
‘महाराष्ट्राचा स्वर्ग’ अशी ख्याती असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या वैभवात आढळा नदीच्या तीरावरील टाहाकारी येथील प्राचीन जगदंबा मातेच्या शिल्पमंदिराने आणखी भर घातली आहे. येथील शिल्पवैभवामुळे या मंदिराची तुलना सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर व ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शिवालयाशी केली जाते. या मंदिराचा सभामंडप व अंतराळाच्यावर वितानाला (छत) असलेले भला मोठे दगडी झुंबर हा वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीचा उत्कृष्ट असा नमुना समजला जातो.
मंदिराची आख्यायिका अशी की टाहाकारी व आजूबाजूचा परिसर पूर्वी दंडकारण्यात येत होता. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर विरहाने व्याकुळ झालेले श्रीराम तिचा शोध घेत या परिसरातून जात होते. त्या वेळेस कैलास पर्वतावर महादेवांकडून ‘श्रीराम…. श्रीराम….’ हा जप सुरू होता. त्यावर पार्वती महादेवांस रागावून म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही, त्या रामाचे ध्यान तुम्ही का करत आहात? यावेळी शंकराने उत्तर दिले की, तुझा विचार चुकीचा आहे.
तू हवी तर श्रीरामांची परीक्षा घेऊ शकतेस. त्यानुसार पार्वती एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन दंडकारण्यात श्रीरामाला मोहित करण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा श्रीरामांनी पार्वतीला ओळखून दंडवत घातला. त्यामुळे श्रीरामाची भक्ती महादेव का करतात, हे पार्वतीला कळून चुकले. त्यानंतर पार्वतीने प्रसन्न होऊन श्रीरामाना सीतेच्या शोधासाठी पुढचा मार्ग दाखवला. भक्तांसाठी जगदंबा देवीच्या रूपात येथे थांब, अशी विनंती श्रीरामाने पार्वतीकडे केली. तेव्हापासून पार्वती या ठिकाणी जगदंबा मातेच्या रूपाने राहिली. हे ठिकाण टाहाकारी येथील जगदंबा मातेचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
निसर्गसमृद्ध परिसरात असलेल्या जगदंबा मातेच्या प्राचीन मंदिराचे शिल्पसौंदर्य मनाला भुरळ घालणारे आहे. या मंदिरावरील असंख्य वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांमुळे त्याला ‘टाहाकारीचे शिल्पमंदिर’ असेही म्हटले जाते. श्रीराम व देवी पार्वती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण जगदंबेच्या वास्तव्यामुळे भाविकांमध्ये विशेष प्रिय आहे. जगदंबेचे हे स्थान जागृत असून ही देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
उत्तराभिमुख असलेले मंदिर अष्टकोनी आकारात, हेमाडपंती शैलीत, काळ्या पाषाणात बनवलेले आहे. मंदिराभोवती आवार व त्याभोवती सुमारे ७ फूट उंचीची दगडी भिंत आहे. मंदिर त्रिकूट स्वरूपाचे (सभामंडप, दोन लहान मंडप, अंतराळ व गाभारा) आहे. या तीनही मंडपांवर शिखरे आहेत. मंदिराच्या बांधकामात चुन्याचा वापर न करता दगड एकमेकांमध्ये गुंफून जोडलेले आहेत. मंदिर ४ फूट उंच जगतीवर (जोते) उभे आहे. सभामंडपात विविध कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. भौमितिक आकृत्या, पौराणिक प्रसंग, हत्ती, घोडे व इतर प्राणी, यक्ष, अप्सरा, ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, चामुंडा या देव-देवतांच्या मूर्ती येथे कोरण्यात आलेल्या आहेत. या शिल्पांतील सौंदर्यवती विविध मुद्रेत कोरलेल्या आहेत. नृत्यांगना, आकर्षक वेशभूषेतील सुरसुंदरी, अलंकार परिधान केलेल्या ललनांची रेखीव शिल्पे आहेत. सभामंडपाचे व अंतराळाचे छत कोरीव कामाने नटलेले आहे. येथील वितानांवर (छत) घुमटाकार आकारात विविध फुलांची नक्षी (दगडी झुंबर) आहे. गाभाऱ्याचे प्रवेशद्वारही कोरीव कामांनी युक्त आहे.
गाभाऱ्यात १८ हातांमध्ये विविध आयुधे धारण केलेली, वाघावर उभी असलेली, महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. या मूर्तीसमोर देवीचा तांदळा (हात-पाय किंवा अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती) आहे. पूर्व व पश्चिमेकडील लहान मंडपांत महालक्ष्मी व भद्रकाली यांच्या मूर्ती आहेत.
मंदिराची बाह्य भिंत अनेक कोन असलेली आहे. गाभाऱ्याच्या बाहेरील देवकोष्ठांमध्ये चामुंडामाता, नृत्यशंकर व इतर देवतांच्या मूर्ती आहेत. दोन नक्षीदार स्तंभाच्या मधल्या कोनाड्यांत सुरसुंदरींची शिल्पे आहेत. त्यामध्ये दर्पणा, पुत्रवल्लभा, विवस्त्रधा यांचा समावेश आहे. डोक्यावर छत्र घेतलेली, उघड्या कोटासारखे वस्त्र नेसलेली एक स्त्री-मूर्तीही येथे कोरलेली पाहायला मिळते.
गाभाऱ्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी नेहमीप्रमाणे गोमुखाची रचना न करता येथे मकरमुख कोरलेले आहे. या मकरमुखावरही कोरीव काम केलेले दिसते. जगतीच्या दगडांवर गायक, वादक, नर्तक व मैथुनशिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या समोरील बाजूकडून नदीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या मार्गावर असलेल्या एका कोरीव खांबावर शिलालेख कोरला आहे. जवळच शेषनागाचे व शेषशायी विष्णूचे शिल्प असलेले मंदिर आहे.
चैत्र पौर्णिमेला मंदिरात देवीचा उत्सव असतो. यावेळी सजविलेल्या रथामध्ये देवीचा चांदीचा मुकुट व मूर्ती ठेवून त्याची गावात मिरवणूक काढली जाते. या दिवशी देवीचा झेंडा व मोरपीस असलेल्या मानाच्या काठीची मिरवणूकही काढली जाते. त्यामध्ये शेकडो भाविक सहभागी होतात.