
कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील सराफ बाजारात गोदावरी नदीच्या काठावर गोवर्धनधारी मंदिर स्थित आहे. मुरलीधर मंदिर म्हणूनही पंचक्रोशीत या स्थानाची ख्याती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे श्री गोपालकृष्णाची गोवर्धनधारी संपूर्ण एकाच दगडापासून बनविलेली प्राचीन मूर्ती. या एकसंध मूर्तीचे सर्व वस्त्रालंकारही दगडात कोरलेले आहेत.
येथील गोदावरीच्या तीरावर असलेल्या अनेक मंदिरांमध्ये एखादा जुना वाडा भासावा, अशा पद्धतीने गोवर्धनधारी मंदिराचा प्रवेशमार्ग आहे. प्रशस्त प्रांगणात मंदिराच्या सभोवती पेव्हरब्लॉक बसविले आहेत. त्यामळे हा परिसर स्वच्छ व टापटीप भासतो. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडप हा मूळ मंदिरापुढे नंतरच्या काळात बांधलेला असावा. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात एका चौथऱ्यावर गोवर्धनधारी श्रीकृष्णाची मूर्ती मध्यभागी असून डाव्या बाजूला एक स्त्री मूर्ती व उजव्या बाजूस एक पुरुष मूर्ती आहे. श्रीकृष्णाची मूर्ती अष्टकोनी शिळेवर असून मूर्तीच्या पायाजवळ गोमाता आहे. गोवर्धन पर्वतावर मंदिर, झाडे, मोर, वानर,
हत्ती, गायी व वासरे कोरलेली आहेत. याशिवाय पर्वतावर शिवलिंगस्वरूप महादेव व मुरलीधर यांच्या मूर्ती आहेत.
पूजा व अभिषेक करताना जलधारा किंवा पंचामृत जेव्हा मूर्तीवर पडते तेव्हा अभिषेक फक्त वरील मुरलीधराच्या मूर्तीचाच होतो, पर्वताखालील तीनही मूर्तींच्या केवळ पायाजवळून अभिषेकाचे पाणी खाली उतरते. खालच्या मूर्ती पूर्णपणे ओल्या होत नाहीत. जेव्हा इंद्राने अतिवृष्टी करून गोकुळामध्ये प्रलयंकारी परिस्थिती निर्माण केली होती, तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून संपूर्ण गोकुळाचे रक्षण केले होते. मूर्तिकाराने आपले कसब पणाला लावून ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तयार केली आहे. असे सांगितले जाते की, गंडकी नदी पात्रातील गंडक दगडापासून मूर्तिकाराने शेकडो वर्षांपूर्वी ही अखंड मूर्ती बनविली आहे.
संपूर्ण गोकुळाचे रक्षण ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने केले त्याचप्रमाणे तो आपलेही रक्षण करतो, अशी दृढ समजूत कोपरगाववासीयांमध्ये आहे. असे सांगितले जाते की, गोदावरी नदीने ९ सप्टेंबर १९६९ या दिवशी रौद्ररूप धारण करून संपूर्ण कोपरगाव शहराला वेढा दिला होता. या पुराचे पाणी जेव्हा गोवर्धनधारी श्रीकृष्ण मूर्तीच्या पायापर्यंत आले त्यानंतर लगेचच महापूर ओसरण्यास सुरुवात झाली होती. तसेच २००६ मध्ये आलेल्या महापुराचे पाणी मंदिरामध्ये येऊ लागले तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने श्रीकृष्णाची पूजा करून, पुराचे पाणी देवाच्या पायास लावून परत नदी पात्रात ते समर्पित केले व पुराचे पाणी वेगाने ओसरू लागले.
या मंदिराबाबत अशी मान्यता आहे की शहरावर अथवा व्यक्तीवर कोणतेही संकट आले तर येथे देवास पूजा, अभिषेक अथवा श्रीमद्भागवताचे पारायण केल्यास ते संकट दूर होते. त्यामुळे अनेक भाविक येथे अभिषेक करण्यासाठी येत असतात. प्रत्येक एकादशीला येथे महाअभिषेक व द्वादशीला अन्नदान करण्यात येते. याशिवाय गोकुळाष्टमी व रामनवमी येथे उत्साहाने साजरी होते.