सिद्धेश्वर मंदिर

माजलगाव, ता. माजलगाव, जि. बीड

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील जोगेश्वरी देवी मंदिर व बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी येथील वैजनाथ मंदिर विशेष प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात सुमारे पन्नासहून अधिक प्राचीन व प्रसिद्ध महादेव मंदिरे आहेत. चालुक्य, यादव, बहामनी, मुघल, मराठा व निजामशाही आदी सत्तांची प्रमुख केंद्रे बीड जिल्ह्यात होती. त्यामुळे या भागाला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. माजलगाव हे बीड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. या गावच्या ग्रामदैवताचे, म्हणजेच सिद्धेश्वराचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे.

बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात वसलेला, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा प्रदेश आहे. या जिल्ह्याच्या ईशान्येकडील माजलगाव शहर हे सिंधफणा नदीच्या काठावर वसले आहे. सिंधफणा नदी ही गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे. ती बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगांत उगम पावते आणि माजलगाव तालुक्यातून वाहत जाऊन मांजराठ येथे गोदावरीला मिळते. या भौगोलिक स्थानामुळेच माजलगावला प्राचीन काळापासून कृषी आणि व्यापाराचे केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. याच शहराच्या प्राचीनतेची साक्ष देणारे आणि शहराच्या अध्यात्मिक जाणिवेचा केंद्रबिंदू असणारे स्थान म्हणजे सिद्धेश्वर मंदिर होय. शहराच्या जुन्या भागात, सिंधफणा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर शतकानुशतके चालत आलेल्या शैव परंपरेचे प्रमुख केंद्र आहे. उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांनुसार आणि पुरातत्वीय अवशेषांवरून हे मंदिर माजलगाव शहरातील सर्वात प्राचीन मंदिर मानले जाते.

हे मंदिर गावापासून काही अंतरावर आहे. तसेच मंदिराजवळ मारुती व श्रीराम यांची लहान मंदिरे आहेत. सिद्धेश्वर मंदिरास सुमारे पंधरा फूट उंच भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत मुख्य प्रवेशद्वार आहे. ते रस्त्यापेक्षा सुमारे आठ फूट उंचीवर असल्यामुळे प्रवेशद्वारास दहा पायऱ्या आहेत. कोरीव पाषाणात बांधलेल्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला चौथरे आहेत, तर भिंतींवर जय-विजय द्वारपालांची चित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे आणि ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारावर महिरपी तोरण आहे, त्याच्या वर दोन्ही बाजूला चक्रनक्षी आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर, आणखी काही पायऱ्या चढून मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे. प्रांगणात डाव्या बाजूला प्रशस्त चौथऱ्यावर मंडप आहे. त्याचा वापर अन्नछत्र म्हणून केला जातो. प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम व विवाह सोहळे पार पडण्यासाठी सभागृह आहे. तटबंदीला लागून प्राचीन काळात बांधल्या गेलेल्या दगडी बांधकाम असलेल्या ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भाविकांसाठी विश्रामस्थान व भक्तनिवास म्हणून केला जातो. प्रांगणात दिसणाऱ्या प्राचीन समाध्या संत-महंतांच्या असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.

मंदिरासमोर नंदीमंडप आहे. सुमारे तीन फूट उंच चौथरा व त्यावर चारही कोनांवर स्तंभ आणि त्यावर छत आहे. छतावर शिखर आहे. नंदीमंडपात वज्रपीठावर नंदीची प्राचीन मूर्ती व नंदीपुढे शिवपिंडी आहे. नंदीमंडपाच्या बाजूने प्रदक्षिणामार्ग आहे. बाजूला चौथऱ्यावर प्राचीन नागशिळा आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी सिद्धेश्वर मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असलेला खुला सभामंडप आहे. या सभामंडपात मध्यभागी जमिनीवर कासव शिल्प आहे. यापुढे प्राचीन पाषाणी बांधणीचे गर्भगृह सुमारे तीन फूट उंच चौथऱ्यावर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर पाच पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्राचीन पाषाण मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. ललाटपट्टीवर चंद्र व सूर्य शिल्पे आहेत. अशी चंद्र-सूर्य शिल्पे असणे हे अनोखे व दुर्मिळ समजले जाते. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत.

गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील शाळुंका जमिनीलगत आहे, तर त्यातील लिंगपाषाण सुमारे एक फूट उंच आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. शिवपिंडीच्या बाजूला पितळी त्रिशूल आहे. तसेच चौरंगावर महादेवाचा उत्सवकाळात वापरला जाणारा पितळी मुखवटा आहे. गर्भगृहाचे छत भिंतीं
वर तोलले गेले आहे. द्वादशकोनी वितानावर चक्राकार नक्षी आहे.
गर्भगृहाच्या बाह्य बाजूने चौथऱ्यावर प्रदक्षिणामार्ग आहे. प्रदक्षिणामार्गावर काही प्राचीन मूर्ती व शिवपिंडी आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतींवर पशू, पक्षी, चक्र व पद्म शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. त्याच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. गर्भगृहावरील शिखर नंतरच्या काळात बांधले गेले असल्याचे सांगितले जाते.

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. या दिवशी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण मासातील सर्व सोमवारी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. मंदिरात चैत्रपाडवा, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांत, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. मंदिरात सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष, एकादशी आदी दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

उपयुक्त माहिती:

  • माजलगाव बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • बीड येथून ७७ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून माजलगावसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा

सिद्धेश्वर मंदिर

माजलगांव, ताल. माजलगांव, जिला. बीड

Back To Home