जनार्दन स्वामी (मौनगिरी) समाधी मंदिर,

बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. नगर

परस्त्री, परधन, परअन्न आणि परनिंदा यांचा त्याग ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, हे सांगणारे श्री सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) यांचे कोपरगाव येथील समाधीमंदिर प्रसिद्ध आहे. धर्मजागृती आणि मानवतावादी दृष्टिकोनाची शिकवण देणारे जनार्दन स्वामी हे शंकराचे अवतार मानले जातात. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ते नगर जिल्ह्यातील बेट कोपरगाव येथे होते. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली पर्णकुटी आणि त्यांच्या पाऊलखुणांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दररोज हजारो भाविक येत असतात.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (औरंगाबाद) कन्नड तालुक्यात टापरगाव या लहानशा खेड्यात २४ सप्टेंबर १९१४ या दिवशी जनार्दन स्वामींचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जनार्दन स्वामींच्या स्वभावात लहानपणापासूनच देवाबद्दल श्रद्धा, माणसांबद्दल प्रेम, परोपकार आणि क्षमा या भावना होत्या. लहान वयातच त्यांनी धर्मजागृतीचा मार्ग निवडला. दुसरीपर्यंत शिक्षण झालेल्या जनार्दन स्वामींना भगवदगीता, भागवत आदी ग्रंथ मुखोद्‌गत होते. सर्वसामान्यांना सोप्या व ग्रामीण भाषेत अध्यात्माची महती पटवून देऊन, वेदांचा अर्थ त्यांनी सांगितला.

स्वामींनी आपल्या कार्यकाळात आंदरसूल, श्री क्षेत्र जातेगाव, वेरूळ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, बेट कोपरगाव येथे पुरातन महादेव मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तसेच काही ठिकाणी नव्याने मंदिरे बांधली. हे करता करता तेथील शेतकऱ्यांची उन्नती व्हावी, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नाशिक, नगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत त्यांनी अनेक शाळा काढल्या. अनेक ठिकाणी विहिरी खोदून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खेळते राहील, याची व्यवस्था केली.

आपल्या कोपरगाव येथील वास्तव्यात विनायक रासकर (तात्या) यांच्या शेतात झोपडी बांधून स्वामी राहत असत. त्यावेळी कोपरगाव परिसरात अनेक गावांमध्ये स्वामींची प्रवचने होत असत. बेट कोपरगाव येथील भूमी गंगा या परिसरात स्वामींनी काशिविश्वनाथ मंदिर बांधण्यासाठी जागेची निवड केली. त्यानुसार त्यांना तेथे २६ एकर जागा मिळाली. १९८५ मध्ये भूमिपूजन करून स्वामींनी आपले भक्तगण, सेवेकरी यांच्या मदतीने येथे काशी विश्वनाथ मंदिर उभारण्यास सुरुवात केली. यावेळी हजारो भक्त श्रमदान करू लागले. काम वेगाने सुरू असताना या मंदिराच्या शेजारी स्वामींनी आश्रमाचीही उभारणी केली.

१९८६ साली गुरुवारी, माघ शुद्ध दशमी या तिथीवर कोपरगाव बेट येथील आश्रमात सामुदायिक अनुष्ठान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या या कार्यक्रमात बाबांनी आपल्या हजारो शिष्यांना अनुग्रह दिला. सकाळ, दुपार, संध्याकाळी येथे बाबांची प्रवचने होत असत. या अनुष्ठान कार्यक्रमात एक अमेरिकन तरुण सहभागी झाला होता. त्यालाही स्वामींनी अनुग्रह दिला. असे सांगितले जाते की स्वामी मराठीतून मार्गदर्शन करताना त्याला ते इंग्रजीमधून ऐकू जायचे. त्यामुळे स्वामींकडून होत असलेले प्रवचन त्याला समजत असे. कार्यक्रमाच्या समाप्तीच्या वेळी त्र्यंबकेश्वर येथील कवी प्रभाकर टोके यांनी जनार्दन स्वामींची आरती तयार केली. कोपरगाव बेट येथील आश्रमात तयार झालेली ‘आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनींची…’ ही स्वामींची आरती बहुश्रृत आहे.

