आजुबाई मंदिर संस्थान

अन्वा, ता. भोकरदन, जि. जालना

बाराव्या शतकात उभारण्यात आलेले महादेव मंदिर, प्राचीन विठ्ठल मंदिर यांजबरोबर जगद्‌जननी आजुबाई यांचे मंदिर, तसेच त्यांचे अंतर्धान स्थान हे अन्वा गावातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. आजुबाई माता जगदंबेचा अवतार असल्याची मान्यता आहे. प्राचीन महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला त्यांचे मंदिर असून त्यापासून दूर अंतरावर त्या अंतर्धान पावल्या तेथे आता नवीन मंदिर उभारण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातून भाविक येत असतात.

अन्वा हे गाव प्राचीन काळापासून पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे वैष्णव, शैव मंदिरांप्रमाणेच महानुभाव पंथीयांचेही स्थळ आहे. तेराव्या शतकात सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी यांनी अन्वा गावी १५ दिवस वास्तव्य केले होते. लीळाचरित्रात त्याचा उल्लेख असा आहे कीगोसावीं तेथौनि आनवेयासि बीजें केलें : गावांउतरे बन : तेथ गुढरू आंबा : तेथ गोसावीयांसि दीस पन्हरा अवस्थान जालें :’ गोसावी म्हणजे चक्रधरस्वामी दुसऱ्या गावावरून आनवे येथे आले तेथे आंब्याच्या बनात राहिले, असे या लीळेतून समजते. अशा या गावामध्ये सोळाव्या शतकात जगदंबेचा अवतार असलेल्या आजुबाई यांचा जन्म झाला. आपल्या अवतारकाळात आजुबाई यांनी राजापासून रंकापर्यंत अनेकांचे दुःखनिवारण केले, तसेच लोकांस भक्तीमार्गास लावले

आजुबाई यांच्या जन्माविषयी असे सांगितले जाते की या गावामध्ये तुकारामपंत चंद्रिकाबाई हे दाम्पत्य राहात होते. त्यांना पोटी संतान नसल्याचे मोठे दुःख होते. संतानप्राप्ती व्हावी यासाठी त्या दोघांनी तुळजापूर येथे जाऊन भवानीमाता मंदिरात बारा वर्षे अनुष्ठान केले. त्यांची भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली. तिने त्यांना वर दिला की मी तुमच्या पोटी जन्म घेईन. मात्र पाच वर्षांनंतर मी अंतर्धान पावेन. त्यानुसार देवीने कन्येच्या स्वरूपात या दाम्पत्याच्या पोटी .. १५७२ मध्ये चैत्र शुद्ध चतुर्थीस जन्म घेतला. या कन्येचे नाव आजुबाई असे ठेवण्यात आले

आजुबाई यांच्याबद्दल अशीही कथा सांगतात की बालपणापासून या मुलीकडून अनेक चमत्कार घडत होते. तिची कीर्ती हळूहळू सर्वत्र पसरली. लोक तिला देवीअवतार मानू लागले. या काळात या परिसरात एक यवन राजा राज्य करीत होता. त्याला ही माहिती मिळाल्यानंतर त्याने या छोट्या मुलीची परीक्षा पाहण्याचे ठरवले. या यवनराजाने तिला तैलदिव्य करायला सांगितले. प्राचीन काळी जलदिव्य, तैलदिव्य अशी दिव्ये केली जात असत. तैलदिव्यामध्ये उकळत्या तेलामध्ये एखादे नाणे टाकून ते काढण्यास सांगत असत. ते काढताना हातास जखम झाली तर दिव्यामध्ये ती व्यक्ती अनुत्तीर्ण झाली असे समजले जात असे. यवनराजाने या बालिकेसाठी अशी अघोरी परीक्षा ठेवली. मात्र लहानग्या आजुबाईने स्मितहास्य करीत त्या उकळते तेल असलेल्या कढईत हात घातला आत टाकलेले नाणे अलगद काढले. तिच्या नाजूक हातांस किंचितही भाजले नाही. मात्र ज्याने तैलदिव्य करायला सांगितले त्या राजाच्या अंगास दाह होऊ लागला. तेव्हा तो आजुबाईस शरण आला. अखेर त्याचा दाह शमविण्यासाठी आजुबाईने अन्वा गावातच एक कल्लोळ म्हणजे दगडी पायऱ्या असलेली बारव निर्माण केली. आपल्या पाच वर्षांच्या जीवनकाळात आजुबाईने अनेकांचा उद्धार केला. अखेर भवानीमातेने सांगितलेला पाच वर्षांचा काळ संपत आल्यानंतर आजुबाईंनी आपली अवतार समाप्तीची वेळ झाल्याचे सांगितले. तुकारामपंत चंद्रिकाबाई यांना त्यांनी पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. आजुबाई जाणार या कल्पनेने सारेच शोकसागरात बुडाले. माते, आम्हांस सोडून जाऊ नको, अशी प्रार्थन करू लागले. त्यावेळी आजुबाईने नागरिकांना सांगितले की दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीस माझ्या वंशातील पुरुष माझी स्वारी घेईल त्याद्वारे मी सर्वांना दर्शन देईन. असे सांगून आजुबाई अंतर्धान पावल्या

