स्वामी समर्थ राजेराय मठ

अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर

अक्कलकोट हा शब्द उच्चारला की श्री स्वामी समर्थ हे शब्द आपसूकच येतात. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे ठिकाण त्यांच्या वास्तव्याने पावन झालेले आहे. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची जी काही स्थाने आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे येथील राजेराय मठ. या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामींच्या इच्छेने, त्यांच्या हयातीत, त्यांच्या निर्वाणाच्या एक वर्ष आधी याची स्थापना झाली होती. स्वामींनी स्वतः स्थापन केलेल्या चैतन्यमय पादुका या मठात आहेत. ‘स्वामींचे विश्रामस्थान’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा मठ हैद्राबाद संस्थानचे शंकरराव राजेराय रायन यांनी बांधल्याने तो राजेराय मठ म्हणून प्रसिद्ध आहे.

‘राजेराय रायन’ ही हैदराबाद संस्थानची मानाची पदवी होती. शंकरराव राजेराय रायन हे या संस्थानाचे जहागीरदार होते. त्यांच्याकडे सहा लाख सुवर्णमुद्रांची जहागीर होती. अनेक दिवसांपासून ते श्वेतकुष्ठ, ब्रह्मसमंध, क्षयरोग अशा व्याधींनी ग्रस्त होते. वैद्य-हकीम यांच्या उपचारांना यश मिळत नव्हते. अखेर ते गाणगापुरला गेले. तिथे त्यांनी धर्मकार्य, ब्राह्मणभोजन आदी कार्ये केले. एके दिवशी ते त्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना गर्भगृहात स्वामी समर्थ बसलेले दिसले. त्याच वेळी त्यांना श्रीदत्त महाराजांचा ‘मी अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या रुपात आहे, तिकडे ये’ असा दृष्टांत झाला.

यानुसार शंकरराव राजेराय अक्कलकोटला आल्यावर त्यांना स्वामी समर्थांच्या अवतार कार्याची महती कळाली. आपल्या व्याधींचे निरसन होण्यासाठी त्यांनी श्रीचरणी दशसहस्त्र रुपये वाहण्याचा संकल्प केला. स्वामी समर्थांनी शंकररावांना कडूलिंबाला पाला व मिरे खाण्याची सूचना दिली. पुढील दहा दिवसांत शंकररावांना सर्व व्याधींतून मुक्तता मिळाली. व्याधी बऱ्या झाल्याने शंकरराव श्रीचरणी दशसहस्त्र रुपये वाहू लागले. त्यावेळी स्वामींनी ‘या पैशांतून गावाबाहेरील श्रीराम मंदिराजवळ चुनेगच्ची मठ बांधून पादुकांची स्थापना कर’ असे सांगितले. ते माझे विश्रांतीस्थान असेल, असे त्यांनी सूचित केले. त्यानुसार शके १८००, इ.स. १८७७ मध्ये हा मठ बांधून तयार झाला.

मठाचे बांधकाम झाल्यानंतर स्वामींनी स्वतः आपल्या पावलांचा साचा तयार केला व त्यावरून पादुका तयार करण्यात आल्या. या पादुकांवर शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, डमरू, कमंडलू, झोळी, बेलाचे पान, सूर्य व चंद्र कोरलेले आहेत. या पादुकांवर पुढच्या बाजूला श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले आहे. इसवी सन १८७७ मध्ये माघ वद्य प्रतिपदेला या पादुकांची मठात स्थापना करण्यात आली. असे सांगितले जाते की या पादुकांची प्रतिष्ठापना करीत असताना तेथे एक दिव्य प्रकाश तयार झाला होता. त्याकडे पाहून महाराज म्हणाले होते की या माझ्या चैतन्य पादुका आहेत. या पादुकांवर कोणी डोके टेकवले, तर त्यांच्या मनोकामना पूर्ण करीन. पादुकांचे तीर्थ प्राशन करणाऱ्यांच्या व्याधी दूर करीन. दुसऱ्यांदा जल अर्पण केले, तर त्यांचे संकट निवारण करीन. तिसऱ्यांदा जल अर्पण केले, तर काशीविश्वनाथाला जल अर्पण केल्याचे पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होईल. पादुकांवर बेलपान, फूल वाहिले, तर ते काशीविश्वनाथाला अर्पण केल्याचे पुण्य मिळेल. त्यानंतर वर्षभराने म्हणजे १८७८ साली चैत्र वद्य त्रयोदशीला महाराजांनी महासमाधी घेतली.

