यमाई देवी मंदिर

चाफेबन, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

यमाई देवी ही परशुरामाची माता व जमदग्नी पत्नी रेणुका देवीचे रूप असल्याची मान्यता आहे. सातारा जिल्ह्यातील औंध येथे यमाई देवीचे मूळ स्थान आहे. तेथे देवीस मूळमाया नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकात यमाई देवीची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी या देवीचे एक प्रसिद्ध मंदिर पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरीजवळ चाफेबनात आहे. साताऱ्यातील औंध येथून देवी चाफेबनात आल्याची आख्यायिका आहे. असे सांगितले जाते की या देवीच्या दर्शनाशिवाय दक्षिणेचा राजा जोतिबाच्या दर्शनाची फलश्रुती होत नाही.

यमाई देवीच्या या स्थानाबद्द्लची आख्यायिका मराठीतील ‘केदारविजय’ ग्रंथामध्ये नमूद करण्यात आली आहे. ‘केदारविजय’ हा मूळचा संस्कृत ग्रंथ होता. हरी अंगारपूरकर यांनी १७७९ मध्ये तो मराठीत आणला. या ग्रंथात ३६ अध्याय आहेत व त्यातील २७ व्या अध्यायात यमाई देवीची कथा सांगण्यात आली आहे. ती आख्यायिका अशी की कोल्हासुराच्या उत्पातांमुळे करवीरातून बहिष्कृत झालेल्या लक्ष्मीला तेथे पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचे कार्य केदारनाथाने स्वीकारले. त्या दक्षिण मोहिमेत यमाई देवी ही केदारनाथाची साह्यकर्ती होती. तिने कोल्हासुराच्या दैत्यसैन्यातील औंधासुर या दैत्याचा वध केला. त्यामुळे केदारनाथांचा दक्षिणेकडचा मार्ग सुकर झाला. हे जेथे घडले त्या स्थळाचे नाव औंध असे

पडले. हे गाव सातारा जिल्ह्यात आहे. औंधासुराचे पारिपत्य करण्यासाठी यमाई देवी औंधनजीकच्या कंठगिरी डोंगरावर प्रकट झाली होती. यमाई ही मूळ माया असल्याने कंठगिरीस नंतर मूळगिरी म्हणण्यात येऊ लागले. ते यमाई देवीचे मूळ स्थान होय.

दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर महालक्ष्मीच्या विनंतीवरून केदारनाथ म्हणजेच जोतिबा वाडी रत्नागिरी येथे वास्तव्य करू लागले. महालक्ष्मीने वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. त्या सोहळ्याचे निमंत्रण यमाई देवीस देण्यास महालक्ष्मी विसरली. त्यामुळे यमाई देवी रुसली. चोपडाई (चर्पटांबा) देवीने केदारनाथांच्या ते लक्षात आणून दिले. तेव्हा केदारनाथ तिचा रुसवा काढण्यासाठी चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी औंधला जाण्यास निघाले. ते चैत्र शुद्ध पौर्णिमेला औंधला पोहोचले. त्यांना पाहताच यमाईने दार बंद केले. हे पाहून केदारनाथांनी सर्व देवांसह यमाईचे स्तवन केले. तीन वर्षे ते चैत्र महिन्यात येथे येत असत. त्यानंतर यमाई त्यांना म्हणाली की तुम्ही आता मूळ पीठाला येण्याचे कष्ट घेऊ नका. मीच आपल्याजवळ रत्नागिरीवर येते. त्यानुसार यमाई रत्नागिरीच्या डोंगरावरील उत्तरेकडील चाफेबनात प्रकट झाली.

या मंदिराचा इतिहास असा की ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातील जोतिबाभक्त राणोजी शिंदे यांनी इ.स. १७३० मध्ये सध्या येथे असलेले मंदिर बांधले. शिंदे हे मराठेशाहीतील एक पराक्रमी घराणे होते. राणोजी शिंदे यांच्यापासूनच शिंदे घराणे पुढे आले. ते पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या पदरी पायदळात होते. सहा वर्षांत, १७२२ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांना बारगीर केले. चिमाजी आप्पा यांनी १७२८-२९ दरम्यान शिंदे, होळकर व पवार यांच्या मदतीने माळवा जिंकला. त्यावेळी या जिंकलेल्या प्रांताची त्यांनी या तीन सरदारांत वाटणी केली. राणोजींच्या वाटणीस माळव्याच्या दीड कोटी वसुलाच्या प्रांतापैकी ६५•५ लाखांचा मुलुख आला. यानंतर शिंदे यांनी माळव्यात जम बसविला व कालांतराने तेथे आपले राज्य स्थापन केले. माळव्याचा कारभार हाती आल्यानंतर लगेच राणोजी शिंदे यांनी आपले कुलदैवत असलेल्या जोतिबाच्या मंदिराची उभारणी केली. त्याच वेळी त्यांनी यमाई देवीचे मंदिरही उभारले.

पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर दगडी बांधणीचे आहे. ते हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारलेले आहे. मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या प्रशस्त वाहनतळापासून सुमारे ५० पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूला पूजासाहित्य विक्रीची दुकाने आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस उंच चौथरे व उपद्वारे आहेत. गर्दीच्या वेळी दर्शन रांगेसाठी या उपद्वारांचा वापर केला जातो.

