मळगंगा देवी मंदिर

टाकळी हाजी ता. शिरूर, जि. पुणे / निघोज, ता. पारनेर, जि. नगर


पुणे जिल्ह्यातील शिरूर व नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यांच्या सीमेवर कुकडी नदीच्या पात्रात मळगंगा देवीची दोन मंदिरे आहेत. ऐलतिरी व पैलतिरी असणाऱ्या या दोन मंदिरांपैकी एक शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे, तर दुसरे पारनेर तालुक्यातील निघोज येथे आहे. या मंदिरांच्यामधून कुकडी नदीचा प्रवाह जातो. दोन्ही मंदिरांमधील अंतर तीन किमी असले तरी नदीवरील झुलत्या पुलावरून पायी दोन-चार मिनिटांत भाविक व पर्यटकांना एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात जाता येते.

पुणे व नगर जिल्ह्याची सीमा म्हणजे येथील कुकडी नदीचा प्रवाह. या प्रवाहामुळे तयार झालेले येथील ‘रांजण खळगे’ आशियातील सर्वात मोठे असल्याचे सांगितले जाते. मळगंगा मंदिराला लागूनच असलेले हे ‘रांजण खळगे’ पाहण्यासाठी येथे शेकडो पर्यटक येत असतात. (नदीपात्रात कठीण आणि मृदू खडक एकत्र असतात. वेगात येणाऱ्या प्रवाहाबरोबर लहान-मोठे दगड-गोटे येतात. दगड-गोटे आणि येथील खडक यांच्यातील घर्षणाने मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच राहतो. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या क्रियेमुळे नदी पात्रात ‘रांजण खळगे’ तयार होते.)
मंदिराची आख्यायिका अशी, फार पूर्वी धुमाक्ष नावाच्या दैत्याने अनेक देवी-देवतांची उपासना करून त्यांच्याकडून वर मागून घेतले. त्यानंतर तो उन्मत्त झाला व पृथ्वीवरील साधुसंतांना त्रास देऊ लागला. स्वर्गातील देवांनाही त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्व देवांनी शंकराची आराधना केली. शंकराने अंतदृष्टीने जाणले की, या धुमाक्षाचे मरण कोणत्याही पुरुषाच्या हातातून होणार नाही. त्यासाठी शंकराने जटेतील आदिमायेला अवतार घेण्यास सांगितले. शंकराच्या विनंतीला मान देऊन आदिमायेने मळगंगेचा अवतार घेतला. आपल्यासोबत सात बहिणींना घेतले. यावेळी मळगंगा आणि धुमाक्ष दैत्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. देवीने सोडलेल्या दिव्य अस्त्राने धुमाक्ष राक्षसाचा मृत्यू झाला. युद्धानंतर देवीने विश्रांतीसाठी कुकुडी नदीच्या काठावरील जे स्थान निवडले, त्याच ठिकाणी आजची देवीची मंदिरे आहेत. असे सांगितले जाते की, युद्धात सहभागी झालेल्या देवीच्या सात बहिणी नदीवरील विविध गावांमध्ये विराजमान झाल्या आहेत. मळगंगा देवीचे मूळ ठाणे निघोजमध्ये आहे, तर टाकळी हाजी, चिंचोली, उंब्रज, बेलापूर येथे मळगंगा नावानेच इतर मंदिरे आहेत. या सर्व बहिणी आहेत.

टाकळी हाजी हे गाव घोडनदी आणि कुकडी नदी यांच्यामध्ये वसलेले असल्यामुळे त्याला बेट असेही म्हणतात. मळगंगा देवीचे हे स्थान १८०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. निघोजच्या मळगंगा देवीच्या मंदिरासमोर प्रशस्त सभामंडप उभारण्यात आला आहे. सभामंडपातील खांबांवर सुरेख कलाकुसर करण्यात आली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. गर्भगृहात मळगंगा देवी सिंहासन आरूढ आहे. मळगंगा देवीच्या उजव्या बाजूला झुलता पूल आहे. मंदिरातूनही रांजण खळग्यांचे दृश्य नजरेस पडते. टाकळी हाजीच्या मंदिराचा कळसही येथून दिसतो. या प्रसिद्ध मंदिरांतील मळगंगा देवी भाविक-भक्तांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारी माता म्हणून ओळखली जाते.

चैत्र वद्य कालाष्टमीपासून चार दिवस मळगंगा देवीची यात्रा असते. या यात्रेस पंचक्रोशीतील भाविक एकत्र येऊन देवीचा उत्सव साजरा करतात. उत्सवात देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. यावेळी मंदिर समितीकडून भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

नवरात्रीत मळगंगा देवीचा उत्सव साजरा होतो. नऊ दिवस अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. यावेळी अनेक भाविक येथे घटी बसतात. (घटी बसणे म्हणजे नऊ दिवस देवीच्या मंदिरात बसून पूजापाठ करणे, देवीचे स्तोत्र, देवीची गाणी म्हणणे, देवी सप्तशतीचे पठण करणे.) उत्सवादरम्यान भजन, कीर्तन, नामगजरही केला जातो. विजयादशमीला येथील नवरात्राची समाप्ती होते. दर मंगळवारी सकाळी सहा वाजता या मंदिरांमध्ये आरती होते. दोन्ही मंदिरे भाविकांसाठी २४ तास खुली असतात. भाविकांच्या सुविधेसाठी निघोजच्या मंदिर परिसरात भक्तनिवास बांधण्यात आले आहे.

उपयुक्त माहिती:

  • शिरूरपासून २२ किमी, तर पारनेरपासून ३४ किमी अंतरावर
  • टाकळी हाजी, निघोजसाठी एसटी बसची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • संपर्क : मंदिर समिती ९८८१३५०३४४
Back To Home