रेणुका माता मंदिर

देवाळा, ता. वाशिम, जि. वाशिम

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणजे माहूरची रेणुकामाता. एलांबा (एल्लम्मा), एकवीरा, यामांबा (यमाई), लज्जागौरी, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, सांतेरी ही सर्व रेणुका मातेचीच रूपे असल्याचे अभ्यासक सांगतात. ही देवी पार्वतीचे अवतारस्वरूप आहे. देशात अनेक ठिकाणी रेणुकामातेची मंदिरे आहेत. देवाळा गावातील रेणुका माता ही माहूरच्या रेणुका देवीचाच दिव्य अंश असल्याचे मानण्यात येते. या गावाचे वैशिष्ट्य असे की येथे नदीच्या अलीकडे व पलीकडे अशी देवीची दोन स्थाने आहेत. ती माहूरच्या रेणुकेचीच प्रतिरूपे असल्याचे मानण्यात येते.

रेणुका या शब्दाचा अर्थ रेणुमयी पृथ्वी असा होतो. ती भूदेवी आहे. पौराणिक आख्यायिकांनुसार, रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आहे. ‘महाभारता’मध्ये रेणुकेची उत्पत्ती कमळापासून झाली. यात रेणु हा तिचा भ्राता आणि सोमप हा पिता असल्याचे म्हटले आहे. तर ‘कालिका पुराणा’मध्ये रेणुका ही विदर्भ देशाच्या राजाची मुलगी असल्याचे म्हटले आहे. कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्र या राज्यांत रेणुकेची पूजा मोठ्या प्रमाणात होते.

देवाळा येथील रेणुका देवीच्या मंदिराबाबत आख्यायिका अशी की येथील नारायणराव पाटील चळक हे रेणुकामातेचे निस्सीम भक्त होते. ते नेहमी रेणुकामातेच्या दर्शनासाठी माहूरला जात असत. त्यांचे वय होऊ लागले तसे त्यांना देवीदर्शनासाठी जाण्यास त्रास होऊ लागला. तरी काही दिवस ते दर्शनाला जातच राहिले. त्यांचा वृद्धापकाळ आणि त्यांची भक्ती पाहून देवीने त्यांना साक्षात दर्शन दिले व सांगितले की ‘तुला माझ्या दर्शनासाठी येणे आता शक्य होत नाही, म्हणून मी तुझ्याबरोबर तुझ्या गावी येते. तिथे तू माझी स्थापना कर; परंतु एक अट आहे की तू मागे वळून पाहू नकोस. पाहिल्यास, तत्क्षणी मी तेथेच स्थापन होईन.’ त्याप्रमाणे नारायणराव चालू लागले. ते पैनगंगेच्या काठी पोहोचले. तेवढ्यात देवीच्या पायातील पैंजणांचा आवाज अचानक बंद झाला. तेव्हा कानोसा घेण्यासाठी नारायणरावांनी मागे वळून पाहिले आणि देवी तेथेच स्थिरावली. नारायणराव यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी देवीस विनवणी केली. अखेर देवीने त्यांना आणखी एक संधी दिली व ती नदीपल्याड असलेल्या त्यांच्या गावात येऊन स्थिरावली. यामुळे देवाळ्यात आजही रेणुकामातेची दोन मंदिरे आहेत.

मंदिराचा परिसर नदीकाठचा असल्याने वृक्षराजी आणि हिरवळीने नटलेला आहे. आजूबाजूला शेतमळे आहेत. मंदिर प्रांगणात एक मोठा दीपस्तंभ आहे. त्याच्या बाजूलाच विहीर आहे. देवीचे मंदिर उंच जगतीवर उभारलेले आहे. मंदिरासमोर पत्र्याचा मोठा मंडप घातलेला आहे. मंदिर आकाराने छोटेखानी परंतु उंच आहे. त्याच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीत आणि शिखरावर विविध चौकोनाकृती रचना करून ते साकारलेले आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. सभामंडपासमोर पत्र्याच्या मंडपात देवीचे वाहन असलेल्या सिंहाची रंगीत मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहात मोठ्या देवकोष्ठकात देवीची गोलाकार तांदळा स्वरूपातील मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्ती शेंदूरचर्चित आहे. कपाळी मोठा गोल कुंकुमतिळा आहे. भुवया आणि डोळे चांदीचे आहेत. नाकात नथ आहे. देवीच्या मस्तकी छोटा मुकुट आहे व वर लहानसे चांदीचे छत्र आहे. मंदिराच्या आवारात एका ओट्यावर काही छोट्या गोलाकार पाषाणांच्या उपदेवता एकत्र करून एका ओट्यावर मांडून ठेवण्यात आल्या आहेत. या मंदिरापासून जवळच नदीच्या पलीकडे दुसरे रेणुका मंदिर आहे. अलीकडेच जीर्णोद्धारित केलेल्या या मंदिरातील गर्भगृहातही रेणुका देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती विराजमान आहे.

मंदिरातील मुख्य उत्सव म्हणजे देवीचा नवरात्रोत्सव. रेणुकामातेचा भक्त परिवार मोठा असल्याने या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्र काळात येथे विविध धार्मिक अनुष्ठाने केली जातात. याशिवाय विविध हिंदू सण व उत्सवही येथे धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • वाशिम बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून वाशिमसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

रेणुका माता मंदिर

देवाला, वाशिम, जिला. वाशिम

Back To Home