प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पाना-फुलांची नक्षी व बाह्य बाजूस असलेल्या स्तंभांवरील आडव्या तुळईत नक्षीदार तोरण कोरलेले आहे. ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपात दगडी नक्षीदार स्तंभ आहेत. हे स्तंभ पायाजवळ अधिक रुंद व चौकोनी आहेत. वरील भागात ते षट्कोनी, गोलाकार, अष्टकोनी तसेच द्वादशकोनी अशा रचनेचे आहेत. येथील सभामंडप हा बंदिस्त स्वरूपाचा (गूढमंडप) आहे. त्यात पुरेसा प्रकाश व हवा येण्यासाठी उजवीकडील व डावीकडील भिंतींवर गवाक्ष आहेत. या सभामंडपात बाके ठेवलेली आहेत. त्यावर अनेक परड्या ठेवलेल्या आहेत. नवसपूर्तीनंतर भाविकांकडून या परड्यांमध्ये पीठ व मिठाचे दान दिले जाते.

गर्भगृहात वज्रपीठावर यमाई देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. डोक्यावर चांदीचा मुकुट, कानात कर्णकुंडले, सोनेरी डोळे, नाकात नथ तसेच विविध अलंकार ल्यालेली व साडी परिधान केलेल्या देवीचे रूप सुंदर भासते. विविध प्रसंगी येथे वेगवेगळी आरास केली जाते. मूर्तीच्या पाठशिळेवर सोनेरी पत्र्याची सजावट आहे. त्यावर वरील बाजूस कीर्तिमुख व पाना-फुलांची नक्षी आहे व खालच्या बाजूस सेवकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या बाजूला तलवार ठेवलेली आहे. वज्रपीठाच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. त्यातील उजवीकडे गणेशाची मूर्ती व डावीकडे स्थानिक देवता आहे.

मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर १८व्या शतकातील महाराष्ट्रीय शैलीतील उठावशिल्पांचे उत्तम नमुने कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर शिवपिंडीस अभिषेक करणारा अर्ध मनुष्य, अर्ध प्राणी या स्वरूपातील शिल्प आहे. हे व्याघ्रपाद ऋषींचे शिल्प आहे व त्यापुढे नंदीचेही शिल्प आहे. याच्या बाजूस महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. काही अभ्यासकांच्या मते, ही देवी यमाईच असून ती औंधासुरमर्दिनी या स्वरूपात आहे. त्याच प्रमाणे येथे अनंतशयन विष्णूचेही शिल्प आहे. मात्र लोकधारणेनुसार हे शिल्प भावाच्या पायातील किडे काढणाऱ्या युवतीचे आहे. या शिल्पामागे भगिनीप्रेमाची कथा असल्याचे सांगितले जाते. ती अशी की एकदा एका भावाने बहिणीला लाथ मारली. तेव्हा त्याच्या पायात किडे पडले. ते पाहून बहिणीला दुःख झाले व तिने आपल्या भावाचा पाय मांडीवर घेऊन त्यातील किडे काढले. ती कथा येथे शिल्पांकित केली आहे.

उजव्या बाजूच्या भिंतीवर व्याल, हाती सर्प पकडलेला गरुड व मस्तकास हात लावून नतमुद्रेत असलेला हनुमान अशी शिल्पे आहेत. गरुड व हनुमान या शिल्पांच्या मध्ये कृष्ण-गोपिकांचे शिल्प आहे. विशेष म्हणजे त्यातील कृष्ण चतुर्भुज आहे व त्याच्या मागील दोन्ही हातांत चक्र व शंख आहेत. त्याने एका हाताने एका गोपिकेचा हात धरलेला आहे; तर दुसरा हात गोपिकेच्या अंगचटीस आलेला अशा अवस्थेत आहे. या दोन्ही गोपिकांच्या मस्तकी दह्यादुधाचे मडके आहे व त्यांनी ते एका हाताने पकडलेले आहे. १८व्या शतकातील गवळण या काव्य प्रकाराचा या शिल्पावरील प्रभाव स्पष्ट दिसतो. गर्भगृहाच्या बाहेरील डावीकडील भिंतीवर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. यातील हनुमान, तसेच श्रीराम यांची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

गर्भगृहाच्या मागील भिंतीवरील शिल्पांच्या खालच्या बाजूस कुंकवाने अनेक स्वस्तिक चिन्हे काढल्याचे दिसते. त्याचप्रमाणे तेथील कठड्यावर अनेक चपटे दगड इतस्ततः पडलेले दिसतात. अनेक नवविवाहित स्त्रिया येथे लगोरी रचल्याप्रमाणे एकावर एक असे सात चपटे दगड रचतात. हे दगड सप्तपदीचे प्रातिनिधिक रूप मानले जातात. स्त्रियांची अशी श्रद्धा आहे की येथे अशा प्रकारे एकावर एक सात दगड रचले व ते थर नीट उभे राहिले, तर आपला सातही जन्मांतील संसार सुखाचा होतो. या वेळी स्त्रिया मंदिराच्या भिंतीवर कुंकवाने मांगल्याचे प्रतीक असलेले स्वस्तिक चिन्ह काढतात.