त्यानंतर जवळपास ७५ वर्षे हा मठ दुर्लक्षित होता. काळाच्या ओघात त्याचे बांधकाम पडून गेले होते. १९५३ साली माघ वद्य प्रतिपदेला एक बालसाधू गाणगापूरमार्गे फिरत अक्कलकोट येथे आले. त्यांची वेशभूषा व त्यांच्या लिला या साईबाबांसारख्याच होत्या. ग्रामस्थांनी त्यांना राजेराय मठात आणले तेव्हा या मठाची अवस्था दयनीय असल्याची त्यांनी पाहिले. साधु महाराजांनी गावातील मुलांना एकत्र करून मठाचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. या ग्रामस्थांनीच या महाराजांना बेलानाथ असे नाव दिले व तेच नाव पुढे रूढ झाले. स्वामींनी सांगितलेले कार्य बेलानाथ महाराजांनी पन्नास वर्षांच्या कार्यकाळात भक्तांकडून करून घेतले. नामस्मरणाचा महिमा कथन केला आणि भक्तांकडून नामस्मरणरूपी सेवा करून घेतली. महाराजांनी या मठात देवीच्या अष्टभुजा मूर्तीची स्थापन केली. तसेच, बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून घेतली. १९९६ साली चंपाषष्ठीला मठात स्वामींची मूर्ती स्थापन करण्यात आली. त्यानंतर २००३ साली ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेला बेलानाथ बाबा समाधिस्थ झाले.

स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या श्रीराम मंदिराशेजारी राजेराय मठ स्थित आहे. या मठाच्या प्रांगणाभोवती तटभिंती आहेत. तटभिंतीतील प्रवेशद्वारातून मठाच्या प्रांगणात प्रवेश होतो. बंदिस्त सभामंडप व गर्भगृह अशी या मठाची रचना आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखा लाकडी कलाकुसरीने सजलेल्या आहेत. त्यावर खालच्या बाजुला द्वारपाल, ललाटबिंबस्थानी गणपती व उत्तरांगावर विविध देवता कोरलेल्या आहेत. गर्भगृहात एका उंच वज्रपिठावर स्वामींच्या पादुका व त्यापुढे स्वामींची उभी मूर्ती आहे. या मंदिर परिसरात बेलानाथ बाबांचे समाधी मंदिर, मारुती मंदिर व अष्टभूजा देवी मंदिर आहेत. प्रांगणातील एका बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. मंदिराच्या प्रांगणात औदुंबर, कडुनिंब, पिंपळवृक्ष, अश्वत्थ, बेल अशी विविध झाडे आहेत.

या मठात चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा उत्सव १० दिवस चालतो. त्यात अखंड नामस्मरण, भजन, प्रवचन, कीर्तन असे विविध कार्यक्रम असतात. शेवटच्या दिवशी सामुदायिक अभिषेक आणि महाप्रसाद होतो. तसेच गावातून पालखी मिरवणूक निघते. गोपाळकाल्याने उत्सवाची सांगता होते. त्यानंतर ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेला सद्गुरू बेलानाथ महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. हा उत्सही आठ दिवस साजरा होतो. त्या वेळीही प्रवचन, कीर्तन वगैरे कार्यक्रम असतात. पालखी आणि रथोत्सव हे या उत्सवाचे वैशिष्ट्य असते. गुरूपौर्णिमेचा उत्सव पौर्णिमेच्या आठ दिवस आधीपासून सुरू होतो. नवरात्रौत्सवात १० दिवस अष्टभुजा देवीची विविध रूपे भाविकांना पाहता येतात. याशिवाय कोजागरी पौर्णिमा, दत्तजयंती, जन्माष्टमी, महाशिवरात्री हे उत्सवही येथे साजरे केले जातात.

मठातर्फे भाविकांसाठी भक्तनिवासाची सुविधा आहे. दुपारी १२ वाजता व सायंकाळी सात वाजता येथे भाविकांना भोजन दिले जाते. दररोज सकाळी साडेचार वाजल्यापासून ते रात्री शेवटच्या व्यक्तीने दर्शन घेईपर्यंत या मठाची दारे खुली असतात.

उपयुक्त माहिती

  • अक्कलकोट बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • स्वामी समर्थ मंदिरापासून १ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मठाच्या पार्किंगपर्यंत येऊ शकतात
  • परिसरात व मंदिराच्या भक्तनिवासात निवासाच्या अनेक सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८४२१७८१९१२, ८४२११८१९१२
  • ई-मेल : rajeraimath@gmail.com
  • गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/vVk7C1FnGT2Hpf7SA
Back To Home