केळेश्वर महादेव मंदिर,

केळी रुम्हणवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका महाराष्ट्राचे ऐतिहासिक व धार्मिक वैभव समजले जाते. राज्यातील सर्वोच्च शिखर कळसूबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड यांसारखे सह्याद्रीचे सुंदर दुर्गरत्न येथे आहेत. निसर्गसमृद्ध परिसरामुळे या भागाला ‘महाराष्ट्राचा स्वर्ग’ असे म्हटले जाते, तर टाहाकारी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिर, अकोले येथील सिद्धेश्वर मंदिर यांसारख्या ‘शिल्पमंदिरां’मुळे आध्यात्मिक व मंदिर स्थापत्याच्या दृष्टीनेही या तालुक्याचे विशेष महत्त्व आहे.

अकोले तालुक्यातील केळी रुम्हणवाडी या निसर्गसमृद्ध परिसरात आढळा नदीच्या तीरावर व डोंगराच्या पायथ्याशी केळेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ‘प्रति त्र्यंबकेश्वर’ अशी ख्याती असलेल्या या मंदिराजवळील केळे तीर्थावर ११ सोमवारी स्नान केल्यास अंगावरील कोड निघून जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की द्वापारयुगात कर्नाटकातील एक राजा सुदन्व याने दरबारात न्याय निवाडा करताना चूक केली व एका ब्राह्मण स्त्रीच्या विरोधात निवाडा दिला. कोणताही गुन्हा केलेला नसताना राजाने आपल्याविरोधात निवाडा दिल्याने चिडलेल्या ब्राह्मण स्त्रीने राजाला शाप दिला की तुमच्या सर्व अंगावर कोड येऊन, असह्य वेदना होऊन, त्यात तुमचा मृत्यू होईल. स्त्रीचा हा शाप ऐकून राजाने त्वरित आपली चूक मान्य केली व या शापातून मुक्ती देण्याची विनंती केली.

राजाच्या विनवणीनंतर त्या स्त्रीने राजाला शापातून मुक्तीचा मार्ग सांगितला की दंडकारण्यातील त्र्यंबक तीर्थक्षेत्री असलेल्या कुशावर्तावर स्नान करून त्र्यंबकेश्वर महादेवाची प्रार्थना केल्यास या शापातून मुक्ती मिळेल. त्यानुसार सुदन्व राजा तेथून त्र्यंबक नगरीसाठी निघाला. मजल-दरमजल करीत तो केळी रुम्हणवाडी येथे पोचला, परंतु तोपर्यंत त्याच्या अंगावर कोड उठून असह्य वेदना सुरू झाल्या होत्या. त्याला पुढे चालणे शक्य नव्हते. अखेर राजाने तेथेच थांबून त्र्यंबकेश्वराचा धावा केला. राजाच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन त्र्यंबकेश्वर महादेवाने त्याला दर्शन दिले. तेव्हा राजाने दरबारात घडलेली हकिगत सांगितली. आपला भक्त कुशावर्तावर स्नानासाठी जाऊ शकत नाही म्हणून महादेवांनी राजा जेथे तपश्चर्या करीत होता, त्याच ठिकाणी कुशावर्त तीर्थाइतके पवित्र तीर्थ निर्माण केले. यापुढे या तीर्थावर स्नान केल्यास कुशावर्तावर स्नान केल्याचे पुण्य मिळेल, असे सांगून व आशीर्वाद देऊन महादेव तेथून अंतर्धान पावले. राजाने त्या कुंडात स्नान केल्यावर त्याच्या वेदना थांबल्या व त्याचे शरीर पूर्ववत झाले. तेव्हापासून महादेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व कुशावर्तसारखे महत्त्व असलेल्या या केळी तीर्थावर पवित्र स्नानासाठी अनेक भाविक येत असतात.


बाराव्या शतकातील बांधकाम असलेले हे मंदिर हेमाडपंती शैलीतील आहे. केळेश्वर मंदिराला लागूनच गणेश व काशाई माता यांची मंदिरे आहेत. मंदिराच्या प्रांगणात असलेली येथील चौकोनी बारव ही केळीतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. बारवेला चारही बाजूंनी दगडी पायऱ्या आहेत. या बारवेत गोमुखातून सतत पाणी पडत असते, तरीही येथील पाण्याची पातळी एकसारखी राहते.

केळेश्वराच्या प्रवेशद्वारासमोर बाहेरील बाजूस नंदी आहे. सभामंडपातून पुढे गर्भगृहाच्या द्वारशाखेवर अनेक कोरीव शिल्पे आहेत. गर्भगृहात शिवपिंडीवर पितळी आवरण असून त्यावर महादेवाचे मुख आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी कीर्तन, भजन यांसारखे कार्यक्रम होतात. आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. याशिवाय श्रावणी सोमवारी येथे दर्शनासाठी शेकडो भाविक येतात. केळेश्वर महादेवाच्या दर्शनाने त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

उपयुक्त माहिती:

  • अकोले शहरापासून ३१ किमी, तर अहमदनगरपासून १५० किमी अंतरावर
  • अकोले येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home