यमाई मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर हे जोतिबा मंदिराच्या शिखराप्रमाणेच आहे. चारही बाजूंनी वर निमुळत्या होत गेलेल्या या शिखरावर अनेक स्तंभ बसवलेले असल्याने ते स्तंभांनीच बनले आहे, असा भास होतो. त्याचप्रमाणे शिखराच्या चारही बाजूंना सुशोभित देवकोष्टके दिसतात. मात्र त्यात कोणत्याही देवतेची मूर्ती नाही. शिखरास गोलाकार व खालील बाजूंनी कमळपाकळ्या कोरलेला आमलक व त्यावर कळस आहे. यमाई मंदिराच्या प्रांगणात दोन कुंडे वा तीर्थे आहेत. त्यांतील एक तीर्थ जिजाबाईसाहेब यांनी १७४३ मध्ये बांधले आहे व दुसरे ‘जमदग्न्य तीर्थ’ राणोजी शिंदे यांनी बांधले आहे. येथील दगडी पायऱ्या व कठडा असलेल्या तीर्थाच्या पाण्यात आंघोळ केली असता त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पाच दिवसांचा चैत्र पौर्णिमा वसंतोत्सव हा या मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव असतो. चैत्र पौर्णिमेला दुपारी ज्योतिबा डोंगरावरून जोतिबा देवाची पालखी सासनकाठ्या व इतर लवाजम्यासह यमाई देवीच्या भेटीला येते. वाई येथील ‘प्राज्ञ पाठशाळा मंडळा’च्या व ‘राज्य साहित्य व संस्कृती मंडळा’ने पुरस्कृत केलेल्या ‘नवभारत’च्या जानेवारी १९७६ च्या अंकात ख्यातनाम संशोधक रा. चिं. ढेरे यांनी या उत्सवाची माहिती दिली आहे, ती अशी – ‘चैत्री पौर्णिमेच्या उत्सवातील मुख्य भाग म्हणजे जोतिबाचे विवाहासाठी यमाईकडे मिरवत जाणे… पालखी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास यमाईच्या मंदिरासमोर येते. मग पालखी यमाईच्या समोरील सदरेवर ठेवतात; परंतु आश्चर्य असे की जोतिबा आपल्याशी लग्न लावण्यासाठी आला आहे, हे समजताच यमाई आपले दार तत्काळ लावून घेते… मग देवीपुढे खंजीर ठेवून लग्न लावण्याचा विधी पार पडतो.’

याबाबतच्या ‘केदारविजया’तील स्पष्टीकरण कथेनुसार, यमाई ही मूळची जमदग्नीपत्नी रेणुका. औंधासुराच्या संहारासाठी केदारनाथाने तिला ‘ये माई’ अशी साद घातली. तेव्हा तिला यमाई असे नाव पडले. केदारनाथ हे जेव्हा यमाईचा रुसवा काढण्यासाठी औंधला तिच्या मूळ स्थानी गेले होते, तेव्हा त्यांना पाहताच तिने मंदिराचा दरवाजा लावून घेतला. ते पाहिल्यानंतर सर्वांना प्रश्न पडला की साक्षात देव आलेले असताना यमाईने दरवाजा का लावून घेतला. मात्र तेव्हा केदारनाथांनी तिच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. जमदग्नींच्या सांगण्यावरून परशुरामाने जेव्हा रेणुकेचा शिरच्छेद केला होता, तेव्हा जमदग्नी ऋषींनी तिला पुन्हा एकत्र येण्याचे वचन दिले होते. केदारनाथाच्या खड्गामध्ये जमदग्नींच्या क्रोधाचा अंश होता. म्हणजेच त्यात जमदग्नी होते. त्यांच्या एकत्र येण्याच्या वचनपूर्तीची वेळ आता आली आहे हे जाणून केदारनाथांनी यमाईचे त्यांच्या खड्‌गाशी म्हणजेच जमदग्नीशी लग्न लावून दिले. दैवत व लोकधर्माचे थोर अभ्यासक व संशोधक रा. चिं. ढेरे यासंदर्भात सांगतात की ‘माहात्म्यकथा जरी या देवाचे हिमालयातील केदारनाथ नामक शिवाशी नाते जोडीत असली, तरी प्रत्यक्षात त्यांचे लौकिक स्वरूप जसेच्या तसे टिकून आहे. तो खंडोबाप्रमाणेच शुद्ध क्षेत्रपाळ श्रेणीतील देव आहे. यमाईसारखी लोकदेवी ही त्याची पत्नी आहे.’ या उत्सवाच्यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती असते. याशिवाय मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव, शाकंभरी नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी वार्षिक उत्सवही साजरे होतात. देवीला मिठा-पिठाचा जोगवा अर्पण करण्याची प्रथा आहे.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून २२ किमी, तर पन्हाळा येथून १२ किमी अंतरावर
  • कोल्हापूर व पन्हाळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२३१-२६२६१४७
Back To Home