सोळाव्या शतकात आजुबाई यांचा ज्या वाड्यामध्ये जन्म झाला होता, त्याच ठिकाणी आज त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. या वाड्याची बाहेरची भिंत जाडजुड आणि विटांची आहे. प्रवेशद्वारही जुन्या घरांसारखे आहे. आत मोकळे आवार असून त्यातून पुढे गेल्यानंतर आजुबाईंचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याचा दरवाजा लागतो. बाहेरून नव्याने बांधकाम केलेल्या या वाड्याचा आतला भाग मात्र जुन्या चौसोपी वाड्यासारखा आहे. मधोमध मोठी मोकळी जागा चारी बाजूंनी लाकडी खांब असलेली प्रशस्त ओसरी आहे. आत गेल्यानंतर समोरच होमकुंड आहे. उजव्या बाजूस ओसरीवर आजुबाईंचा गाभारा आहे. गाभाऱ्याच्या ओट्याला सिंहमुखाची मूर्ती बसवण्यात आली आहे. गाभाऱ्यात एका उंच चौथऱ्यावर आजुबाईंची बसलेली पूर्णाकृती अभयमुद्रेतील मूर्ती आहे. मूर्तीच्या नाकात नथ असून गळाभर दागिने आहेत. मस्तकावर मुकुट आहे. या गाभाऱ्याच्या अगदी समोरच्या बाजूला ओसरीवर आणखी एक गाभारा आहे. त्यात एका आसनावर सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज यांची प्रतिमा आहे. लक्ष्मीकांत महाराज हे आजन्म ब्रह्मचारी होते त्यांनी आपले जीवन आजुबाईंना अर्पण केले होते

या मंदिरापासून काही अंतरावर, आजुबाई जेथे अंतर्धान पावल्या होत्या तेथेही त्यांचे मंदिर बांधलेले आहे. आजुबाई अंतर्धानस्थान मंदिर म्हणून ते ओळखले जाते. या मंदिराच्या प्रवेशद्वारी चौकोनी कोरीव दगडांत बांधलेले प्रवेशद्वार आहे. महिरपी कमान, वरच्या बाजूस किल्ल्यांच्या तटासारखा आकार आणि त्यावर तीन छोटी शिखरे असे या प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. तेथून जवळच जुनी दगडी पायऱ्यांची बारव आहे. काही अंतरावर पुढे आजुबाईंच्या मंदिराचे प्रवेशद्वार आहे. आत आजुबाईंनी तयार केलेले कल्लोळतीर्थ आहे. येथेच उभारण्यात आलेल्या संगमरवरी मंदिरात आजुबाईंचा तांदळा आहे. या परिसरात सद्‌गुरू लक्ष्मीकांत महाराजांचे मोठे मंदिर आहे. मंदिरास प्रशस्त सभामंडप, गर्भगृहात लक्ष्मीकांत महाराजांच्या पादुका एका चौथऱ्यावर त्यांची मूर्ती आहे. मांडी घालून बसलेले महाराज भक्तांना अभय देत आहेत, अशा स्वरूपाची ही मूर्ती आहे

आजुबाईंनी अंतर्धान पावण्यापूर्वी माझ्या वंशातील पुरुष माझी स्वारी घेतील, असे अभिवचन दिले होते. त्यानुसार तेव्हापासून त्यांच्या घरात स्वारीची परंपरा वंशपरंपरागत सुरू आहे. सद्‌गुरू लक्ष्मीकांत महाराज हे १९६२ पासून स्वारी घेत असत. त्यांच्या देहावसानानंतर, २००४ पासून . पू. सोनू महाराज हे स्वारी घेत असतात. येथील प्रथेनुसार चैत्र शुद्ध अष्टमीस अन्वामध्ये आजुबाईची यात्रा भरते. त्या दिवशी सकाळी सोनू महाराज यांना मंत्रघोषात स्नान घातले जाते. नंतर ते देवीचे ध्यान करीत बसतात. रात्री १२च्या सुमारास ते गावातील भगवती मंदिरात देवीची आज्ञा घेतात. त्यानंतर ते आजुबाई देवीचे वस्त्र परिधान करतात. यानंतर देवीला आरसा दाखवून स्वरूप दर्शन घडविले जाते. हे झाल्यानंतर स्वारी निघते. या वेळी भाविक पोत उजळतात. देवीला नवसाचे पोत कबूल केलेले असतात. त्यांचा खेळा होतो. वाद्यांच्या गजरात स्वारी गावातील आजुबाईच्या मंदिराकडे निघते. तेथे शस्त्रधारण विधी झाल्यानंतर स्वारी शांत होते. मग आजुबाई स्वरूपातील सोनू महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. आजुबाईची ही यात्रा भोकरदन तालुक्यातील सर्वांत मोठी यात्रा मानली जाते. यात्रेस परराज्यांतूनही भाविक येत असतात

उपयुक्त माहिती

  • भोकरदनपासून २१ किमी, तर जालनापासून ७५ किमी अंतरावर
  • भोकरदन येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने दोन्ही मंदिरांपर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : दीपक महाराज, पुजारी, ९०९६९ ५५९४३
Back To Home