
संत कैकाडी महाराज, साईबाबा, संत जनार्दन स्वामी (मौनगिरी), रामराव महाराज देसाई, कोंडाजी काका या संतमहंतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या संगमनेर तालुक्यातील कोकणगावला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. चहुबाजूला असलेले डोंगर, गर्द वनराई अशा निसर्गसमृद्ध परिसरात निर्झणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रपटात या मंदिराचा उल्लेख आहे. सध्या हा ताम्रपट संगमनेर येथील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की शंकर व पार्वती येथील सनकडी पर्वतावर काही काळ विश्रांतीसाठी थांबले होते. या पर्वतावर त्यांच्या पायांचे ठसे उमटले आहेत. पांडव अज्ञातवासात असताना तेही येथे थांबले होते. पांडवांनी येथे यज्ञ करून शिवलिंगाची स्थापना केली. निर्झराच्या म्हणजेच ओढ्याच्या कडेला हे स्थान असल्याने त्याला ‘निर्झणेश्वर’ असे नाव पडले. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, पांडवांनी येथील जोरवे गाव म्हणजे पूर्वीच्या जरासंध नगरीजवळ जरासंधाचा वध केला. त्यानंतर त्यांनी येथे तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले. तेव्हापासून महादेवाचे येथे वास्तव्य आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार निर्झणेश्वर मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांच्या काळात निमगावजाळी येथील सरदार त्रिंबकजी डेंगळे यांनी केलेले आहे. त्याचवेळी मंदिर परिसरात त्यांनी बारव बांधली. मंदिराभोवती तटभिंती असून चारही बाजूने त्यात प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून मुख्य मंदिरासमोर दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे. याच भागात काही विरगळी व प्राचीन शिल्पे आहेत. गणपती व श्रीदत्त यांची मंदिरेही येथे आहेत.
मुख्य मंदिराची रचना नंदीमंडप, सभागृह आणि गाभारा अशी आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर (प्रवेशद्वाराचा वरचा भाग) १९३२ मध्ये प्रथम जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. उत्सव काळात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी येथे दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गाभाऱ्यात शिवपिंडी आहे. २०१२ मध्ये जुन्या शिवपिंडीच्या जागी नव्या पिंडीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामागे राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत.
असे सांगितले जाते की १८९१ मध्ये सद्गुरू गंगागिरी महाराज या मंदिरात आले तेव्हा ग्रामस्थांकडे या ठिकाणी अधिक मासात सप्ताह घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची तयारी केली. या परिसरात पाण्याची कमतरता असल्याने तेव्हा महाराजांच्या अनुयायांनी पालखीतून गोदावरीचे पाणी आणून मंदिर परिसरात असलेल्या बारवमध्ये टाकले व सप्ताहासाठी भासणाऱ्या पाण्याच्या कमतरतेवर मात केली. हा सप्ताह सुरू असताना तुपाची कमतरता निर्माण झाली. तेव्हा गंगागिरी महाराजांनी बारवेतील पाण्याचे तुपात रूपांतर करून तुपाची उणीव दूर केली होती. तेव्हापासून सुरू असलेला हा सप्ताह आजही येथे साजरा होतो.
संत जनार्दन स्वामींनी अनेक अनुयायांसह या मंदिरात अनुष्ठान केले होते. तसेच शांतीगिरी महाराज यांनीही येथे अनुष्ठान केले होते. सरला बेटाचे मठाधिपती महंत नारायणगिरी महाराज, श्री क्षेत्र देवगड, ता. नेवासा येथील किसनगिरी महाराज, श्री उद्धव महाराज हे अनेकदा निर्झणेश्वराच्या दर्शनाला आल्याचे ग्रामस्थ सांगतात.
२०१७ मध्ये सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या हस्ते या मंदिरात गणपती, हनुमान, सावित्री, लक्ष्मी, विठ्ठल व रुख्मिणी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. महाशिवरात्री व श्रावण महिन्याच्या दर सोमवारी येथे यात्रा भरते. या दिवशी हजारो भाविक निर्झणेश्वराच्या दर्शनाला येतात. मंदिर ट्रस्टतर्फे परिसरात भाविकांसाठी भक्तनिवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मंदिरात पहाटे ५ वाजता आरती होते. भाविकांना पहाटे ५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत निर्झणेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.