महादेव मंदिर

अन्वा, ता. भोकरदन, जि. जालना


काशी हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थान गणले जाते. मात्र धर्मशास्त्रानुसार काशी एकच नसून पाच आहेत. वाराणसी किंवा काशी, उत्तराखंडमधील उत्तरकाशी, उत्तरकाशीनजीकच डोडीताल येथील गुप्तकाशी, मदुरानजीकची शिवकाशी आणि कडयनल्लूर नजीकची तेन्काशी (तेन म्हणजे दक्षिण. तेन्काशी म्हणजे दक्षिण काशी) अशी या पंचकाशींची नावे आहेत. महाराष्ट्रातील पैठणचाही पूर्वी दक्षिण काशी, असा गौरव करण्यात येत असे. अन्वा येथील महादेव मंदिराचे स्थानमहात्म्य असे सांगितले जाते की हे मंदिर याच पंचकाशींशी निगडित आहे. या मंदिरास स्थानिक बोलींमध्ये मढ असे म्हटले जाते.

स्थानिक दंतकथेनुसार श्रीकृष्णाचा शत्रू असलेल्या भौमासुराची राजधानी असलेल्या आणि काही काळ राष्ट्रकुटांची राजधानी असलेल्या भोकरदनमध्ये अन्वा हे गाव आहे. या राष्ट्रकुटांचा अखेरचा राजा कर्क याची कन्या जाकव्वा हिचा पती तैलप हा होता. तो राष्ट्रकुटांचा मांडलिक होता. कर्काच्या या जावयाने त्याच्याविरोधात बंड करून राष्ट्रकुटांची राजधानी मान्यखेट म्हणजे आजचे मालखेड लुटले. राष्ट्रकुटांचे साम्राज्य धुळीस मिळाले आणि येथे तैलपाची म्हणजेच कल्याणीच्या चालुक्यांची राजवट सुरू झाली. .. ९७३ ते ११५० या कालावधीत या घराण्याने महाराष्ट्र कर्नाटकवर राज्य केले. शिव, विष्णू, कोल्हापूरची महालक्ष्मी, कार्तिकेय ही त्यांची प्रमुख उपास्य दैवत होते. चालुक्य राजांनी अनेक उत्कृष्ट देवालये बांधली. भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील महादेव मंदिर हे त्यापैकी एक आहे

.. १००० ते ११०० या दरम्यान बांधलेले हे मंदिर गावाच्या मधोमध पूर्वाभिमुखी आहे. सुमारे चार फूट उंचीच्या जोत्यार हे मंदिर उभे आहे. जोत्यावर बारीक नक्षीकामाचे पट्टे आहेत. मुखमंडप, खुला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. आठ पायऱ्या चढून जोत्यावरून मुखमंडपात प्रवेश होतो. या पायऱ्यांनजीक जयविजय या वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. जोत्यावर कोरीव काम करण्यात आलेले आहे तो मंदिराच्या कोनांप्रमाणेच कोन काढून बांधलेला आहे. मंदिराचा आकार तारकाकृती आहे. ओटाही त्याच आकाराचा आहे. मात्र ओट्याचा आकार मंदिरापेक्षा चार ते पाच फूट अधिक असल्याने त्यावरून मंदिरास प्रदक्षिणा घालता येते

मंदिराच्या भिंतीच्या मूर्तीयुक्त भागास जंघा असे म्हणतात. या मंदिराच्या जंघा भागाच्या खालच्या थरातही इंच न् इंचावर नक्षीकाम केलेले आहे. येथे छोट्या देवळ्या वा रथिकांमध्ये वैष्णवपंथीय देवीप्रतिमा कोरलेल्या आहेत. या भागात हंसपट्टिका सिंहपट्टिका आहेत. या ठिकाणी तीन मोठी देवकोष्ठे आहेत. त्यातील दोन देवकोष्ठांमध्ये गजलक्ष्मी वराह यांच्या मूर्ती आहेत. या मूर्तींचा काही भाग आज तुटलेला आहे. मात्र त्या मूर्ती व्यवस्थित ओळखता येतात. देवकोष्ठांच्या वरच्या पट्ट्यातही छोट्या देवळ्यांची रांग आहे. त्यातही अनेक देवीप्रतिमा आहेत

