कळसूबाई शिखरानंतर (५४०० फूट) अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच डोंगर म्हणून जवळे डोंगर ओळखला जातो. या डोंगराला ‘सुवर्ण डोंगर’ असेही म्हटले जाते. या डोंगराच्या माथ्यावर बाळेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून ४०७१ फूट उंचीवर असलेले हे देवस्थान भाविक व पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. संगमनेरमधील थंड हवेचे ठिकाण म्हणूनही बाळेश्वर ओळखले जाते.
या मंदिराची अख्यायिका अशी की श्रीराम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना दंडकारण्याचा भाग असलेल्या या जवळे डोंगरावर त्यांनी मुक्काम केला होता. या वेळी त्यांनी शिवलिंग स्थापित करून त्याची पुजा केली होती. म्हणून बाळेश्वर मंदिरासमोर रामेश्वराचे स्थान आहे. आज जेथे बाळेश्वर मंदिर आहे तेथे अगस्ति ऋषिंनी महादेवांची १२ वर्षे तपश्चर्या केली होती. त्यांची तपश्चर्या सुरू असताना महादेव बाळरुपात येथे त्यांना भेटायला आले, म्हणून या तीर्थक्षेत्राचे नाव बाळेश्वर असे पडले.
संगननेर-आळेफाटा मार्गावर असलेल्या वरुडी पठार येथून बाळेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. गुंजाळवाडीपासून १२ किमी अंतराचा हा रस्ता तीव्र चढावाचा व नागमोडी वळणांचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेली गर्द वनराई, निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असलेला संपूर्ण परिसर, डोंगर व दऱ्या असे सौंदर्य डोळ्यांत साठवत या मार्गावरून मंदिरापर्यंत खासगी वाहनाने जाता येते. या मंदिरापर्यंत पोचण्यासाठी दुसरा पायरी मार्गही आहे. पायरी मार्गावरून गेल्यास आधी रामेश्वराचे स्थान लागते. नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर व राहता या तालुक्यांच्या सीमेवर हे मंदिर असल्यामुळे या परिसरातून तिनही तालुक्यांतील अनेक गावांचे विहंगम दर्शन होते.
बाळेश्वर मंदिराभोवती असलेल्या मोकळ्या जागेवर पेव्हरब्लॉक लावल्याने हा परिसर प्रशस्त व स्वच्छ भासतो. मंदिरासमोरील जागेत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या दोन विहिरी (बारव) आहेत. असे सांगितले जाते की अगस्ति ऋषींनी हे बारव तयार केले असून त्यांतील पाणी ते वापरत असत. पूर्वीच्या काळी या बारवांमधील पाणी कधीही आटत नसे.
मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुला असलेल्या दर्शन मार्गाजवळ अगस्ती ऋषींचे मंदिर आहे. मुख्य मंदिर ४ फूट उंच जगतीवर (जोते) उभे आहे. ७ ते ८ पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जाता येते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हत्तींची शिल्पे आहेत. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरुप आहे. प्रवेशद्वाराजवळ सभामंडपात नंदी स्थानापन्न आहे. येथील वेगळेपण असे की या नंदीचे मुख हे महादेवाच्या पिंडीकडे नसून ते उत्तरेकडे वळलेले आहे.
गर्भगृहाच्या बाजुला असलेल्या देवड्यांमध्ये उजवीकडे गणेशाची मूर्ती तर डावीकडे काही शिल्पे आहेत. गाभाऱ्यात काहीशी खोलवर दगडी शिवपिंडी आहे. मंदिराच्या पायरी मार्गावर रामेश्वराचे स्थान आहे. तेथे एका झाडाखाली शिवपिंडी व नंदी आहेत. त्याच्या सर्व बाजुने अर्धभिंत उभारण्यात आली आहे. येथे भाविकांनी नवसपूर्तीनंतर वाहिलेले अनेक नंदी मांडून ठेवण्यात आलेले आहेत.
बाळेश्वर या तीर्थस्थानाचे विशेष म्हणजे येथे महादेवाचे बाळ रुप असल्याचे मानले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. त्यामुळे मंदिराचा हा पूर्ण परिसर प्रसाद, हार-फुलांची दुकाने व भाविकांनी भरून जातो. महाशिवरात्र व गुरुपौर्णिमा हे सणही येथे उत्साहाने साजरे होतात. उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून तर पावसाळ्यात पर्यटनासाठी येथे पर्यटकांचीही वर्दळ असते.