कोपरगाव येथील काशी विश्वनाथ मंदिराचे काम सुरू असताना १९८८ मध्ये स्वामींनी शेकडो शिष्यांसमवेत १६ दिवसांची दक्षिण भारत यात्रा केली. यावेळी त्यांनी समुद्र स्नान, कावेरी व गंगा स्नान केले. त्यानंतर बाबांचे कार्य सर्वत्र जोमाने सुरू होते. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या राज्यभरातील शिष्यांनी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. १ सप्टेंबर १९८९ या दिवशी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे बाबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातील पवित्र ठिकाणांहून आणलेल्या पाण्याने स्वामींना मंगलस्नान घालण्यात आले. यामध्ये सुवर्णस्नान, सप्तसमुद्र स्नान, सप्तनद्या स्नान सप्तसरोवर, सर्व तीर्थ स्नान यांचा समावेश होता. त्यानंतर सप्तधान्याची तुला करण्यात आली.

निफाड येथे साजरा केलेला ७५ वा वाढदिवस (अमृतमहोत्सव) हा स्वामींचा शेवटचा वाढदिवस ठरला. त्यानंतर त्यांची तब्बेत खालावली. नाशिक येथील रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आले, परंतु स्वामींना रुग्णालयात राहायचे नव्हते. त्यांच्या आग्रहावरून नाशिक येथील श्री शर्वाएश्वर महादेव मंदिराशेजारील पर्णकुटीत त्यांना नेले व तेथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले, परंतु हे उपचार कामी आले नाहीत. १० डिसेंबर १९८९ रोजी स्वामींनी आपल्या जवळ असलेल्या शिष्यांना सांगितले की माझे येथील काम संपले आहे व त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच.

स्वामींच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांच्या देहाची महायात्रा नाशिक शहरातून कोपरगावकडे निघाली. स्वामींचे लाखो शिष्य या महायात्रेत सहभागी झाले होते. सर्वांच्या मुखातून एकच भजन पुन्हा पुन्हा येत होते, ’हीच आशा एक देवा पुन्हा याल का या गावा…’ दुसऱ्या दिवशी ११ डिसेंबर १९८९ या दिवशी कोपरगाव येथील सध्या असलेल्या मंदिराच्या जागेवर त्यांचा देह ठेवण्यात आला. अनेक साधू संतांच्या उपस्थितीत त्यांच्यावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे कोपरगावचे हे ठिकाण स्वामी भक्तांमध्ये व त्यांच्या शिष्यांमध्ये विशेष महत्त्वाचे समजले जाते. स्वामींचा या ठिकाणी कायम वास आहे, अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे.

कोपरगाव-शिर्डी मार्गालगत बेट कोपरगाव येथे श्री जनार्दन स्वामी यांचे समाधी मंदिर आहे. त्यांनीच उभारलेल्या काशी विश्वनाथ मंदिराला लागून हे स्थान आहे. स्वामींचे कार्य त्यांच्या पश्चातही सुरू राहावे, यासाठी त्यांच्या शिष्यांकडून हे समाधी मंदिर उभारण्यात आले. सुमारे एक एकर परिसरात स्वामींचे मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, नर्मदा देवी मंदिर, स्वामींची पर्णकुटी, प्रसादालय आणि भक्तनिवास उभारण्यात आले आहे.

मुख्य समाधी मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रशस्त सभागृहाच्या पुढील बाजूस जनार्दन स्वामींची पंचधातूपासून बनविलेली आसनस्थ स्वरूपातील प्रसन्न मूर्ती प्रतिष्ठापित आहे. स्वामींच्या मूर्तीसमोर शिवलिंग असून त्यासमोर स्वामींच्या पादुका आहेत. समाधी चौथऱ्यावर व मूर्तीजवळ जाण्यास परवानगी नसल्याने या पादुकांचीच भाविक पूजा करतात.

मंदिर न्यासाच्या परवानगीने समाधी मंदिरात अभिषेक, पूजा, सत्यनारायण महापूजा असे विधी करता येतात. गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र, स्वामींची जयंती व पुण्यतिथी या दिवशी स्वामींच्या मूर्तीला अभ्यंगस्नान व अभिषेक केला जातो. दररोज सकाळी ५ ते ७ या वेळेत स्वामींची पूजाविधी असते. भाविकांना सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत मंदिरात स्वामींचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • कोपरगाव बस स्थानकापासून २ किमी, तर अहिल्यानगरपासून ९६ किमी अंतरावर
  • नाशिक, येवला, शिर्डी व नगरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • दुपारी व सायंकाळी मंदिराच्या प्रसादालयात निःशुल्क भोजनाची सुविधा
  • भाविकांसाठी भक्तनिवासाची सुविधा
Back To Home