येळेश्वर मंदिर, येळी,

ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षक पुरविणारे गाव म्हणून अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील येळी हे गाव राज्यात प्रसिद्ध आहे. येथील घरटी एक वा दोन व्यक्ती शिक्षकी पेशात आहेत. या गावात असलेले प्राचीन येळेश्वर मंदिर, त्यावरील कोरीव शिल्पे व विविध कलाकुसर यामुळे हे स्थान शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी अभ्यासाचे, तर भाविकांसाठी श्रद्धेचे आहे.

अहमदनगर जिल्ह्यात इतिहासातील वैभवाची साक्ष देणारी अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी येळी येथील येळेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेच्या दृष्टीने महत्त्वाचे मंदिर मानले जाते. एका आख्यायिकेनुसार, कित्येक वर्षांपूर्वी दंडकारण्य असलेल्या या भागातील येळू बेटावर अनेक साधू तपसाधना करीत असत. त्यातील काही साधूंनी येथे शिवपिंडीची स्थापना करून त्याचे नामकरण येळेश्वर महादेव असे केले. पुढे या मंदिराच्या नावावरून गावाला येळी हे नाव पडले.

येळेश्वर महादेवाचे हे मंदिर १४ व्या शतकात बांधले असावे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर प्रांगणात अखंड काळ्या पाषाणात कोरलेला नंदी आहे. नव्याने बनविलेल्या या नंदीवरील कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जागेवर असलेली पुरातन नंदीची मूर्ती भग्न झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी नवी मूर्ती येथे प्रतिष्ठापित केली आहे. नंदीची प्राचीन मूर्तीही मंदिराच्या प्रांगणात पाहता येते. काही वर्षांपूर्वी या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असला तरी ते करताना या वास्तूचे मूळ स्वरूप कायम ठेवले आहे.

पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. या मंदिराचे विशिष्ट शैलीतील बांधकाम, त्यावरील शिल्पे, नक्षीकाम, भिंतींवर व खांबांवर असलेल्या मूर्ती यावरून ही वास्तू यादवकालीन असल्याचे जाणवते. साधारणतः सहा ते सात फूट उंच जगतीवर (जोता, पाया) मंदिर उभे आहे. संपूर्ण दगडी बांधणीच्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या खालील बाजूला कीर्तिमुख, तर द्वारपट्टीवर गणेशाचे शिल्प आहे.

सभामंडपातील खांबांवर सुबक नक्षीकाम असून वरच्या बाजूला वाद्य वाजविणारे भारवाहक यक्ष, तर खालील बाजूला कीर्तिमुख व अनेक देव-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. यातील एका खांबावर महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सभामंडप व गाभारा यामधील वैशिष्ट्यपूर्ण अंतराळ. या अंतराळाच्या भिंतींवर नखशिखांत शिल्पखजिना पाहायला मिळतो. येथील गर्भगृहाकडील भिंतीवर गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरील भागात नऊ मुखे कोरलेली दिसतात. ही नऊ मुखे म्हणजे नवग्रह असून या मंदिराचे ते वैशिष्ट्य असल्याचे सांगितले जाते. अशा पद्धतीने कोरलेली नऊ मुखे अन्य प्राचीन मंदिरांमध्ये पाहायला मिळत नाहीत.

मंदिराच्या प्रांगणात असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रीगणेश, विठ्ठल-रुक्मिणी यांच्यासह संत वामनबाबा व संत भगवानबाबा यांच्या मूर्ती आहेत. हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येळेश्वराची मोठी यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. याशिवाय श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीलाही येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

उपयुक्त माहिती:

  • पाथर्डीपासून १६ किमी, तर अहमदनगरपासून ६९ किमी अंतरावर
  • पाथर्डीपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहन तळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home