचे असते किंवा ज्या मुलींना देवदासी प्रथेतून मुक्त व्हायचे असते त्या स्त्रिया नग्न होऊन कमरेला लिंबाच्या डहाळ्या बांधतात व एक डहाळी तोंडात धरून रेणुका मातेचा जयजयकार करतात. काहीजणी काही अंतरापर्यंत रेणुका मातेचा जयजयकार करीत दंडवत घालत दर्शनाला जातात. तोंडात धरलेली लिंबाची डहाळी खाली पडता कामा नये, असा दंडक असतो. सध्या कायद्याने स्त्रियांना नग्न होऊन लिंब नेसण्याच्या प्रथेवर बंदी आहे. तरीही या उत्सवाच्या वेळी स्त्रिया व मुली कपड्यांवर लिंब बांधताना दिसतात.

‘रेणुका माहात्म्य’ या ग्रंथात लिंब नेसण्याची एक कथा आहे. परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रीय केली तेव्हा शरणार्थींना संरक्षण दिले. जोगीनाथ तीर्थाला जा, आंघोळ करून लिंब नेसा व रेणुकेची पूजा करा, असे सांगितले. त्यातून लिंब नेसण्याची प्रथा सुरू झाली असावी, असे सांगितले जाते.

यात्राकाळात बैलगाडी व कुस्ती स्पर्धा होतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी येथे होमाचे आयोजन केले जाते. हनुमान जयंती, माघी पौर्णिमा, गुढीपाडवा या दिवशीही येथे उत्सव साजरे होतात. देवी स्वयंभू व जागृत असून नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

उपयुक्त माहिती:

  • कोपरगाव शहरापासून २२ किमी, तर अहमदनगर शहरापासून १२३ किमी अंतरावर
  • नाशिक, कोपरगाव व वैजापूरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • निवास व न्याहरीसाठी कोपरगावमध्ये अनेक पर्याय
Back To Home