मंदिराचा सभामंडप चौरसाकार आहे. त्यास अर्धे खांब बुटकी निम्म्या उंचीची भिंत आहे. त्यावर बाहेरच्या बाजूने नक्षीचे थर आहेत. हे मंदिर एकूण ५० कोरीव खांबांवर उभे असून त्यातील बारा खांब प्रमुख आहेत. आठ खांब तीन दिशांच्या प्रवेशद्वारांपाशी आहेत, तर ३० खांब छतास आधार देत आहेत. या खांबांवरील बारीक नक्षीकाम आणि कोरीव प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सभामंडपातील खांबांची रचना अशी करण्यात आली आहे की आपण सभामंडपात कुठेही बसलो तरी मध्यभागी काय चालले आहे हे पाहू शकतो. मंडपाच्या मधोमध रंगशिला आहे. ही रंगशिला जमिनीपासून थोडी उंच आहे. त्यावरून इतिहासकारांचा असा कयास आहे की येथे मंदिराच्या आधीच्या काळात नृत्य, संगीतसेवा अर्पण केली जात असावी. आता या रंगशिलेवर नंदीची मूर्ती दिसते. मंडपाच्या छतावरही बारीक अशी कलाकुसर केलेली आहे. छत घुमटासारखे गोलाकार म्हणजे करोटक वितान प्रकारचे आहे. त्यात तुळयांनी अष्टकोनी आकार तयार केलेला आहे. छताच्या अगदी वरच्या बाजूला मध्यभागी कमळाकार नक्षी आहे. त्या भोवती एकानंतर एक अशी मोठी होत जाणारी सात एककेंद्री वर्तुळे आहेत

या मंदिराचा अंतराळही चौरसाकृती आहे. त्यावर गोलाकार शिखर आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. म्हणजे चौकट पाच पट्ट्यांची आहे. एकेका शाखेवर शार्दूल, पुष्प, स्तंभ, पुष्प आणि विद्याधर यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. शाखांच्या तळाशी वैष्णव प्रतिमा आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे त्यावरच्या भागावर म्हणजे उत्तर रांगेवर लहान लहान पाच देवळ्या आहेत. त्यात गरुडासह विष्णू, ब्रह्मा, ब्रह्मिणी, शिव, महेश्वरी यांच्या प्रतिमा आहेत. प्रवेशद्वाराच्या उंच उंबरठ्यावर म्हणजेच मंडारकावर कीर्तिमुख आहे. गाभारा आठ चौरस फूट आकाराचा आहे. त्यात शिवपिंडी आहे. त्यावर धातूची फणा काढलेली नागप्रतिमा बसवण्यात आली आहे.

या मंदिराच्या बाह्यभागावर विष्णूच्या शक्तिरूपातील म्हणजेच स्त्रीरूपातील मूर्ती आहेत. त्यात लक्ष्मी, कीर्ती, सुगंधा, श्रद्धा, उमा, लज्जा, तुष्टी, विद्या, पुष्टी, हर्षा, शांती, सरस्वती, शुद्धी, दया, विद्युता, कांती या शक्तिरूप विष्णूच्या मूर्तींचा समावेश आहे. धर्मेतिहासकारांचे असे म्हणणे आहे की या वैष्णव मूर्ती, तसे जयविजय हे वैष्णव द्वारपाल, वराह आणि नरसिंह यांच्या मूर्ती, उत्तररांगेवरील विष्णू मूर्ती हे सर्व पाहता, हे मूळ मंदिर वैष्णव पंथीयांचे होते. कालांतराने त्याचे रूपांतर शैव मंदिरात करण्यात आले. त्यानुसार मग स्थानमहात्म्यही तयार करण्यात आले.

या अप्रतिम मंदिरास पुरातत्त्व खात्याने आता संरक्षक भिंत उभारलेली आहे. मंदिर परिसरात सर्वत्र दगडी फरशी बसवण्यात आली आहे. तसेच मंदिराची पडझड रोखण्यासाठी मंडप आदी ठिकाणी लोखंडी खांबांचा आधारही देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा हा प्राचीन वारसा पाहण्यासाठी तसेच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येथे पर्यटक भाविकांचा मोठा ओघ असतो

उपयुक्त माहिती

  • भोकरदनपासून २० किमी, तर जालना शहरापासून 
  • ७४ किमी अंतरावर
  • भोकरदन येथून अन्वासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

 

Back To Home